डॉ.सोनिया कस्तुरे
कवितेचा उत्सव
☆ संसार दोघांचा… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
तू म्हणतोस संसार दोघांचा,
मग दोघ मिळून करु या ना..!
तू चूल पेटवं , मी भाकरी करते,
तू भाजी चीर, मी फोडणी देते,
मी कपडे धुते, तू वाळत टाक;
तू म्हणतोस संसार दोघांचा
मग दोघं मिळून करु या ना..!
भातुकलीत मी स्वयंपाक केला,
आता ही मीच सगळं करते ;
झोपडीत तर मी खूप राबते,
महालात ही मीच..!
तू म्हणतोस घर दोघांचं,
घर काम ही मिळून करु या ना,
तू म्हणतोस संसार दोघांचा
मग दोघ मिळून करु या ना..!
मी आई हे “सत्य” ,
तू बाप हा “विश्वास”
मी जन्म देणं निसर्ग नियम,
तू संगोपनाला हातभार लाव ना,
सत्य आणि विश्वासाने
मिळून मुलांना घडवूया ना..
तू म्हणतोस संसार दोघांचा
मग दोघ मिळून करु या ना..!
तुझ्या सुखदुःखाची मी सोबती
घराच घरपण मी, म्हणतोस,
मी थोडी “बाप” होते
तू थोडा “आई” हो…
मी तुझी आर्धांगिनी
तू माझं अर्धांग हो ना..
तू म्हणतोस संसार दोघांचा
मग दोघं मिळून करु या ना..!
© डॉ.सोनिया कस्तुरे
27/09/2019
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूप छान आणि छंद बद्ध