इंद्रधनुष्य
☆ फणसकिंग… श्री प्रदीप कोळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे – जोशी ☆
हरिश्चंद्र देसाई यांच्या ‘झापडे’ येथील बागेला दिलेल्या भेटीत उलगडला गेला तो एका अवलीयाचा “शासकीय कर्मचारी (एक्सरे टेक्निशियन) ते फणसकिंग” असा थक्क करणारा प्रवास.
एक शेतकरी वयाच्या 55 व्या वर्षी फणस लागवडीचा निर्णय घेतो. खरं तर हे निवृत्तीचे वेध लागणारे आणि नातवंडाच्यात रमण्याचे वय. पण हा माणूस या वयात देश-विदेशातील फणसाच्या जातीचा अभ्यास करतो, त्या बहुतांश फणसाच्या जातीची रोपे मिळवतो..अश्या 70 ते 80 प्रकारच्या फणसाच्या जातीची, 3000 हजार फणसाची झाडे आपल्या झापडे येथील 13 एकर जागेत लावतो.
बरं, एवढं करून एखादा माणूस फणसाच्या फळाची, त्याच्यापासून मिळणा-या उत्पन्नाची वाट पहात कोकणी शेतक-यासारखा निवांत राहील ना! पण, हा वेडा माणूस आपल्या IAS ची परिक्षा देत असलेल्या मुलाला चक्क नोकरीचा नाद सोड सांगतो. त्याला जॅकफ्रूट इंटरनॅशनल परिषदेला घेऊन जातो. मुलाचे मन परिवर्तन करण्यात यशस्वी होतो आणि मुलाच्या साथीने महाराष्ट्रातील “जॅकफ्रूटकिंग” म्हणून आपले आणि कोकणचे नाव जगाच्या नकाशावर आणतो.
बरं, हा फणसाच्या प्रेमात आकंठ बुडालेला माणूस – मग जगाला फणस लागवडीचे पर्यावरणविषयक आरोग्यविषयक फायदे पटवून देतो. उभ्या महाराष्ट्रात फणस लागवड शेतक-यानी करावी म्हणून फणसाची रोपे तयार करतो. अशी हजारो रोपे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला पुरवतो.
आता यंदा ह्या माणसाने साठी पार केली. तुम्ही म्हणाल, आता शेतकरी म्हणून याने क्षितीज गाठलंय, आता स्वतःला सिद्ध करायचे काय बाकी राहिलं आहे ? —- पण, संतुष्ट रहाणे म्हणजे जणू शरीराला जडलेली व्याधी असा ह्या माणसाचा पक्का समज असावा—–
म्हणून हा हिमाचल प्रदेशला जातो. तेथील दर्जेदार सफरचंदाची रोपे आणतो आणि आपल्या नर्सरीत लावतो. मशागत करतो. आपल्या 900 काजू झाडांच्यामधे सफरचंदाची यशस्वी लागवड करून दाखवेन, असे छातीठोकपणे सांगतो. हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यांतील चमक आणि देहबोलीतला आत्मविश्वास आपली खात्री पटवतो .
शेतीत अभिनव प्रयोग करणे आणि ते यशस्वी करून दाखवण्याचा छंद जडलेली ही वल्ली. हा एक दिवस जंगल साफ करायला घेतो आणि ठरवतो यातील एकही जंगली झाड मी तोडणार नाही, पण यातून उत्पन्नही मिळवेन.
हा याचा आणखीन एक संकल्प..! ‘या झाडांवर (नैसर्गिक स्टीक’वर) मी काळीमिरीच्या (ब्लॅकपेपर) वेली सोडेन, मी येथे कृषी-पर्यटन सुरू करेन.’ हे त्यांचे आत्मविश्वासपूर्वक बोलणे ऐकल्यावर, जिद्दीला सलाम करणे एवढे एकच काम आपलं रहातं.
फणस हेच भविष्यात माणसाचे अन्न असेल असे तत्वज्ञान सांगून हा माणूस थांबत नाही, तर पिकलेल्या फणसापेक्षा कच्चा फणस माणसाची भूक भागवेल.. असा सिद्धांत मांडत, आपल्या बागेत फणासापासून कुरकुरित चिप्स बनवायचा प्लॅन्ट टाकतो. फणसापासून बिर्याणी ते कबाब, पकोडा ते डोसा आणि आईस्क्रीम ते मिठाई आणि असेच अन्य खाद्यपदार्थ कसे बनवता येतील याचा ध्यास घेऊन माहिती घेत रहातो…
“पुरूषाचे नशीब पाते-यात” अशी एक जुनी म्हण आहे. ती म्हण हा माणूस सिद्ध करण्यासाठी जणू इरेला पेटला आहे की काय? हे यांच्या शेतीतील कारवाया ऐकून/पाहून वाटते…. चक्क फणसाची हिरवी पाने हा माणूस टनच्या टन विकतो.
आंतरराष्ट्रीय कंपनीची चालून आलेली पार्टनरशीप.. बघू नंतर म्हणून टाळतो. तर दुसरीकडे.. काजूच्या झाडांचा पालापातेरा, जो कधीच कुजत नाही, त्याचे हा खत म्हणून तयार करायच्या मागे लागतो… ही खतनिर्मीती भविष्यात फक्त हाच माणूस करू शकेल. कारण हा शेतीमधला ‘एडिसन’ आहे.
‘कल्पवृक्ष कन्येसाठी’च्या ऐवजी हा सासू-सास-यांना फणस द्या म्हणतो आणि फणस देखील कसा बहुगुणी आहे सांगत सासुरवाडीकडून आणलेल्या फणसाच्या जातीपासून “देसाई कप्पा” नावाची फणसाची नवी जात विकसित करतो आणि थेट कल्पवृक्षांच्या माहेरघरात केरळात जाऊन विकतो.
समस्या, अडचण हे शब्द या माणसाला कुठल्याही शिक्षकाने शिकवले नसावेत किंवा हा त्या दिवशी वर्गात गैरहजर असावा, यावर मी ठाम आहे. अहो, माकडांचा बंदोबस्त असो, गवा – रेड्यांचा उच्छाद असो, या माणसाकडे जालीम (रामबाण नको, संवेदनशील आहे) उपाय या माणसाकडून जाणून घ्यावा.
बरं, तांत्रिक समस्या म्हणाल तर त्यात हा टेक्निशियनचा बाप. हजारो मीटर विद्युतवहन विनाघट कसे करावे, हे प्रात्यक्षिकासह तुम्हाला दाखवून देतो..
एवढ्याने स्तंभित होऊन जाऊ नका, तुम्हाला हा माणूस फणासाची पिकलेली पिवळी पाने विकत घ्यायला लावणार आहे…. अठळा बदामच्या भावात विकणार आहे आणि फणसाचा समानार्थी शब्द हरिश्चंद्र देसाई असा तुमच्या शब्दकोषात बदल करायला भाग पाडणार आहे.
खरं सांगतो, एखाद्या फळझाडावर वेड्यासारखं प्रेम करणारी अशी व्यक्ती उभ्या आयुष्यात, @57 मी पाहिलेली नाही. या साठ वर्षाच्या तरुणाला तारूण्य, उर्जा, जिद्द, आत्मविश्वास ईश्वर मुक्तहस्ते प्रदान करेल यात शंका नाही. कारण, फणसाशी इमान राखणारा हा “फणस-राजा” हरिश्चंद्र या वरदानास पात्र आहे.
लेखक – प्रदीप कोळेकर, संस्थापक – माय राजापूर
संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈