श्री तुकाराम दादा पाटील
विविधा
☆ नका सांगू कुणाला… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
गांधीबाबा कधीकाळी तुम्हाला ओरडून सांगत होते, ” खेड्याकडे चला ” पण ते आता पुन्हा आठवू नका आणि कोणालाही परत सांगू ही नका.
तुम्ही निघून आलात तरी खेडी तगून होती. रडत खडत स्वतःला जपत होती. अर्धपोटी राहून पोट बांधून जगत होती. आपल्या फाटक्या हाताने निसर्गाला अंजारात गोंजारत होती. पण त्यांचे हात तोकडे पडत होते, पूर्वीच त्यांचं संपन्न अवस्थेतल जितंजागत जगणं सावरायला. तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि अखेर देशोधडीला लावलं . त्यात जितका दोष तुमचा त्याहून अधिक होता शासनकर्त्यांचा. तुम्ही भौतिक सुखाला लाचावलात आणि आधिभौतिकाला संपवायला कारणीभूत ठरलात. आता पुन्हा त्यांच्याकडे ढुंकूनही पाहू नका, आणि कृपया कोणाला खेड्याकडे चला असं मुळीच सांगू नका. खेडी जगतील कि मरतीत याचा विचार सुद्धा करू नका. दोलायमान झालेल्या भौतिक सुखाच्या डोलाऱ्यात झुलत बसा. पण पुढे जाऊन तुमचा भ्रमनिरास होणार आहे यावरून मात्र तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. सावरा स्वतःला आणि जगण्याच्या नव्या प्रबंधांची आखणी करा. विसरा ती माती तुम्हाला पोसणारी, वाढवणारी. आई बापाची तमा न बाळगणाऱ्या तुमच्या पिढीला एक दिवस नक्कीच “दिवसा चांदण्य दिसतील ” तो काळ आता झपाट्याने तुमच्याकडे झेपावतो आहे. म्हणूनच तुमचं पोट बाजूला ठेवून कसं जगता येईल याचाच विचार करत, आघाशा सारखी भौतिक सुखं लुटता येतीलतितकी लुटा. सोडा विचार खेड्यांचा, तिथल्या अजरामर मातीचा, कारण ती कधीच नाशिवंत ठरणार नाही. आपले गुणधर्म विसरणार नाही काळ नक्की बदलेल. आणि तिला नक्कीच सोन्याचे दिवस येतील. पुन्हा खेड्यांची नंदनवनं होतील. यात तीळमात्र शंका नाही. म्हणूनच सांगू नका कुणाला “खेड्याकडे चला” म्हणून.
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈