विविधा
☆ निसर्गायन – कावळा आणि कोकीळ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
कोकिळेचा आवाज कोणाला आवडत नाही ? मला संगीतातलं ज्ञान नाही. पण असं म्हणतात की कोकिळा पंचम स्वरात गाते . मग निसर्गातील हा कोकिळास्वर ऐकून संगीतातही पंचम स्वर निर्माण झाला असावा. वसंत ऋतूत आणि पावसाळ्याच्या आरंभी कोकिळेची मधुर तान आपले मन मोहून घेते. मराठी आणि हिंदी चित्रपटात कोकिळेवर कितीतरी गीते आहेत. कितीतरी कविता आहेत. सुवर्ण सुंदरी या चित्रपटात लता मंगेशकर आणि मो. रफी यांनी गायिलेले ‘ कुहू कुहू बोले कोयलिया..’ हे गीत राग यमन, राग बहार, राग जौनपुरी आणि राग सोहनी या रागामंध्ये बद्ध आहे. १९५७ मध्ये आलेल्या सुवर्ण सुंदरी या चित्रपटातले हे गीत आजही ताजे टवटवीत वाटते.
पण मंडळी, खरंच कोकिळा गाते ? नाही. खरं म्हणजे गातो तो कोकीळ पक्षी. पण लहानपणापासून आपण कोकिळा गाते असं ऐकत आलो, त्यामुळे आपला तो समज दृढ होऊन बसतो. तुम्ही कदाचित हेही कधी ऐकलं असेल की कोकिळा हा अत्यंत आळशी पक्षी आहे. तो म्हणजे ती आपली अंडी कधीही स्वतः उबवत नाही. ती आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात ठेवून येते. पण ही एक गमतीदार कथाच आहे. साधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीला कावळे आणि कोकीळ यांचा विणीचा हंगाम सुरु होतो. याच काळात कोकिळा आणि कावळीण सुद्धा अंडी प्रसवतात. कोकीळ आणि कावळे हे तसे एकमेकांचे शत्रू. पण निसर्गाची किमया बघा. कावळीण आपल्या शत्रूच्या पिलांची अंडी तिच्या घरट्यात मोठ्या प्रेमाने उबवते. कसं घडतं हे ?
कावळे आणि कोकीळ यांचा निवास हा साधारणपणे बागा , उद्याने अशा नागरी वस्तींजवळ असलेल्या ठिकाणी असतो. आमराईमध्ये असतो किंवा तशाच झाडांमध्ये असतो. जेव्हा कोकीळ पक्षी गाऊ लागतो, तेव्हा कावळ्यांना ते सहन होत नाही. आणि ते गाणाऱ्या कोकीळ पक्ष्याला सगळे मिळून हुसकावून लावतात. कोकिळा मोठी हुशार. या कालावधीत कावळ्यांच्या घरट्यात कोणी नाही असे पाहून ती आपले अंडे तेथे ठेवून देते. आणि कावळिणीला शंका येऊ नये म्हणून तिची काही अंडी खाली ढकलून देते. कोकीळ पक्ष्याला हुसकावून लावून परत आलेल्या कावळा आणि कावळिणीच्या लक्षात ही गोष्ट येत नाही. आणि ती दोघं मोठ्या प्रेमाने ती अंडी उबवतात. आता ही अंडी उबवताना निसर्ग कशी किमया करतो ते बघा. जे कोकीळ पक्ष्याचे गाणे सुरुवातीला कावळा आणि कावळिणीला नकोसे होते, तेच गाणे आता अंडी उबवताना त्यांना हवेहवेसे वाटते. आणि तो कोकीळ पक्ष्याचा मंजुळ स्वर ऐकत त्यांची अंडी उबवण्याची क्रिया छान रमतगमत पार पडते.
अंडी उबवताना कावळा आणि कावळीण एकमेकांना सहकार्य करतात. जेव्हा कावळीण अंडी उबवत असेल तेव्हा, कावळा जवळ बसून अंडी आणि पिलांचे रक्षण करतो. कधी कधी कावळीण चारा आणण्यासाठी किंवा अन्नाच्या शोधात बाहेर जाते, तेव्हा कावळा घरट्यात बसून ती अंडी उबवतो. अशा रीतीने अंड्यांमधून पिलं बाहेर येईपर्यंत दोघांचं एकमेकांना सहकार्य असते. एकदा पिलं मोठी झाली की कावळा आणि कावळीण ते घरटं सोडून निघून जातात. माणूस जसा शेवटपर्यंत आपल्या घरातच राहतो, तसे पक्षी कायम स्वरूपी आपल्या घरट्यात राहत नाहीत. इतर वेळी झाडांवर, डोंगरांच्या कडेकपारीत त्यांची वस्ती असते. आपण लहानपणी गोष्टीत किंवा गाण्यात ऐकलेलं असतं की सकाळी पक्षी चरण्यासाठी बाहेर पडतात आणि संध्याकाळ झाली की आपल्या घरट्याकडे परत फिरतात. ‘ या चिमण्यांनो परत फिरा रे, तिन्ही सांजा जाहल्या ‘ हे गाणे आपल्याला माहिती आहे. पण हे अर्धसत्य असते. जोपर्यंत पिलं घरट्यात असतात, तोपर्यंत ते घरट्याकडे परततात. नाहीतर त्यांची वस्ती झाडांच्या फांद्यावर, ढोलीत, फांद्यांच्या बेचक्यात असते.
निसर्गात सर्व घटकांचे एकमेकांना कसे सहकार्य असते, ते पाहण्यासारखे आहे. वास्तविक कावळे आणि कोकीळ हे एकमेकांचे शत्रू असलेले पक्षी. पण निसर्ग त्यांच्याकडून आपले काम करून घेतो. कावळीण आणि कोकिळा या दोन्ही मादी पक्षी. दोन्हीही आईच्या भूमिकेत असतात. कोकिळा जरी अंडी देते आणि ती उबवत नसली, तरी तिला आपल्या पिलांची काळजी असतेच. म्हणूनच ती आपली अंडी कावळिणीच्या घरट्यात गुपचूप ठेवून येते. ती असे का करते ? तिची अंडी स्वतः का उबवत नाही ? तर ही तिची नैसर्गिक प्रेरणा असते. आणि कावळीण सुद्धा आईच. ती सुद्धा मोठ्या प्रेमाने आपल्या घरट्यातील अंडी उबवते. आपल्या अंड्यांमध्ये काही अंडी कोकिळेची आहेत, हे कदाचित तिला लक्षात येत नसावे, पण सगळीच अंडी ती मायेने उबवते. पिलांना भरवते. हे करताना तिच्यामध्ये आपलेपणा अथवा परकेपणा नसतो. म्हणजे पिलांमध्ये ती भेदभाव करीत नाही.
आपल्याला कोकिळा आवडते. कावळा आणि कावळीण आपले नावडते प्राणी. कोकिळा म्हणजे कोकीळ पक्षी आपल्याला का आवडतो, कारण तो मधुर गातो म्हणून. पण कावळा काय आणि कोकिळा काय हे दोघेही निसर्गाचे घटकच . त्यांची प्रत्येकाची भूमिका निसर्गचक्रात महत्वाची असते. कावळा हा पर्यावरण स्वच्छ ठेवणारा पक्षी.
पण आपण औद्योगिक प्रगती, वाढणारी शहरे, नष्ट होणारी जंगले, पक्ष्यांचा नष्ट होणारा नैसर्गिक निवास इ मुळे आता कावळ्यांची संख्या कमालीची कमी झाली आहे. या निसर्गाच्या सफाई कामगाराला आपण हद्दपार केले आहे. लहान मुलांना गोष्ट सांगताना आपण चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं इ सांगून लहान मुलांच्या मनात या अत्यंत उपयोगी प्राण्याबद्दल आपण अढीच निर्माण करतो, नाही का ? कावळ्याच्या काळ्या रंगात आणि कोकिळेच्या काळ्या रंगात सुद्धा तेवढेच सौंदर्य आहे, की जेवढे मोर, बगळा आणि इतर पक्ष्यांच्या रंगात आहे हे आपण मुलांना कधी शिकवणार ? पौर्णिमेची रात्र जेवढी सुंदर असते, तेवढीच सुंदर अमावास्येची रात्र सुद्धा असते. तुमच्याकडे सौंदर्य शोधण्याची नजर हवी. आणि ती नजर आपण विकसित करायला हवी. सौंदर्य फक्त गोरेपणा किंवा काळेपणात नसते. ते पाहणाऱ्याच्या नजरेत असते. पण लहानपणापासून चुकीच्या कल्पना मनावर बिंबवल्या जातात. सगळे रंग निसर्गानेच निर्माण केले आहेत. हे जर आपण निसर्गातून शिकणार नसू, तर आपल्या शिक्षणाचा काय उपयोग ? आपण निसर्गाला जेव्हा समजून घेऊ तेव्हा तो केवळ रंगांचे सौंदर्याच आपल्याला शिकवील असं नाही, तर तो विचारांचंही सौंदर्य आपल्याला प्रदान करील. आणि आपल्याला तेच हवं आहे.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈