सौ.अस्मिता इनामदार
जीवनरंग
☆ पिकलं पान – भाग – 1… सुश्री मीनाक्षी मोहरीर ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆
त्या दिवशी दुपारची गोष्ट. मी नुकतीच दुपारचा चहा वगैरे घेऊन, छान फुरसतीत घरातच कुंड्यांमधून तयार केलेल्या माझ्या बागेतील झाडं निरखत कौतुकानी त्यांना गोंजारत होते. झाडांच्या अध्येमध्ये दिसणारी पिवळी पानं माझ्या नजरेला पटकन बोचली. मी आतून कात्री घेऊन परत समोर आले तर आई घरात शिरत होती.
खूप दिवसांनी आईला आलेली बघून मी जाम खुश झाले. तिला खुर्चीवर बसायला लावत मी म्हटलं, ” आई गं, एवढं हातात घेतलेलं पूर्ण करून घेते पटकन, मग मस्तपैकी गप्पा मारत ऐसपैस बसू हं ! ”
मी हातातल्या कात्रीने कुंडीतल्या झाडांची पिवळी पानं सपासप छाटत बोलत राहिले—
” बघ नं आई, इतकी छान घनदाट, हिरवीगार झालीयेत झाडं। पण या पिवळ्या पानांमुळे झाडांची सारी शानच नाहीशी होतेय ! म्हणून आज ठरवून, सगळी पिवळी पानं छाटून टाकण्याचा उद्योग चालवलाय मी! “
माझं वाक्य संपून दोन तीन मिनिटं झाली तरी आई काहीच का बोलत नाही म्हणून मी मागे वळून पाहिलं तर, आई कसल्यातरी विचारात गढल्यासारखी, एकटक नजरेने, कापून टाकलेल्या पिवळ्या पानांकडे बघत बसली होती. तिचे डोळे मात्र पाण्याने काठोकाठ भरलेले दिसले. मला काहीच कळेना !
तेवढ्यात आई मनाशीच बोलल्यासारखी म्हणाली ” खरंच, पिवळी पानं हिरव्यागार झाडांची सारी शोभाच नाहीशी करतात. तुमच्या हिरव्यागार बहरलेल्या सुंदर संसारात आम्ही वृद्ध मंडळी पण पिवळ्या पानांसारखी विशोभित दिसत असू, नाही गं? पण पिवळ्या पानांसारखं आम्हाला काढून टाकता येत नाही. आपोआप गळून पडेल म्हणून वाट बघावी लागते एवढंच!”
” आई, काहीतरीच हं तुझं ! उगाच नाही नाही ते विचार डोक्यात घेऊन, नाराजीचाच सूर तू आजकाल लावत असतेस. अगं पिवळी झालेली झाडांची पानं कापण्याची लहानशी गोष्ट ती काय, आणि तुझे विचार कुठल्याकुठे जाऊन पोहोचले बघ ! आताशा तू खूपच बदललीयेस, हळवी झालीयेस. काय झालंय गं आई? “
मी हातातली कात्री तिथेच ठेवून, आईच्या जवळ जाऊन बसले. लहानपणीसारखा तिच्या बांगड्यांशी खेळ करत राहिले. पण आईचा मूड गेला तो गेलाच. मात्र तिच्या मनात प्रचंड उलथापालथ सुरू होती. खरं तर इतक्या लहानशा घटनेनी तिनं एवढं अस्वस्थ का व्हावं, हाच विचार मनात मी करत होते. तोच स्वत:हूनच ती परत बोलायला लागली.
” अगं मी घरातून निघताना, असलं काही सुद्धा माझ्या मनात नव्हतं.पण तुला असं ते पिवळी पानं सपासप कापताना बघून सहजच माझ्या मनात विचार आला आणि लगेच तो बाहेर पडला सुद्धा ओठातून ! बघ बेटा जरा तूच विचार कर… वाढत्या वयाबरोबर, आयुष्याच्या तिन्हीसांजेला मी कदाचित हळवी झालेही असेन, पण शांतपणे विचार केलास तर तुलाही माझं म्हणणं पटेल बघ ! कुणी मुद्दाम नाही गं करत, पण आपोआप, नकळताच आम्हा वृद्धांना किंचित का होईना वेगळी वागणूक वाटेला येतेच बघ ! ‘ आमच्या घरी नं वृद्ध, वयस्कर मंडळी आहेत ‘ असं कुणी म्हटलं तर
त्यात आदर, प्रेम जाणवतं, पण आधीच परावलंबी विद्रुप वृद्ध व्यक्तींना कुणी, ‘ म्हातारे, बुढ्ढे, थेरडे ‘ असले शब्द वापरले की मन अगदी खोलवर घायाळ होऊन जातं बघ! जितकी जास्त वर्ष जगणार तितका जास्त हा अनुभव येणार आणि मनाचा हळवेपणा जास्त वाढणार! ” आई बोलता बोलता किंचित थांबली म्हणून मी बोलायचा प्रयत्न केला.
” आई, असं काय गं आज? वेगळेच विचार डोक्यात घेऊन तू पार अस्वस्थ झालीयेस ? काही घडलंय का वेगळं विशेष?”
” नाही गं, असं काहीच नाही. आज उगाच बोलावंसं वाटलं झालं! घरात आपण अडगळीपेक्षा ‘नकोसे ‘आहोत, ही भावना मनात जागी होणं किती दु:खदायक असतं? दिवसेंदिवस वृद्धाश्रमसुद्धा किती बोकाळलेत बघ की ! बरं, त्याला तरी वृद्धाश्रम का गं म्हणायचं? “
” आई, अगं असं काय ? आपला काही संबंध आहे का त्याच्याशी?” मी खरंच काय बोलावं न समजून काहीतरीच बोलले होते, हे मलाही जाणवलं. आईनी तिचं बोलणं पुढे सुरू ठेवलं.
” अगदी अनाथाश्रमासारखाच वृद्धाश्रम हा शब्दही केविलवाणा वाटतो, पोरका वाटतो. त्या निष्पाप मुलांना निदान, त्यांचे आई-वडील कोण आहेत याची जाणीव तरी नसते.इथे मात्र कित्येकदा सारी नातीगोती असूनही केवळ
‘ घरात नको ‘ म्हणून हकालपट्टी झालेली असते, ते बघून जीव दुखतो.”
क्रमशः…
लेखिका : मीनाक्षी मोहरील
प्रस्तुती : अस्मिता इनामदार
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈