डॉ. ज्योती गोडबोले
मनमंजुषेतून
☆ अखेरचा प्रवास… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆
अनुजाचा, मायाच्या मुलीचा फोन आला. माया आमची जवळची मैत्रीण. खरे तर आमच्याहून मोठी,
पण झाली खरी जवळची मैत्रीण. अनुजा मायाची मुलगी. काय काम असेल, असा विचार करत होते, तेव्हा अनुजाचा पुन्हा फोन आला—-“ मी भेटायला येऊ का मावशी ? “ आणि अनुजा संध्याकाळी भेटायला आली.
——माया हल्ली एकटीच रहात असे. तिचा मुलगा आनंद गेली अनेक वर्षे जपानला स्थायिक झाला होता. माया आणि तिचे मिस्टरही अनेकवेळा जपानवाऱ्या करून आले होते. आनंदच्या जपानी बायकोचे आणि जुळ्या मुलींचे फोटोही बघितले होते आम्ही. अनुजाही सॉफ्टवेअर कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर होती. माया कॉलेजमध्ये प्रोफेसर होती .आणि तिचे यजमान एका कंपनीतल्या चांगल्या पोस्टवरून निवृत्त झाले होते. हल्ली खूप महिन्यात माया भेटलीच नव्हती मला. मध्यंतरी अचानकच मायाच्या यजमानांचे हृदयविकाराने निधन झाले, तेव्हा आम्ही सगळ्या भेटून आलो होतो.
माया स्वतःच्या मोठ्या फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. मायाने आपला छान ग्रुप जमवला होता. कधी ते ट्रीपला, कधी कोणाच्या farmhouse वर जात. एकटी राहणारी माया चांगली खम्बीर होती. तिचे आयुष्य तिने छान बेतले होते. तिच्या मैत्रिणी, कॉलेजचे मित्रमंडळी–अगदी व्यस्त असे दिनक्रम मायाचा. पैशाची ददात नव्हती, आणि
हौसही होतीच. कधीतरी आम्हालाही भेटायची माया. पण गेल्या जवळजवळ वर्षभरात भेट झालीच नव्हती तिची.
अनुजाचे काय काम असावे या विचारात मी पडले. अनुजा आली आणि म्हणाली, “ मावशी वेळ न घालवता, मुद्द्याचेच बोलते. बाबा गेले तेव्हा अतिशय धीराने घेतले आईने. मी, दादा,म्हणालो,आई एकटी राहू नको, आमच्या घरी ये राहायला. पण ती म्हणायची,अरे तुम्ही आहातच की. पण होतंय तितके राहीन की मी. तुम्ही मुले काय रिकामी आहात का. आणि येतेच की मी अधूनमधून.” आम्हीही याला कधीच हरकत घेतली नाही. मी दर आठ्वड्याला चक्कर मारतेच. पण गेल्या वर्षभरात आईमध्ये हळूहळू बदल होताना दिसला मला. मावशी, तिचे लक्षच नसते आम्ही बोलतो त्याच्याकडे.अस्वस्थ हालचाल करते बोटांची. घरही पूर्वीसारखे छान आवरलेलेले नसते. अशी आई कधीही मी बघितलेली नाही ग. ती हल्ली स्वयंपाक तरी नीट करते की नाही, जेवते का नाही ,तेही मला माहित नाही.”
“अनुजा,तू असे कर. काही दिवस तुझ्या घरी रहायला घेऊन जा, म्हणजे तुला ती चोवीस तास कशी रहाते हे नक्की समजेल. तिने विरोध केला,तरी नेच तिला. मला दर आठवड्याला फोन करून कळवत मात्र जा हं.”
अनुजाने मायाला तिच्या घरी नेले. नातवंडांनी उत्साहाने स्वागत केले आजीचे. त्यांना पूर्वीची आजी हवी होती.
पण आत्ताच्या आज्जीमध्ये लक्षात येण्याइतका बदल झालेला त्यांनाही जाणवलाच . अनुजाने मायासाठी दिवसभराची बाई ठेवली. नशिबाने त्या बाई खरोखरच चांगल्या मिळाल्या. मायाबरोबर त्या पत्ते खेळत, तिला पुस्तक वाचायला बसवत. मायामध्ये जरा सुधारणा होत असलेली दिसली.औषधेही चालू केलेली होतीच.
मध्यंतरी महिनाभर बाई रजेवर गेल्या. आता मायाला २४ तास कोण कसे देऊ शकणार होते? पुन्हा माया तिच्या कोशात गेली. हळूहळू मायाचे बोलणे कमी झाले. टक लावून नुसती बघत बसायची.
“आई,अग घास घे ना, चावून खा ग.” मायाला हळूहळू तेही उमजेनासे झाले.दैनंदिन नैसर्गिक विधीवरचा तिचा ताबा सुटला. अनुजाने अथक प्रयत्न केले. बायकाही ठेवल्या. पण ते अनुभव काही फारसे चांगले आले नाहीत.
मायाचे घर तर केव्हाचेच बंद झाले होते. एकदा अनुजाने मायाला त्या घरी नेले. तिच्या फ्लॅटजवळ आल्यावर माया नुसतीच भिरभिर बघत राहिली. शेजारच्या काकू भेटायला आल्या.“ मायाताई,चला आमच्याकडे कॉफी प्यायला.” काकूंनी प्रेमाने हात धरला. मायाने तो हिसडून टाकला,आणि ‘या कोण’ असे मुलीला विचारले.
‘ घरी– घरी ‘असे पुटपटू लागली. काकू हे बघून घाबरूनच गेल्या. हताश होऊन अनुजा मायाला घरी घेऊन आली.
आता अनुजालाही आईला सांभाळणे अतिशय अवघड होऊन बसले होते.
अशी चार वर्षे गेली. मध्यंतरी आनंद येऊन भेटून गेला.“अनुजा,काहीही झाले तरी आईला वृद्धाश्रमात ठेवायचे नाही हं.” असे बजावून गेला. अनुजाला भयंकर रागही आला,आणि दुःख तर झालेच.’ काय हा मुलगा. आज इतकी वर्षे मी एकटी आईला सांभाळते आहे,कधी चौकशी केली का? किती ,कोणत्या अवघड परिस्थितीतून मी जातेय
याची ‘– माझा नवरा देव माणूस आहे,तोही आईचे सगळे करतो. मला फक्त हा उपदेश करून आनंद मात्र निघून गेला. वावा.” अनुजाचा तोल सुटला होता . ती आनंदला म्हणाली होती ,” हो का? मग जा घेऊन जपानला. करते का बघू तुझी ती बायको. हे बघ आनंद, मला हौस नाही आईला वृद्धाश्रमात ठेवायची. पण तो निर्णय मी घेईन.पुन्हा मला असले सल्ले देणार असलास तर तू न आलेलाच बरा .”
एक दिवस माया बाथरूममध्ये पाय घसरून पडली. खुब्याचे हाड मोडले आणि तिच्या यातनांना पारावार उरला नाही. हाडे इतकी ठिसूळ झाली होती की डॉक्टर ऑपरेशन करायला तयार होईनात. अनुजाने एका चांगल्या नर्सिंग होममध्ये मायाला हलवले. दिवस दिवस माया नुसती पडून राहू लागली.
आम्ही मैत्रिणी तिला भेटायला गेलो.“ माया,लवकर बरी हो ग. पुढची भिशी तुझ्याकडे करायचीय ना ?”
मायाच्या डोळ्यातून नुसतीच धार लागली. तिला बोलता तर येत नव्हतेच. खूप वाईट वाटले आम्हाला.
आणि आमच्याही भविष्याच्या सावल्या भेडसावू लागल्या. सगळ्यांचीच मुले दूरदेशी. “आज निदान अनुजातरी आई जवळ आहे, मला कोण आहे ग?” निर्मला हताशपणे म्हणाली. निर्मलाला दुर्दैवाने मुलं झालीच नाहीत.
मायाचा प्रवास झपाट्याने उतरणीकडे सुरू झाला. तिला फीडिंग ट्यूबने अन्न भरवावे लागू लागले. तिच्याकडे जाऊन आले, की खरोखरच वाईट वाटे. एका उमद्या,आनंदी जीवाची ही परवड बघवेनाशी झाली.
आणि एक दिवस अनुजाचा फोन आला, “ मावशी,आई गेली. तुझ्या ओळखीच्या नेत्रपेढीचा फोन नंबर दे. आईचे नेत्रदान करणार आहोत.”
आम्ही सगळ्या तिचे अखेरचे दर्शन घ्यायला गेलो. ‘ सुटली बिचारी,’ असेही वाटले.
—–पण असे आयुष्य तिच्या काय, कोणाच्याच वाट्याला येऊ नये असे वाटून आमचा जीव नुसता कासावीस झाला.
अनुजाच्या पाठीवर सांत्वनाचा हात ठेवून, काहीच न बोलता, आम्ही आपापल्या घरी परतलो —–
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈