डॉ.सोनिया कस्तुरे
कवितेचा उत्सव
☆ सदाफुली ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
साधेपणा तुझा हा विविधरंगी बहरतो.
प्रतिकूल समयी जीवन आस खुलवितो..!
जमीन खडकाळ पाषाण,पाणी कमी
तू उगवत राहतेस घेऊन अनोखी उर्मी
केसात माळून घेण आवडलं नसेल तुला
चरणी कुणाच्या बसणं,रुजलं नसेल तुला
फुलदाणीतही तू कधी दिसलीच नाहीस
सजवण्यासाठी वापर, तुला पटलेच नाही
स्वागतासाठी कुणाच्या सवड तुला नाही
कौतुकाची देखील तुला खबरबात नाही
ताठ मानेचे हिरवे लेणे,स्वाभिमानाने मिरवते
कोणाशी स्पर्धा नाही, मनोमनी सुखावते
सदाफुली तुझ्या जगण्यास,समरुप व्हावे,
सदा बहरत राहून,नित्य आनंद लूटावे..!
© डॉ.सोनिया कस्तुरे
5 जून 2021
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈