वाचताना वेचलेले
☆ प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे।। ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆
कन्या स्नुषा नृपांची, प्रत्यक्ष रामभार्या ।
पिचली क्षणाक्षणाला, कारुण्यरुपी सीता ।
कामी तिच्या न आले, सामर्थ्य राघवांचे….
प्रत्यक्ष वेळ येता, कोणी नसे कुणाचे ll १ ll
त्यागून सूर्यपुत्रा, कुंती पुन्हा कुमारी ।
कर्णास अनुज माता, सारेच जन्म वैरी ।
कौतुक का करावे, त्या रक्तबंधनाचे ….
प्रत्यक्ष वेळ येता, कोणी नसे कुणाचे ll २ ll
केली द्यूतात उभी, साक्षात कृष्णभगिनी ।
सम्राट पांडवांची, रानावनात राणी ।
पति पाच देवबंधू , तरी भोग हे तियेचे…….
प्रत्यक्ष वेळ येता, कोणी नसे कुणाचे ll३ll
ठेवू नको अपेक्षा, असल्या जगाकडूनी
निरपेक्ष आचरी तू, कर्तव्य प्रेम दोन्ही,
मग चालूदे सुखाने, अव्हेरणे जगाचे ।।४।।
प्रत्यक्ष वेळ येता, कोणी नसे कोणाचे..
संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈