विविधा
☆ तारा… अंतिम भाग – 11 ☆ सुश्री मिनाक्षी देशमुख ☆
लक्ष्मणाची समजूत घालण्यासाठी तारा त्याच्यासमोर येऊन म्हणाली, “राजकुमार ! येवढे रागवण्याचे कारण काय? आपल्या आज्ञेचे कोणी उल्लंघन केले का? कोण आज्ञेच्या अधीन नाही? शुष्क वनात वणवा पेटला असतांना आत कोण बरं प्रवेश करेल ?” ताराचा संयमपूर्ण आवाज व स्वरांतील माधुर्य, सांत्वनपूर्ण वागणूक, आणि बोलणे ऐकून लक्ष्मणाचा अर्धा राग कमी झाला. स्वतःला सावरत, तो ताराला म्हणाला, ” देवी ! सुग्रीवाचे हित पाहतेस? तो फक्त उपभोगांत दंग झाला आहे. एकमेकांना सहाय्य करण्याची केलेली प्रतिज्ञा, रामकार्याची आठवण तो विसरला. त्याच्या धर्माचा असा लोप झालेला तुला दिसत नाही का? या कार्याचे तत्व, महत्त्व तू चांगल्याप्रकारे जाणतेस ! अशा परिस्थितीत आम्ही काय करावे? सांग ना !”
तारा शांतपणे लक्ष्मणाची समजुत काढत म्हणाली, “कुमार ! ही वेळ क्रोध करण्याची नाही. सुग्रीवाच्या मनात श्रीरामाला मदत करण्याची तीव्र इच्छा आहेच. परंतु अनेक वर्षांपासून कौटुंबिक जीवनाला पारखे झाले असल्यामुळे त्यातच ते गुंग झाल्यामुळे थोडा विलंब झाला खरा ! धर्म व तपस्या यात पारंगत असणारे मोठमोठे ऋषीमुनी देखील मोहाच्या अधीन होतात. आम्ही तर शेवटी वानरच ना ! परंतू त्यांना त्यांची चूक कळली आहे . पश्चातापदग्ध झालेत ते . हनुमानाच्या सल्ल्याने त्यांनी सर्व वानरसेना एकत्रित करण्याची आज्ञा दिलेली आहे. रामकार्यासाठी लाखो वानरसैन्य एकत्र जमा होत आहेत.”
ताराच्या बोलण्याने लक्ष्मण थोडा शांत झाल्यावर दोघेही सुग्रीवाकडे गेले. सुग्रीवाला पाहून लक्ष्मणाचा संताप उसळून आला व तो म्हणाला, ” सुग्रीवा ! ज्या मार्गाने वाली गेला, तो मार्ग अजून बंद झालेला नाही. रामाचा बाण तयार आहे.” सुग्रीवाला लक्ष्मणाने असे अपमानकारक बोलणे, तारासारख्या मानी स्रीला सहन होणे शक्य नव्हते. कणखरपणे ती म्हणाली, ” कुमार लक्ष्मणा, सुग्रीव राजे आहेत, त्यांच्याशी अशा तर्हेने बोलणे योग्य नाही. सुग्रीवांचा स्वभाव दांभिक, क्रूर, असत्यवादी, कुटील, कृतघ्न नाही. जिथे विश्वामित्रासारखे समर्थ ऋषीसुध्दा मोहापासून दूर जाऊ शकले नाहीत, मग आम्ही तर साधारण वानर ! रघुनंदन कृपाळु आहेत. आपण सुध्दा सत्वगुणसंपन्न आहात. असं क्रोधाच्या अधीन होणं बरोबर नाही.”
ताराच्या बोलण्याने लक्ष्मण शांत झाला. सुग्रीव, हनुमानाच्या मदतीने आणि सर्वांच्या सहकार्याने राम-लक्ष्मणाने मोठे सैन्य घेऊन लंकेवर स्वारी केली. रावणाशी मोठे युध्द होऊन रावणाचा वध झाला. प्रभू रामचंद्रांना सीता परत मिळाली. विमानातून सर्वजण जातांना सीतेला प्रत्येक स्थळांची श्रीराम माहिती देत होते. सीतेच्या इच्छेनुसार तारा व काही स्त्रियांना मोठ्या आदराने विमानात बसवून घेतले. अयोध्येमध्ये या सर्वांचे भव्य स्वागत झाले. रामाचा राज्याभिषेक झाला.
तारासारख्या वानर जातीतील स्त्रीचा सत्कार सीतेने मोठ्या प्रेमाने केला. ताराचे सतीचं वाण काही वेगळंच होतं. ती एक थोर राजमाता, कुशल राजनीतिज्ञ, दूरदर्शी, समंजस व सर्वांना सोबत घेऊन चालणारी एक महान स्त्री होती. पतीच्या निधनानंतर खचून न जाता मोठ्या धैर्याने परत उभी राहून तिने राज्याची घडी नीट बसवली, स्थिर ठेवली.
अशा या ताराला कोटी कोटी प्रणाम…!!!
!! समाप्त !!!
संकलन – सुश्री मिनाक्षी देशमुख
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈