श्री मंदार दातार 
? इंद्रधनुष्य ?

☆ पंचांग – टिळक की दाते की – भाग – 2 ☆ श्री मंदार दातार ☆

(या प्रमुख सुधारणा होत्या व त्यामुळे सण आणि उत्सव यांच्या तारखांमध्ये फरक पडणार होता ! ) इथून पुढे —-

केरोपंत यांनी इतर अनेक सुधारणाही सुचवल्या. त्यांतील शेवटची, झीटा अक्षराची सुधारणा वगळता बाकी सर्व पुढील काळात स्वीकारल्या गेल्या. पंचांग करणारे सर्वजण आधुनिक गणित शिकलेले नव्हते. त्यांना गणित आधुनिक प्रमाणे (मानके) वापरून करता यावे यासाठी केरोपंतांनी ‘ग्रहलाघवा’च्या धर्तीवर ‘ग्रहगणिताची कोष्टके’ हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळक हे केरोपंतांचे शिष्य; त्याचप्रमाणे ते गणित, संस्कृत आणि पौर्वात्य विज्ञानाचे अभ्यासक व जाणकार. त्यांनी त्या सुधारणा पंचांगात झाल्याच पाहिजेत आणि ‘आमची पंचांगे फ्रेंच नाविक पंचांगांच्या तोडीची असलीच पाहिजेत’ असा आग्रह धरला व तशा  प्रेरणेने पंचांग सुधारणा घडवून आणल्या. त्या सुधारणा करणे हे सांगली येथे लोकमान्यांच्या अध्यक्षतेखाली 1920 मध्ये झालेल्या परिषदेत सर्वमान्य झाले.

पुढील काळात पंचांग गणित हे आधुनिक साधने वापरून केले जाऊ लागले. गेली काही वर्षे तर संपूर्ण पंचांग हे संगणकाच्या मदतीने मांडले जाते. त्यासाठी लागणारे खगोलीय स्थिरांक आणि गणितीय पद्धती भारत सरकारतर्फे कोलकाता येथील ‘पोझिशनल अॅस्ट्रॉनॉमी’ ही संस्था प्रकाशित करते. त्यामुळे सर्व पंचांगांत एकवाक्यता आढळते. या सगळ्या सुधारणा पंचांगकर्ते हळुहळू स्वीकारू लागले आहेत आणि सर्व पंचांगे गणितीय व खगोलीय दृष्ट्या अचूक आहेत. लोकमान्यांचे ते स्वप्न सत्यात उतरले आहे. त्या अर्थाने प्रसिद्ध होणारी सर्वच पंचांगे ही एका अर्थी ‘टिळक पंचांगे’ आहेत. पंचांगात दर्शवलेल्या तिथी, नक्षत्र, ग्रहांच्या स्थिती, गती; तसेच, सूर्य-चंद्र ग्रहणांच्या वेळा या वास्तविक असून त्यात कोणताही फरक राहिलेला नाही.

मग प्रश्न असा उरतो, की केरोपंत छत्रे यांनी सुचवलेल्या सर्व सुधारणा अंमलात आल्या पण नक्षत्र चक्र आरंभ हा रेवती नक्षत्रातील झीटा ताऱ्यापासून करावा ही सूचना काही सर्वमान्य झाली नाही. लोकमान्य असतानादेखील त्या सूचनेस लोकांचा विरोध होता आणि तो पुढे तसाच राहिला. त्याचे कारण म्हणजे त्या सूचनेचा स्वीकार केला असता तर, ‘अधिक’ महिने मोजण्याच्या पद्धतीत फरक येईल आणि त्यामुळे लोक नवीन कोणत्याच सुधारणा पंचांगात स्वीकारणार नाहीत. त्यामुळे सर्वजण ती सूचना वगळून बाकी सुधारणा करण्यास तयार झाले. त्यांतील अग्रणी म्हणजे व्यंकटेश बापुजी केतकर.

व्यंकटेश बापुजी केतकर यांनी एक आकाशीय बिंदू कल्पिला. तो बिंदू जुन्या सूर्य सिद्धांत नक्षत्र चक्र आरंभाजवळ आहे. चित्रा नक्षत्रातील स्पायका ताऱ्यापासून 180 अंशांवर येतो. त्यामुळे त्या पद्धतीला चित्रा पक्ष असे म्हणतात. त्यामुळे व्यवहारात कोणताच नजरेत भरणारा फरक पडणार नव्हता, त्यामुळेच ती पद्धत सर्वांना मान्य झाली. पुढील काळात रेवती पक्ष आणि चित्रा पक्ष या दोन्ही पक्षांच्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या पक्षांच्या समर्थनार्थ अनेक पुरावे सादर केले. त्यांचा मुख्य उद्देश पूर्वी झालेल्या वराहमिहीर, आर्यभट्ट; तसेच, इतर सिद्धांत ग्रंथकारांना कोणता नक्षत्र चक्र आरंभ अपेक्षित होता हे सांगणे. परंतु ते पुरावे नि:संदिग्ध नसल्याने कोणताच दावा पूर्णपणे मान्य होऊ शकला नाही. शेवटी, भारत सरकारने स्थापन केलेल्या कॅलेंडर रिफॉर्म कमिटीने चित्रा पक्षास मान्यता देऊन त्या वादावर पडदा टाकला.

असे असूनसुद्धा रेवती पक्षाचे अभिमानी त्यावर आधारित टिळक पंचांग वापरतात. त्या पंचांगानुसार ‘अधिक’ मास, ‘क्षय’ मास यात फरक पडतो आणि त्यामुळे सर्वच नाही पण काही वर्षांत टिळक पंचांगाच्या आणि चित्रा पक्ष पंचांगांच्या सणांच्या तारखांमध्ये फरक पडतो. तो फरक अधिक महिन्याच्या गणनेमुळे पडतो. त्यामुळे काही वर्षी (उदा. सन 2012) टिळक पंचांगानुसार गणपती ऑगस्ट मध्ये बसले आणि दाते पंचांगानुसार सप्टेंबरमध्ये ! तोच प्रकार दिवाळीच्या बाबतीत घडताना दिसतो. मग स्वाभाविक प्रश्‍न हा पडतो की नक्‍की खरे पंचांग कोणते, टिळक की दाते? वास्तविक, दोन्ही योग्यच. आपण मोजण्यास सुरुवात कोठून करतो यावर ते अवलंबून आहे. त्यामुळे गणितीय दृष्टिकोनातून पाहता दोघांत फरक काही नाही. पण पंचांग हे नुसते ग्रहताऱ्यांचे गणित नसून ते धर्मशास्त्राशी जोडलेले आहे. त्यामुळे त्या दृष्टीने अशा विसंगती लोकांमध्ये भ्रम निर्माण करतात. तेव्हा वाद विसरून सर्वांनी एकच प्रमाण मानून धार्मिक आचरण करणे योग्य.

– समाप्त

लेखक : श्री मंदार दातार 

मो. नं.  9422615876

मो  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments