श्री सुहास रघुनाथ पंडित
विविधा
☆ महिना अखेरचे पान – 6 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
ऋतू पावसाचा म्हणजे सृजनाचा, नवनिर्मितीचा! ग्रीष्मातील मरगळलेल्या वातावरणातून बाहेर पडून पावसाच्या धारा बरसू लागल्या की निसर्गसंगीत कानावर पडू लागतं आणि पुन्हा आलेला हा पाऊस मन ओलचिंब करून टाकतो. याच दरम्यान शाळा सुरू होतात. नव्या वर्षाच्या स्वागताला , नवी पुस्तके, वह्या, दप्तरे सजून बसलेली असतात. बघता बघता पाऊस कोसळणं, मग त्यानं थोडी विश्रांती घेणं, मग पुन्हा बरसणं, हे सगळं कसं ठरल्याप्रमाणे चालू असतं.
मे च्या अखेर पर्यंत एक दोन पाऊस झाले असले तरी मान्सूनचे वेध लागतात ते जूनच्या पहिल्या आठवड्यातच. जूनच्या म्हणजेच थोड्याफार फरकाने ज्येष्ठाच्या सुरूवातीला आकाशातील पांढरेशुभ्र ढग केव्हा निघून जातील आणि गडद निळे, सावळे मेघ केव्हा अवतरतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. नक्षत्रांच्या हिशेबाने आणि हवामान खात्याच्या अंदाजाने, पावसाच्याआगमनाचा मुहूर्त काढला जातो. पण ब-याच वेळा तो पावसासारखाच बेभरवशाचा ठरतो.
त्याच वेळेला आणखी एक गोष्ट अपरिहार्यपणे घडत असते. ती म्हणजे वर्षा सहलीची चर्चा. सुट्टीची संधी साधून किंवा मुद्दाम रजा काढून , ‘कुठतरी’ जाऊन यायचं हे तर ठरलेलंच. पण हे कुठतरी म्हणजे नक्की कुठं. ?आता पंचतारांकित
हाॅटेलांना आणि शहरांना भेट द्यावी अशी कोणाचीही इच्छा नसते. इच्छा असते ती निसर्गरम्य वातावरणात मनसोक्त हिंडण्याची. निळ्याशार आकाशाखाली पसरलेल्या हिरव्यागार पसा-यात हरवून जाण्याची. कोसळणा-या धबधब्याखाली भिजण्याची.
अशा ओल्याचिंब महिन्यात आणखीही काही गोष्टी महत्वाच्या ठरतात. याच ज्येष्ठ किंवा जून महिन्यात महाराणा प्रताप आणि राजर्षी शाहू महाराज यांची जयंती असते. तर, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथि असते. थोर समाजसुधारक आगरकर, पू. साने गुरुजी यांचे स्मृतीदिन आणि संत निवृत्तीनाथ व टेंबेस्वामी यांची अवतारसमाप्तीही याच महिन्यातील. शिवाय छ. शिवरायांचा राज्याभिषेक याच महिन्यात संपन्न झाला.
वटपौर्णिमेचे पारंपारिक व्रत आणि त्यानिमीत्ताने वृक्षांचे महत्व समजून घेण्याचा आधुनिक दृष्टिकोन , वृक्षपूजनाच्या दिवशी याच महिन्यातील पौर्णिमेला सांगितला जातो. महाराष्ट्राच्या काही भागात बेंदूर म्हणजेच पोळा साजरा केला जातो. त्याला कर्नाटकी बेंदूर असेही म्हणतात. याच ज्येष्ठात पुढच्या महिन्यातीतल आषाढी एकादशीचे वेध लागलेले असतात. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवलेले असते. अवघा पालखी मार्ग विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून जातो.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही महत्त्वाचे दिवस या जून महिन्यातही असतात. एक जून हा दिवस आंतरराष्ट्रीय पालक दिन म्हणून साजरा केला जातो . पालकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 1994पासून युनोने हा उपक्रम सुरू केला.
तीन जून हा दिवस 2018 पासून आंतरराष्ट्रीय सायकल दिन म्हणून घोषित झाला आहे. व्यायामाचे महत्व पटवून देतानाच प्रदूषण टाळण्यासाठी जागृती करणे हा यामागचा उद्देश आहे. पर्यावरण रक्षण, संवर्धन याचे महत्व पटवून देण्यासाठी 1973पासून पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. सात जून हा दिवस जागतिक अन्नसुरक्षा दिन म्हणून घोषित झाला आहे. प्रत्येक टप्प्यावर अन्न सुरक्षित राहीले पाहीजे. सुरक्षित अन्न म्हणजेच उत्तम आरोग्य. हे लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने हा उपक्रम हाती घेतला आहे. तसेच या संघटनेने दहा जून हा दिवस नेत्रदान दिन म्हणून जाहीर केला आहे. दृष्टीदोष व अंधत्व याविषयी जागृती करून दृष्टीहिनांना दृष्टी प्राप्त करून देणे यासाठी हा दिवस साजरा होतो.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने 2002पासून बारा जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बालकामगार निषेध दिन म्हणून पाळण्यास सुरवात केली आहे. चौदा वर्षांखालील कामगार मुलामुलींना बालकामगार म्हटले जाते. त्यांचे शोषण थांबवून ही प्रथा बंद व्हावी यासाठी लक्ष वेधून घेणे महत्वाचे आहे.
मातेप्रमाणेच आपल्या आयुष्यात पित्याचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन पित्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृदिन साजरा होतो. भारतीय संस्कृतीत आपण माता पिता देवासमान वंदनीय मानतोच. पण पित्याविषयीची ही भावना सार्वत्रिकपणे व्यक्त करण्याची पद्धत प्रथम अमेरिकेत 1910पासून सुरू झाली. जून महिन्यातील तिसरा रविवार हा पितृदिन असतो.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविधतेने नटलेला असा हा जून (ज्येष्ठ)महिना. सृजनाशक्तीचा आविष्कार घडवणारा, पुन्हा नव्याने जगण्याची उमेद देणारा.
‘नेमेची येतो मग पावसाळा ‘ हे खरे आहेच. पण तो खर्या अर्थाने समृद्धी घेऊन येऊ दे एवढीच सदिच्छा !
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈