श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
कवितेचा उत्सव
☆ जिव्हाळा… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
विवाहा नंतर
प्रथमच आली ती माहेरी
आली तशी वळली तिच्या खोलीकडे
मी पाहिली तिची अवस्था
न्याहळते ती आपले जुने विश्व
तिचे कपाट, टेबल, पुस्तके आणि पलंग
आहे तिथेच पहिल्याप्रमाणे
पण काहीतरी हरविल्याची भावना
जाणवतेय तिच्यात
वस्तू रूपाने सर्व आहे तसेच
पण तो अधिकाराचा ओलावा
सुकला का परंपरांच्या तापाने
की दुरावल्याची सूचना करताहेत
त्या तिला
की असून नसल्याचा संदेश देताहेत तिला
ती पुढे सरकली,
फिरवते हात प्रत्येक वस्तुवरून
नी मानतेय आभार दिलेल्या प्रेमाचे,
समर्पनाचे, निरागस कृतज्ञतेने
मी तटस्थ येणे पाहात होतो
एकाच रोपट्याच दुसऱ्यांदा रुजन नी सोसन.
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈