सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
कवितेचा उत्सव
☆ दान.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
आयुष्याचे दान मिळाले,
भगवंताच्या कृपेने !
मानव जन्म मिळाला,
करू आपण त्याचे सोने!!१!!
दानात दान मोठे,
असे अन्नदान !
भुकेल्या माणसास द्यावे,
अन्नाचे समाधान !!२!!
तहानलेल्याला द्यावे,
ओंजळ भरुन पाणी!
जलदानाइतके जगी,
श्रेष्ठ नाही कोणी!!३!!
अवयवदानाची महती,
आरोग्यसेवा सांगते!
गरजू अन् पीडिताला,
स्वास्थ्य मिळवून देते!!४!!
ज्यास नाही नेत्र तो,
अवघ्या सृष्टीस पारखा !
नेत्रदान देणारा तो,
बने त्याचा दृढ सखा !!५!!
कुणी देई किडनी दान,
मिळे एखाद्यास जीवदान!
प्रत्येक अवयव माणसाचा,
घेई आशीर्वादाचे दान !!६!!
रक्तदान श्रेष्ठ दान,
जगवी एखाद्याचा प्राण!
हे शरीर अपुले असे,
एक दातृत्वाची खाण !!७!!
हिंदू संस्कृती सांगे सतत,
दानाचीच महती !
बळीराजा ने दिली दान,
तीन पावलात धरती !!८!!
दानशूर कर्णाने दिले,
कवच कुंडलाचे दान !
दानाच्या महतीत मिळे,
कर्णाला अत्युच्च स्थान!!९!!
पुराण असो वा शास्त्र,
दानाची महती थोर !
या भूतली प्राणीमात्रात,
दातृत्वाचा भाव अपार !!१०!!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈