सौ. अमृता देशपांडे
विविधा
☆ बोलक्या भिंती….भाग 5 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
भिंतीवर कॅलेंडर लावले जाते, हे ठीक. पण कॅलेंडरच्याच भिंती पण तयार होतात. कुठे ??????
अहो, रसवंती गृहात!
नवनाथ, गणपती, शंकरपार्वती, दत्तगुरू, साईबाबा, रामलक्ष्मणसीता, ज्योतिबा, तुळजाभवानी, अंबाबाई, तिरूपती यांच्या कॅलेंडरनीच बनलेल्या असतात त्या भिंती! हे सगळे जणू उसाचा रस प्यायला आलेले असतात, त्याचबरोबर राजेश खन्ना पासून रणवीर पर्यंत, वैजयंती मालापासून आलिया भट पर्यंत सर्व नटनट्या नटूनथटून हजर असतात. अशा रंगीबेरंगी भिंती, चिमुकली टेबले आणि बाक, चरकाच्या घुंगरांचा खुळखुळ आवाज आणि आलेलिंबू घालून केलेला तो गोड गार उसाचा रस…अहाहा! त्या छोट्याश्या जागेत केवढा परमानंद असतो, ते तिथे बसून रस प्याल्याशिवाय कळणार नाही. अजूनपर्यंत अशा भिंती शिवाय असलेलं एकही रसवंतीगृह मी बघितलं नाही.
माझ्या बाबांचे एक मित्र पोलीस होते.त्यांना भेटायला बाबा पोलीस चौकीत गेले होते, मी पण बरोबर होते. तिथे भिंतीवरचे ते गुन्हेगारांचे फोटो बघून मी इतकी घाबरले होते की त्या दिवशी जेवलेच नाही. पुढे कित्येक दिवस त्या भिंतींच्या आठवणींचा धसका मनात होता.
कारागृहाच्या भिंती हे अतिशय दारूण सत्य गुन्हेगारांना स्वीकारावंच लागतं. काळ्याभोर दगडांच्या उंच उंच भिंतींच्या आत काय आहे, हे बाहेरून कधीच कळत नाही. जगापासून दूर ठेवणा-या भिंतीही गुन्हेगारांना काही शिकवत असतील का?
क्रमशः…
© सौ. अमृता देशपांडे
पर्वरी – गोवा
9822176170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈