जीवनरंग
☆ अतिथी देवो भव…भाग -2 ☆ मेघःशाम सोनवणे ☆
(आज ते बरे झाले तर उद्या सकाळी जाऊन दूध घेऊन येतील.” ) इथून पुढे —-
तिचे बोलणे ऐकून वसुभाई स्तब्ध झाले. ` या बाईने हे हॉटेल नसतांनाही आपल्या मुलासाठी राखून ठेवलेल्या दुधाचा चहा बनवला, आणि तोही मी म्हणालो म्हणून, पाहुण्यासारखे आलो म्हणून. संस्कार आणि
सभ्यतेमध्ये ही स्त्री माझ्यापेक्षा खूपच पुढे आहे .`
ते म्हणाले, “आम्ही दोघे डॉक्टर आहोत. तुमचे पती कुठे आहेत?”
त्या स्त्रीने त्यांना आत नेले; आत नुसते दारिद्र्य पसरले होते. एक गृहस्थ खाटेवर झोपलेले होते, आणि ते खूप बारीक व अशक्त दिसत होते.
वसुभाईंनी जाऊन त्यांच्या कपाळावर हात ठेवला. कपाळ आणि हात गरम होते आणि थरथर कापत होते.
वसुभाई परत गाडीकडे गेले; आपली औषधांची पिशवी घेऊन आले; दोन-तीन गोळ्या काढल्या आणि खाऊ घातल्या आणि म्हणाले, ” या गोळ्यांनी त्यांचा आजार बरा होणार नाही. मी परत शहरात जाऊन इंजेक्शन आणि सलाईनची बाटली घेऊन येतो.”
त्यांनी वीणाबेन यांना रुग्णाच्या शेजारी बसण्यास सांगितले. गाडी घेतली, अर्ध्या तासात शहरातून सलाईन, इंजेक्शन आणले आणि सोबत दुधाच्या पिशव्याही आणल्या. रुग्णाला इंजेक्शन दिले, सलाईन लावली आणि सलाईन संपेपर्यंत दोघेही तिथेच बसले.
पुन्हा एकदा तुळशी, आल्याचा चहा बनला. दोघांनी चहा पिऊन त्याचे कौतुक केले. दोन तासात रुग्णाला थोडं बरं वाटल्यावर दोघेही तिथून पुढे निघाले.
इंदूर-उज्जैनमध्ये तीन दिवस मुक्काम करून ते परत आले तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलासाठी अनेक खेळणी आणि दुधाच्या पिशव्या आणल्या होत्या. ते पुन्हा त्या दुकानासमोर थांबले . बाईंना हाक मारल्यावर दोघेही बाहेर आले आणि यांना पाहून त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, ” तुमच्या औषधांमुळे मी दुसऱ्या दिवशीच पूर्ण बरा झालो.”
वसुभाईंनी मुलाला खेळणी दिली. दुधाची पाकिटे दिली. पुन्हा चहा झाला, संवाद झाला, मैत्री झाली. वसुभाईंनी त्यांचा पत्ता दिला आणि म्हणाले, ” जेव्हा तुम्ही तिकडे याल तेव्हा नक्की भेटा.” आणि तेथून दोघेही आपल्या शहरात परतले.
शहरात पोहोचल्यावर वसुभाईंना त्या बाईंचे शब्द आठवले. आणि मग त्यांनी निर्णय घेतला.
आपल्या दवाखान्यात स्वागतकक्षात (रिसेप्शनवर) बसलेल्या व्यक्तीला म्हणाले, “आता इथून पुढे जे काही रुग्ण येतील, त्यांची फक्त नावे लिहा, फी घेऊ नका, फी मी स्वतः घेईन.” आणि रुग्ण आले की गरीब रुग्ण असतील तर, त्यांच्याकडून फी घेणे बंद केले. फक्त श्रीमंत रुग्ण पाहून त्यांच्याकडून फी घेतली जायची.
हळूहळू त्यांची ख्याती शहरात पसरली. इतर डॉक्टरांनी ऐकले तेव्हा त्यांना वाटले की यामुळे आमचे दवाखाने ओस पडतील आणि लोक आमचा निषेध करतील.
त्यांनी संघटनेच्या अध्यक्षांना तसे सांगितले. संघटनेचे अध्यक्ष डॉ. वसुभाईंना भेटायला आले आणि म्हणाले,
“तुम्ही असे का करताय? ” तेव्हा वसुभाईंनी दिलेले उत्तर ऐकून त्यांचेही मन भारावून गेले.
वसुभाई म्हणाले, “माझ्या आयुष्यात प्रत्येक परीक्षेत मी गुणवत्तेत पहिला आलो आहे, MBBS मध्ये सुद्धा सुवर्णपदक मिळवले आहे, MD मध्ये सुद्धा सुवर्णपदक मिळवले आहे . पण सभ्यता, संस्कार आणि पाहुणचारात त्या गावातील अतिशय गरीब असलेल्या त्या बाईने मला मागे टाकले आहे. मग आता मी मागे कसे राहणार? म्हणूनच पाहुण्यांच्या सेवेत आणि मानवसेवेतही मी सुवर्णपदक विजेता ठरावं म्हणूनच मी ही सेवा सुरू केली आहे. आणि मी हे सांगतो की आपला व्यवसाय मानवसेवेचाच आहे. मी सर्व डॉक्टरांना सेवेच्या भावनेने काम करण्याचे आवाहन करतो. गरिबांची मोफत सेवा करा, उपचार करा. हा व्यवसाय पैसे कमावण्यासाठी नाही. देवाने आपल्याला मानवतेची सेवा करण्याची संधी दिली आहे.”
संघटनेच्या अध्यक्षांनी वसुभाईंना नतमस्तक होऊन आभार मानले, व म्हणाले की, ” भविष्यात मीही याच भावनेने वैद्यकीय सेवा करेन.”
– समाप्त –
(मूळ हिंदी कथा माजी वायुसैनिक श्री. विकास राऊत, पुणे, यांच्या सौजन्याने.)
मूळ हिंदी लेखक – अनामिक.
मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈