विविधा
☆ तारा…भाग – 5 आणि 6 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆
भाग – ५
वालीचे अन्यायाचे वागणे पाहुन, तारा वालीला म्हणाली, “स्वामी! मतंगऋषींचा शाप आधीच डोक्यावर आहे, त्यात पतिव्रता रुमाचा शाप कां घेता? या मोठ्या पापातून सुटका होऊ शकणारा नाही. हा अविचार सोडून द्या.” पण वालीला ऐकायचे नव्हते, ऐकलेच नाही त्याने. विनाश काले विपरीत बुध्दी..
तारा ही अत्यंत सुंदर, गुणी स्त्री होती. वालीमधील शौर्य, पराक्रम, धाडस अशा त्याच्या अनेक चांगल्या गुणांवर लुब्ध होती. त्याच्यातील गुणांची तिला पारख होती. त्याबद्दल तिला अत्यंत सार्थ अभिमानसुध्दा वाटत असे. परंतु वालीचा आत्यंतिक संतापी, हेकट, अन्यायी, दुर्गुणाकडे कल असणार्याद स्वभावाने तिच्या मनाला सतत काळजी वाटे. हे सर्व पाहुन तिच्या मनांत विचार आला, ‘सुग्रीवाला अधीक दुःख कशाचं झालं? राज्य गमावल्याचं की, पत्नी गमावल्याचं? रुमाच्या बाबतीत ते घडल! शेवटी दुर्दशा भोगावी लागते स्त्रीजातीलाच ना?
राक्षसांचा सम्राट लंकाधीश रावणाने सर्व राजांना जिंकण्याच्या महत्वाकांक्षेने प्रत्यक्ष देवराज इंद्रावर स्वारी केली. त्याच्या मुलाने, मेघनादने इंद्राला जिंकले. सर्व राजांना जिंकण्याच्या अभिलाषेने वालीवर देखील आक्रमण केले. पण वालीचा पराक्रम व अतुल ताकद, युध्दकौशल्य एवढे जबरदस्त होते की, रावणाला शस्त्र खाली ठेवुन त्याला शरण जाऊन शस्त्र खाली ठेवावे लागले.
रावणासारख्या बलाढ्य व प्रबळ शत्रुला देखील नमवून आपला पती वालीने त्याला शरण येण्यास भाग पाडले याबद्दल ताराच्या मनांत नितांत, आदर व कौतुक होते आणि म्हणूनच त्याच्या गुणांचे चीज व्हावे, तो सन्मार्गावर यावा यासाठी ती सतत प्रयत्नशील असायची पण यश तिच्यापासुन नेहमीच दूर पळत असे. वाली तिचे कांहीच ऐकत नसे आणि आपल्या हेकट, दुराग्रही स्वभावात बादल करत नसे.
एकदा तारा आपल्या महालांत निवांत बसली असता तिचा पुत्र अंगद येऊन सांगू लागला की, “तो मित्रांसोबत मतंगवनाच्या आजुबाजुला हिंडत असतांना त्रृषमूक पर्वतावर सुग्रीव काका दिसलेत. त्यांच्या मागे वीर हनुमान उभे असुन दोन सुंदर तेजस्वी राजकुमार त्यांच्याशी अत्यंत प्रेमाने गप्पा मारतांना दिसले. गुप्तहेरांकरवी चौकशी केली असतां दोन राजकुमार म्हणजे प्रत्यक्ष अयोध्या नरेश दशरथ यांचे दोन सुपुत्र असल्याचे कळले.
श्रीरामाची पत्नी सीताचे हरण करुन लंकाधीशपती सम्राट रावणाने तिला लंकेत नेऊन ठेवले आहे. तिच्या शोधार्थ हे दोन वीर हिंडत हिंडत तिथे आलेत. त्यांची सुग्रीव काकांशी मैत्री होऊन दोघांनी परस्परांना मदत करण्यासाठी अग्निसमोर आणाभाका, शपथ घेऊन वचनबध्द झालेत.
भाग – ६
श्रीराम-सुग्रीवाची युती झाल्याचे वृत्त ताराने ऐकले मात्र ती अतिशय संचित झाली. अंगदला म्हणाली, “अंगदा! तुझ्या वडलांना अनेक वेळा परोपरीने विनवून सांगीतले की, रुमादेवीला सुग्रीवाकडे पाठवुन द्यावे, परस्त्रीचे अपहरण करणे, तिची अभिलाषा धरणे फार मोठे पाप आहे. अशा पापाचे घोर प्रायश्चित्त भोगावेच लागेल. पण हटवादी स्वभावामुळे माझ्या बोलण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.”
अंगद म्हणाला, “आई! श्रीराम देवासमान सुंदर, दयाळू, करुणामयी वाटतात.” ती म्हणाली, “श्रीरामाबद्दल सर्व माहित आहे मला. श्रीराम हे आर्त, दुःखी जणांचे आश्रयदाते आहेत. ते यशस्वी, ज्ञानविज्ञान संपन्न, पित्याच्या आज्ञेत राहणारे आहेत. हिमालय ज्याप्रमाणे अनेक रत्नांची खाण आहे, त्याप्रमाणे श्रीराम अनेक गुणांची खाण आहेत. असे श्रीराम सुग्रीवाचे झाले तर…. तुझ्या पित्याचा भविष्यकाळ फार गंभीर आहे. भविष्यातील संकटाची चाहुल लागत आहे.”
तारा अतिशय विकल मनःस्थीतीत अंगदाला म्हणाली, “अंगदा! तुझ्या वडिलांमधे अनेक सद्गुण असून ते फार पराक्रमी, शूर, धाडसी आहेत. ते वानराचे राज्य उत्तम रितीने चालवत आहेत म्हणूनच आज ते सर्व वानरांचे सम्राट आहेत. परंतु त्याचबरोबर त्यांनी कांही नीतिनियम पाळले असते, कांही धर्म मर्यादा मानल्या असत्या, तर त्यांच्यासारखा पुरुषोत्तम दुसरा कुणी नसता आणि माझ्या सारखी भाग्यवान स्त्री त्रिभुवनात दुसरी कुणी नसती! परंतु विधिलिखीत कुणाला टळले आहे? मातंग ऋषींचा अपमान व शाप, रुमासारख्या पतिव्रतेचा छळ, तिचा तळतळाट, माझ्या संसारसुखा भोवती एखाद्या काळसर्पाप्रमाणे वेटोळे घालुन बसला आहेसे वाटत आहे…..
सुग्रीवाने आपली अत्यंत करूणामय कर्मकहाणी श्रीरामांना सांगून म्हणाला, “हे प्रभु! तुझी पत्नी रावणाने पळवली आणि माझी पत्नी माझ्या मोठ्या भावाने वालीने! शिवाय राज्यातुन निष्कसित केले. माझी अवस्था दोर तुटलेल्या पतंगासारखी झालेली आहे.” श्रीरामाने सुग्रीवाला आश्वस्त केले. दोघांनी एकमेकांना मदत, सहाय्य करण्याच्या आणाभाका घेऊन आपापल्या समस्या सोडविण्याचे ठरविले.
सुग्रीव रामाला म्हणाला, “वाली भयंकर कोपिष्ट, शिघ्रकोपी, हट्टी व बलाढ्य आहे. त्याचा उच्छेद झाल्याशिवाय माझा मार्ग निष्कंटक होऊ शकणार नाही. तो सुखाने जगू देणार नाही.”
ताराला मिळत असलेल्या भविष्यातील घटनेच्या भाकिताप्रमाणे ती काळरात्र आलीच. रामाने द्वंद्व युध्दासाठी वालीला आव्हान द्यायला सुग्रीवाला सांगीतले. रामाच्या आज्ञेनुसार एका रात्री सुग्रीव किष्किंधेच्या परिसरांत येऊन दंड थोपटून मोठमोठ्याने आरोळ्या ठोकत, सिंहनाद करत वालीला आव्हान देऊ लागला. यावेळी वाली ताराबरोबर अंतःपुरात होता. सुग्रीवाचा आव्हानात्मक आवाज ऐकुन प्रथम तर त्याला अतिशय आश्चर्य वाटले. सुग्रीव सारखी साधी, सालस, व्यक्ती युध्दाचे आव्हान देते, हेच मुळी त्याला खरे वाटत नव्हते. नंतर तो अत्यंत संतप्त होऊन, धडा शिकवण्याच्या निश्चयाने सुग्रीवाचे आव्हान स्विकारण्यासाठी अंतःपुरांतुन बाहेर येऊ लागला.
संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈