विविधा
☆ तारा…भाग – 9 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆
सती साध्वी ताराचा करुण विलाप ऐकुन आणि तिचा मरणांतीक उपोषणाचा निश्चय पाहून हनुमान पुढे आले. ताराची योग्यता हनुमान जाणून होते. ते ताराला समजावत म्हणाले, “देवी, जन्म मरण प्रत्येकालाच आहे. त्यासाठी शोक करणे कितपत योग्य आहे? आपण तर विदुषी आहात ! जन्म मृत्युची परंपरा जाणता ! वालीराजांचा जीवनाचा अवधी संपल्यामुळे त्यांना वीरगती प्राप्त झाली. आपण महासती, महाविद्वान आहात, आपणाला मी काही सांगणे म्हणजे सूर्याला काजवा दाखवण्यासारखे आहे. आपण ज्ञानसंपन्न विदुषी, विवेकी, विचारी, धीरगंभीर, शांत मनस्विनी आहात.”
” कुमार अंगदच्या भविष्याचा विचार करुन आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करावे. अंगद आणि सुग्रीव दोघेही दुःखी आहेत. त्यांचे सांत्वन आपल्याशिवाय कोण करणार? कोण आधार देणार त्यांना? आता या राज्याची स्वामिनी आपणच आहात. कुमार अंगदची आणि सर्व वानरांची माता होऊन, आपले दुःख, शोक, बाजूला ठेवून खंबीरपणे उभे राहून वानरांचे हे राज्य आपल्याला सांभाळायचे आहे , मार्गदर्शन करायचे आहे. वालीराजांच्या पारलौकिक कार्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते आटोपल्यावर कुमार अंगदला राजसिंहासनावर बसवावे.”
त्यावर तारा म्हणाली, ” मला आता कशाचाही मोह नाही. या सर्व ऐहिक सुखाची विरक्ती आलेली आहे. अंगदसाठी काय करायचे ते, त्याचे काका सुग्रीव पाहण्यास समर्थ आहे. पुत्रमोहात अडकण्यापेक्षा पतीधर्मानुसार त्यांच्यासोबत सती जाणे हेच मी माझे कर्तव्य समजते.”
यावेळेपर्यंत वालीला किंचित शुध्द आली. ही शुध्द त्याची शेवटचीच शुध्द होती. श्वास घ्यायला त्रास होत असतांना खोल आवाजात मोठ्या प्रयत्नपूर्वक तो सुग्रीवशी बोलू लागला. ” माझ्या अंतिम समयी जेव्हा मी यमलोकी महानिर्वाणाला निघालो तेव्हा याक्षणी माझेकडून घडलेले पातक, अविचार, अत्याचार सर्व आठवून माझाच मला धिक्कार वाटत आहे. सुग्रीवा ! तुझे माझ्यावर असलेले अपार प्रेम मी कधी समजून घेतलेच नाही. तुझ्याबद्दल विनाकारण गैरसमजाने आकस ठेवून वैर केले. तुला देशोधडीला लावले. आपण प्रेमाने राहिलो असतो तर अश्या दुर्घट प्रसंगाला सामोरे जावे लागले नसते. परंतु आता तर पश्चातापालाही अवधी उरला नाही.”
“अंगदला स्वतःचा पुत्र समजून त्याचा सांभाळ कर ! तो तेजस्वी, पराक्रमी, शूर आहे. सुषेन वानरराजाची कन्या तारा, हिच्याजवळ अशी आंतरिक शक्ती आहे की, भविष्यात घडणार्या चांगल्या वाईट घटनांची सूचना तिला आधीच मिळते. निसर्गामधे व मानवी जीवनात अनेक उत्पात होतात. त्याबाबत तिने दिलेला कोणताही सल्ला हितकारक ठरतो, जो मी कधीच ऐकला नाही, त्याचे फळ माझ्या रुपाने तुझ्यासमोर आहे. ताराने दिलेला, केलेला उपदेश आणि सल्ला कोणताही किंतु, संशय मनांत न ठेवता ऐक आणि प्रत्येक कार्य तिच्या सम्मतीनेच कर !”
वालीचे बोलणे तारा ऐकत होती आणि ओक्साबोक्शी रडत होती. वालीने अंगदला जवळ घेतले. त्याचा हात हातात घेऊन म्हणाला, ” श्रीरामाचे कार्य देवकार्य समजून त्यांना मदत कर…”
ताराकडे पहातच वालीचे प्राणोत्क्रमण झाले. एक बलशाली तारा निखळला !
क्रमशः…
संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈