डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटरचा मामा…!! – भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(“ खरं म्हणता काय ??? “ — तिच्या चेहऱ्यावर अविश्वास होता.) इथून पुढे —-

आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतक्या वेळा ती ओरबाडली गेली होती की, कोणताही ” मोबदला ” न देता कुणीतरी मदत करू शकतो, या गोष्टीवर आता तिचा विश्वासच नव्हता… 

“ होय ताई… खरं म्हणतोय …” 

तरीही या पार्श्वभूमीवर, तिचा माझ्यावर इतका सहजासहजी विश्वास बसणं शक्यच नव्हतं… !

ओरबाडणाऱ्या लोकांच्या यादीत तेव्हा तिने माझं नाव टाकलं असावं, हे तिच्या वागण्यावरून मला स्पष्ट जाणवत होतं….

यानंतरच्या प्रत्येक भेटीत चिऊताईने मलाच उलट सुलट आजमावण्याचा प्रयत्न केला…. 

यानंतरच्या प्रत्येक भेटीतून मी तिचा थोडा थोडा भाऊ होत गेलो…. आणि ती थोडी थोडी ताई होत गेली… !

मी ” भाऊच ” असल्याची जेव्हा “ तिची ” पूर्ण खात्री पटली, त्या दिवशी तिने तिच्या “चिमणीची” आणि माझी भेट घडवून आणली.

तो दिवस होता शनिवार… २ जुलै २०२२ !

माझ्यासाठी हा दिवस म्हणजे फक्त तारीख किंवा वार नाही…

माझ्यासाठी तो माझा जन्मदिवस होता…! माझा विजय दिन होता…!! 

कारण याच दिवशी तर चिऊताईच्या मनामध्ये भाऊ म्हणून माझा जन्म झाला होता…माझ्याबद्दल विश्वास निर्माण झाला होता…आणि म्हणून इतकी वर्षे लपवून ठेवलेल्या “चिमणीला” तिने माझ्यासमोर आणलं होतं …

 “ मामाच्या पाया पड…”  चिऊताई ने माझ्यामागून चिमणीसाठी बोललेले हे “तीन” शब्द…! 

तिच्या या तीन शब्दांनी ” तीनही जगाचा स्वामी ” या शब्दाचा खरा अर्थ मला तेव्हा कळला….

चिमणी खरोखरीच गोड मुलगी होती…. ! चिखलातच कमळ फुलतं हेच खरं…. !

यानंतर सर्व चक्र भराभर चालवून, अक्षरशः सोमवारी 4 जुलै रोजी या चिमणीचं, पुण्यातील नामांकित कॉलेजात वर्षाची संपूर्ण फी भरून ” बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन ” (BBA) साठी  ऍडमिशन पक्कं केलं…

यात माझा सहकारी मंगेश वाघमारे याचे योगदान फार मोलाचं आहे….! 

चिमणीच्या नकळत… चिऊताईच्या कानात म्हणालो, “ हे भीक मागणं सोड आता, एखादा व्यवसाय कर घरबसल्या….. मी टाकून देतो….कारण आता येत्या तीन वर्षात एका बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटरची तू आई होणार आहेस…. भीक मागणं शोभत नाही तुला…. त्यापेक्षा एखादा बिझनेस टाक…”

चिऊताई सुखावली….! ‘ व्हय, ‘ म्हणत तिनं डोळ्याला पदर लावला होता…. ! 

इकडे ऍडमिशन पक्कं झाल्यानंतर…चिमणी, ऍडमिशन पक्कं झाल्याचा कागद माझ्या तोंडापुढे फडफडवत म्हणाली, “ बघ मामा, मी आता BBA होणार… आहेस कुठं?” – ती उड्या मारत होती…. 

मी पण मग उड्या मारत तिला म्हणालो, “ गप ए शाने, मी पण आता “बिजनेस ऍडमिनिस्ट्रेटर” चा मामा होणार… आहेस कुठं….???”

यानंतर चिमणी रडत… भावुक होत, माझ्या उजव्या खांद्याशी येऊन उभी राहिली….माझा सहकारी मंगेश याने लगेच मोबाईलचा कॅमेरा चालू करून हा क्षण टिपण्याचा प्रयत्न केला….

तेवढ्यात तिकडून चिमणीच्या आईचा, म्हणजे चिऊताईचा हसत आवाज आला….

“मंगेशा…थांब रं बाबा … काटी अन् घोंगडं घिवून द्या की रं…. मला बी जत्रला यीवून द्या की रं … !”

चिऊताई मग माझ्या डाव्या खांद्याशी बिलगली…. ! मंगेशने काढलेल्या फोटोचा “क्लिक” असा आवाज आला… आणि त्याबरोबर हा क्षण माझ्या मनात अजरामर झाला…! 

आमची “जत्रा” झाली होती…. ! फोटो काढताना चिमणी माझ्या कानाशी येऊन म्हणाली, “ मामा आता आम्हाला सोडून कुठे जाऊ नकोस बरं का ..” 

मी तिला म्हणालो, “ मी कुठे जाणार नाही… पण तूच सोडून जाशील आम्हाला … !” 

“ मी का जाईन तुला आणि आईला सोडून ?” तिच्या भाबड्या चेहऱ्यावरचा, भाबडा प्रश्न…. ओठांचा चंबू करून तिने मला बाळबोधपणे  विचारला…

“ अगं म्हशी…. लगीन करशील का नाही ? तेव्हा कन्यादान मलाच करावं लागणार आहे ना…. ? 

तू तेव्हा खूप मोठी झालेली असशील…. पण तेव्हा या “गरीब मामाला” आणि तुझ्या “आईला” विसरू नकोस बरं…!! “

यावर या चिमणीने रडत… मला घट्ट मिठी मारत… म्हटलं , “ माझा मामा गरीब नाही…..खूप “श्रीमंत” आहे “. 

तिच्या या वाक्यानं माझ्यासारखा  ” भिकारी डॉक्टर ” एका क्षणात ” श्रीमंत ” झाला…! 

पलिकडे चिऊताईने तिच्या डोळ्याला पदर लावला होता…. 

आणि मी ” बिझनेस / मॅनेजमेंट ऍडमिनिस्ट्रेटरचा ” मामा असून सुद्धा… डोळ्यातल्या वाहणाऱ्या अश्रूंना ” मॅनेज ” करू शकलो नाही…. !

काही गोष्टी मॅनेज करणं कुठं आपल्या हाती असतं ….??? 

— समाप्त —

© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments