सौ अंजली दिलीप गोखले
जीवनरंग
☆ माझा फसलेला राजकारण प्रवेश – भाग 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆
म्हणजे काय ?आपण काय करू शकत नाही ?भांडी वाली आली नाही की भांडी घासतो, धुणं धुतो, घराची सगळी सफाई करतो, इस्त्री करतो, पाण्याचं लाईट बिल सुद्धा भरतो. वर्षातून एकदा हाऊस टॅक्स ही भरतो. पाहुणे आले की त्यांचं आदरातिथ्य ठेव मानपान सगळं करतो.
मुली लहान होत्या तेव्हा त्यांचं सगळं सगळं केलं की. शाळेच्या वेळात उठवायचं, त्यांचं आवरायचं, डबे भरून द्यायचे. लगेच स्वयंपाक करायचा आणि मुख्य म्हणजे मुलींचा अभ्यास! बाप रे बाप! काय काम होतं ते. एकदा संजनाला सगळी कविता समजावून सांगितली, सगळी प्रश्न उत्तरे लिहून घेतली तिच्याकडून. हिचा झाला अभ्यास व्यवस्थित. पण माझ्यातली ‘ रजनी’ जागी झाली. मुलीला एक मी घरी शिकवलं पण बाकीच्या मुलींचं काय ?शाळेतले शिक्षक शिकवत कसं नाही? काय करायचं यांनी उरलेल्यांनी? ठीक आहे. ते काही नाही. चांगलं खडसावून विचारलं पाहिजे बाईंना. दुसऱ्या दिवशी मुलींचं आवरून झाल्यावर माझं मी पटापट आवरलं आणि शाळेमध्ये गेले. कोण बरं शिकवतो संजनाला मराठी? चौकशी करत गेले. तर काय एक बुटक्या पण हे एवढे हाय हिल्स घालून टॉक टॉक करत चालणाऱ्या साडी ब्लाउज हेअर बँड बांगड्या सगळ्या सगळ्याच मॅचिंग केलेल्या बाई समोर आल्या. बापरे, म्हटलं एक दिवस शाळेत यायचं तर सकाळी माझी किती त्रिधात रिपीट उडाली. कशी तरी एक साडी भरकन गुंडाळली आणि आले. यांना रोज काय जमतं हे सगळं मॅचिंग करायला?
“काय प्रोब्लेम आहे तुमचा?” त्या बाई माझ्यावर जवळजवळ खेकसल्याच. मी मनात म्हटलं, “अहो बाई प्रॉब्लेम माझा नाही तुमचाच आहे. ” पण वरवर हसून म्हटलं, “अहो ती अमुक-अमुक कविता त्याचे स्पष्टीकरण तुम्ही शिकवलं नाहीत मुलींना. कशी कळणार कविता त्यांना? अहो काल आमच्या संजनाला मी शिकवली मलाही दोन-तीन वेळा वाचायला लागली. “
“करेक्ट, बघा अवघड आहे की नाही कविता? कसं शिकवायचं सांगा बरं. “मराठी च्या बाईनी मलाच प्रश्न केला. मी मनात म्हटलं,” पण मग तुम्ही कशाला आहात? हा गलेलठ्ठ पगार काय फक्त मॅचींग साठी वापरता का? जरा इतरही काही वाचा. मुलींना सांगा. त्यांनाही वाचनाची गोडी लावा. “पण कुठलं काय? सुळकन निघूनही गेल्या त्या माझ्यासमोरून. आले आपली घरी. शाळा सुटल्यावर संजना घरी आली तीच मुळी मुसमुसत. “आई तू पुन्हा आमच्या शाळेत येऊ नको. तू शिकवत नाही असं का सांगितलं म्हणून बाईनी आज मला बाकावर उभ केलं. सगळ्या मुली मला हसत होत्या. तू पुन्हा कधी म्हणजे कधीच शाळेत यायचं नाहीस बघ. ” तेव्हा झालं ते झालं. त्यातला महत्त्वाचा मुद्दा काय तर मी नेतृत्व करू शकते. पुढारीपणाचे गुण माझ्यातही आहेत. म्हणजे आता निवडणुकीला उभारण्या एवढी,निवडून येण्या एवढी मी निश्चितच सक्षम महिला आहे.
मी मनानं, नक्की केले, या निवडणुकीला उभं रहायच च,निवडून यायचं आणि आपलं राजकीय क्षेत्र गाजवायचं. आपलं आपल्याला सिद्ध करायचं. नुसते महानगरपालिकेची निवडणूक लढवून थांबायचं नाही. महापौर व्हायचं. त्यानंतर राज्यसभा विधानसभा यांचीही निवडणूक लढवायची आणि खरोखरच पुढारी व्हायचं.
मग शपथविधीला जाताना आई ने दिलेली हिरवीगार साडी नेसायची. डोक्यावरुन पदर घ्यायचा. अगोबाई ती सवय आत्तापासूनच करायला हवी.
झेंडावंदन ला जाताना जाऊ बाईनी त्यांच्या मुलाच्या लग्नात दिलेली ती जिजामाता साडी नेसायची. एरवीसुद्धा सगळ्या जरी च्या साड्या वापरून टाकू. नाहीतरी आता आपल्याकडे भरपूर साड्या झाल्यात. त्यांचा वापर तरी होईल.
पुढाऱ्यांना म्हणे बंगले असतात राहायला. म्हणजे आपल्यालाही हे घर सोडावे लागेल. गाडी पण मिळेल आपल्याला लाल दिव्याची. वा !काय थाट असेल आपला !पण हे घर सोडून तिकडे बंगल्यात राहायला” हे”तयार होतील का? अवघडच आहे. काय करायचं मग? तिकडे बंगल्यात जाऊन एकटीने राहणं चांगलं दिसणार नाही ना!
क्रमशः…
© सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈