सुश्री नीलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
⛈️ पड होऊन पाऊस… ☔ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
धरती अन आभाळाचे
हे केवढे अंतर
नभा भरलेपणाचा
आता सोसवेना भार
अरे बरस बरस
गच्च भरलेल्या धना
न्हाऊ घाल धरीत्रीला
आता विरह सोसेना
नको दाऊ उगा ताठा
तुझ्या पुरूषपणाचा
तुझा थेंब थेंब येथे
अरे लाखाच्या मोलाचा
स्रुष्टी देवतेला तुझे
आता वरदान हवे
हिरवेगार सौभाग्याचे
वस्त्र पांधरू दे नवे
तुझे सौभाग्याचे देणे
हाच तुझा बडिवार
ताण किती दावणार
जरी गळामिठी नाही
तरी भिजव अधर
बीज अंकुरण्यासाठी
दे ना थोडासा आधार
अरे माता ही जगाची
पुत्रवती तिची कुस
पुत्र औक्षवंत होण्या
पड होऊन पाऊस
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈