? विविधा ?

☆ तारा…भाग – 8 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆

वाली-सुग्रीवामधे भयंकर घनघोर युध्द सुरु झाले. वालीच्या पराक्रमापुढे सुग्रिवाचा टिकाव लागेनासा झाला. सर्व वानरसेना एका बाजुला उभे राहुन दोघांचे द्वंदयुध्द पाहत होती. वालीच्या आघाताने सुग्रीव असहाय्य होऊन खाली कोसळला. वाली आतां त्याच्यावर निर्णायक वार करणार एवढ्यात सालवृक्षाच्या बुंध्याआड लपलेल्या रामाने वालीवर बाण सोडला. काय घडले हे कळायच्या आतच वालीचा प्रचंड देह धरणीवर कोसळला. बाजुला अभं राहुन पाणावल्या डोळ्यांनी सुग्रीव हे दृष्य पाहत होता. वालीसारखा बलाढ्य, महापराक्रमी योध्दा कोसळल्याचे पाहतांच सर्व वानरसेना भयाने रणांगणातून पळून जाऊं लागली.

कांही वानरप्रमुख वाली पडल्याचा दुःखद समाचार सांगण्याकरितां धावत ताराकडे आले. हे वृत्त ऐकुन तारा दुःखाने अतिशय व्याकुळ झाली. अंगदसोबत धावत नगरीबाहेर युध्दस्थळी आली. पाहते तो काय… सर्व वानरसेना व मंत्रीगण, सेनापती मरणाच्या भीतीने पळून जातांना दिसले, एवढ्या दुःखातही ताराने सर्वांना थांबायला सांगून संतापाने विचारले, “तुम्ही वीर ना? वाली राज्यावर असतांना त्याच्या बाहुबलाच्या आश्रयाने निश्चिंतपणे सुखाने बिनधास्त राहत होतात! आता हा वीर मरणोन्मुख झाल्याचे पाहतांच भ्याडाप्रमाणे पळून जाताहात! सुग्रीवाकडुन तो पराजीत झाला म्हणुन प्राणभयाने पळ काढतां?”

भयभीत होऊन वानर ताराला म्हणाले, “देवी! प्रत्यक्ष यमधर्मच रामाच्या रुपाने आलेले आहेत, तुम्ही सुध्दा पुढे न जातां अंगदचे रक्षण करा.”

तारा एक श्रेष्ठ वीरपत्नी होती. धैर्यशील होती. ती म्हणाली, “वानरराज वाली गेले, माझे सर्वस्व गेलं. माझं सौभाग्य गेलं. आतां  पुत्रमोह, राज्य, जीवन कशाचेच प्रयोजन उरले नाही. मी फक्त माझे पती वालीराजांच्या चरणावर समर्पित होणार!”

राम लक्ष्मण आपली धनुष्ये जमीनीवर टेकवून हे दुःखद दृष्य बघत उभे होते. सुग्रीव अतीव दुःखाने मुर्च्छित होऊन वालीजवळ जमीनीवर पडला होता. तारा अत्यंत विकलावस्थेत धावत ओरडत वालीजवळ आली. वालीला पाहतांच त्याचे डोके मांडीवर घेऊन बसली व शोक करुं लागली. अंगदालाही शोक आवरेनासा झाला. सावध झालेल्या सुग्रिवाला तारा अंगदचा शोकविलाप पाहुन त्याचाही शोकपूर वाहु लागला.

तारा विलाप करत, रडत, अविचल वालीला म्हणाली, “वीरा! आपण बोलत कां नाही? आपण मिळवलेल्या सार्या  वैभवाचं काय करायचं? माझा सारा आनंद, सौख्य लुटला गेला. माझे हृदय फाटुन कां जात नाही? आपण रुमाचे अपहरण केलेत त्याचे तर हे फळ नसेल ना? मी आपणांस अनेक वेळा, अनेक हितकारी गोष्टी सांगतल्या, दुष्प्रवृत्तीपासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण आपण कधीच माझे ऐकले नाही. श्रीरामाच्या बाणाने मारले  गेलात. मला दीनता आली. असे वैफल्यपूर्ण, दयनीय, जीवन मी कधीही जगले नाही. एवढ्या मोठ्या दुःखाचा अनुभव नाही. वैधव्यजीवनच मला कंठावे लागणार ना?”

“बोला ना स्वामी! बोला ना माझ्याशी, आपल्या लाडका पुत्र अंगदशी बोला! सुग्रीव! आता निष्कंटक कर राज्य!”

एवढं बोलुन ती वालीजवळच आमरण ऊपोषणाला बसली.

क्रमशः…

संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments