श्री सुहास रघुनाथ पंडित

?इंद्रधनुष्य?

स्वामी विवेकानंदांची महासमाधि ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

४ जुलै १९०२ या दिवशी स्वामीजींनी पार्थिव देहाचा त्याग करून स्वधामी प्रयाण केले.

त्यांनी त्या अखेरच्या दिवशीही शिष्यांना व्याकरण कौमुदी, वेदांत सूत्रे शिकवली होती.

त्यांनी बरेच दिवस अगोदर आपल्या शिष्याला दिनदर्शिका आणायला सांगितली. त्यातील शुभयोगांचा बारकाईने अभ्यास करून त्याच दिनदर्शिकेवरील ४ जुलै या दिवसावर खूण करून ठेवली.

त्यांच्या महाप्रयाणापूर्वी काही दिवस अगोदर त्यांनी आपल्या सर्व शिष्यांसाठी सहभोजन आयोजित केले होते. त्यांनी स्वतः स्वयंपाक करून या लाडक्या शिष्यांना आणि गुरूबंधूंना आग्रह करून जेवायला वाढले होते. सगळ्यांचे भोजन होत आल्यावर स्वामीजी बाहेर जाऊन या सर्वांच्या हातावर पाणी घालण्यासाठी हातात भांडे घेऊन उभे राहिले होते.

मार्गारेट नोबल अर्थात् स्वामीजींची मानसकन्या भगिनी निवेदिता स्वामीजींनी तिच्या हातावर पाणी ओतताना म्हणाली, ” स्वामीजी, येशू ख्रिस्ताच्या जीवनातील अंतिम भोजनाचा जो प्रसंग आहे, तेव्हा स्वतः येशूने आपल्या भक्तांच्या हातावर भोजनानंतर पाणी घातले होते. मला त्याची आठवण आली. “

त्यावर स्वामीजी म्हणाले, ” होय मार्गारेट ,हा अगदी तसाच प्रसंग आहे. “

स्वामीजींनी देह ठेवल्याचे समजताच भगिनी निवेदितेला त्यांच्या या बोलण्याचा अर्थ उमगला, आणि तिच्या आक्रोशाला काही सीमाच राहिली नाही.

स्वामीजींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेताना तिच्या असे मनात आले, की स्वामीजींची अंतिम आठवण म्हणून त्यावेळी त्यांनी परिधान केलेल्या पवित्र वस्त्राचा एक तुकडा आपल्याला मिळेल का ? तिने तसे विचारल्यावर त्याला नकार मिळाला.

ती शोकाकूल वातावरणात स्वामीजींची आई भुवनेश्वरी देवी आणि सारदा माताजी यांच्या शेजारी बसून मंत्रोच्चारात केल्या जाणाऱ्या अंतिम संस्कारांचे निरीक्षण करीत होती. थोड्याच वेळात भडकलेल्या अग्नीने स्वामीजींचे पार्थिव आपल्या कवेत घेतले.जोराचा वारा आला, आणि त्या अग्निच्या ज्वालांमधून त्या वा-याने उडालेला स्वामीजींच्या काषाय वस्त्राचा एक तुकडा भगिनी निवेदितेसमोर येवून पडला. तिने अनावर झालेल्या अश्रुधारा आवरत तो पवित्र वस्त्राचा तुकडा स्वामीजींची अखेरची आठवण म्हणून उचलला आणि तो मरेपर्यंत प्राणपणाने सांभाळला.ती म्हणते,

“स्वामीजींनी माझ्या प्रत्येक धर्मजिज्ञासेचं समाधान केलं, माझ्यावर पूर्ण कृपा केली, आणि देह ठेवल्यावरही माझी अगदी क्षुल्लक इच्छाही तत्परतेने पूर्ण करीत त्यांच्या देहातीत अस्तित्वाचे प्रमाण दिले.”

मार्गारेट नोबल जन्मभर लिहिलेल्या प्रत्येक पत्राच्या अखेरीस स्वतःचे नाव लिहिताना Sri Ramkrushna Vivekananda’s Bhagini Nivedita असे मोठ्या प्रेमाने लिहित असे.

पुढे रामकृष्ण मठाने स्वामीजींचे समग्र वाङ्मय प्रकाशित केले, त्यावरील अभिप्राय देताना भगिनी निवेदिता लिहिते, 

“या भारतात जेव्हा एखादे निरागस बालक आपल्या आईला विचारेल” आई, हिंदू धर्म म्हणजे काय गं ? त्यावेळी ती अगदी नि:शंकपणे आपल्या अपत्याला सांगेल, की बाळा स्वामीजींचे जीवन म्हणजे मूर्तिमंत हिंदू धर्म आहे. तू स्वामीजींचे समग्र वाङ्मय वाच, तुला हिंदू धर्माचे आकलन होईल.”

आपण सारेच परम भाग्यवान आहोत, की स्वामीजी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी खूप मोठा वैचारिक वारसा मागे ठेवून गेले आहेत.स्वामीजी भारतीयांना म्हणतात, ” तुम्हाला किमान बाराशे वर्षे पुरेल इतके विचारधन मी तुमच्यासाठी मागे ठेवले आहे. उठा,जागे व्हा, आणि ध्येय प्राप्तीपर्यंत क्षणभरही विसावू नका.”

प्रत्यक्ष ईश्वरी साक्षात्कार होणं हेच जीवनाचे एकमेव ध्येय आहे.

स्वामीजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना कृतज्ञ प्रणाम. त्यांची दैवी तेजस्विता त्यांच्याच कृपेने आपणा सर्वांच्या जीवनातही प्रकाशित होवो, आणि तेजस्विता येवो, हीच प्रार्थना.

संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments