श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ पाऊस… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वृत्त : पादाकुलक)
विजेत वाजत ढगात गाजत
नाचत नाचत पाउस आला
भिरभिर भिरभिर वारा ओला
गंध मातिचा उधळत आला !
टपटप टपटप थेंब टपोरे
झरझर झरझर कौलारांवर
ढोल नि ताशा बडवत येती
धडधड धारा अन् पत्र्यांवर !
चिंब तरुंवर चिंब पाखरे
फडफड फडफड पंख पसरती
निथळत निथळत दुजा पाखरां
पुन्हा एकदा चिंब भिजवती !
पहिलावहिला पाउस उत्कट
सहस्र हस्ते धरेस कवळी
अशा बरसती धो धो धारा
जन्मांतरिचे वणवे विझती !
सूंसूं सूंसूं सुसाट वारा
रानोरानी पानोपानी
रुद्रविणांच्या छेडित तारा
करीत गुंजन दरीदरितुनी !
खळखळ खळखळ झरे वाहती
वाहत वाहत वाटा जाती
जलथल जलथल जिकडे तिकडे
चराचरा ये अपार भरती !
गल्लोगल्ली पोरेसोरे
भिजती न्हाती ब्रह्मानंदी
नाचत थुइथुइ मोर वनीचे
जणु स्वच्छंदी छंदीफंदी !
भिजल्या भेगा भग्न भुईच्या
बळिराजाही सुखी होवु दे
नष्टचर्य हे संपो , बाप्पा
दिवस सुगीचे पुन्हा येवु दे !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈