सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ कुंभाराचे घडे… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
एक नियंता कसा घडवितो
अनेकरंगी सृष्टीला
कुंभारच तो घडे बनवितो
आकार देतसे मनुजाला…..
प्रत्येकाचे रूप वेगळे
दैव तयांचे किती आगळे
काट्यातुनी या गुलाब फुलले
पंकामधुनी कमळ उगवले…..
कोणी मानिती सुखी स्वतःला
दुःखात बुडाले कितीतरी
सुखदुःखाचे गणित कसे हे
सोडवितो का कुणीतरी…..
आज पौर्णिमा सुखद नि शीतल
अवस उद्याची काळोखीणू
कालचक्र हे अविरत फिरते
हेच सत्य सदा ओळखी…..
मकरंद सेवतो कमलभृंग तो
दर्दूराला चिखल प्रिय भारी
कोणी टिपतो क्षण सौख्याचे
कोणी गर्तेत डुबक्या मारी…..
रंग भरावे ज्यांनी त्यांनी
असीम आहे आकाश
मेघ दाटती काळेकुट्ट
कुणा दिसे उजळता प्रकाश…..
पक्षी होऊन स्वैर उडावे
फुलपाखरासम विहरावे
जीवन आहे नितांत सुंदर
मधुकण त्यातील वेचीत जावे…..
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
२७/०६/२०२२
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈