डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ तुज पंख दिले देवाने…भाग -1 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

हल्लीच मुंबईला एका लग्नाला गेले होते. त्यावेळी नीताला अचानक समोर बघून मला आश्चर्य वाटले. नीता म्हणजे माझी लहानपणीची शेजारची मैत्रीण! माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी असून नापास होत होत माझ्या वर्गात आली होती. 10 वीत दोनदा नापास झाल्यावर मात्र घरच्यांनी तिचे लग्न लावून दिले होते. तिच्या माहेरी गरिबी होतीच. पण सासरची परिस्थिती पण यथातथाच होती. लग्नानंतर माझा आणि नीताचा काही संबंध राहिला नव्हता. आणि आज अचानक या लग्नात ती मला लग्नाची केटरर म्हणून भेटली. तिच्याशी बोलताना कळले की लग्नानंतर मुंबईत आल्यावर आपल्या पुरणपोळ्या करण्याच्या कौशल्यावर तिने एक मोठा उद्योग सुरू केला. त्यात घरच्या सगळ्या लोकांना तिने सामावून घेतले आणि आज मोठी उद्योजिका म्हणून तिने मुंबईत नाव कमावले आहे. मला तिचे खूप कौतुक आणि अभिमान वाटला. आणि त्याचवेळी दहावी / बारावीचे निकाल जाहीर झाल्यावर आत्महत्या करणाऱ्या अनेक मुलांचे चेहरे डोळ्यासमोर तरळून गेले. नीताने त्यावेळी निराश होऊन असा काही निर्णय घेतला असता तर? पण तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होता आणि म्हणूनच आज ती ताठ मानेने उभी आहे.

हल्लीच दहावीचा निकाल लागला. काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल लागला. बऱ्याच जणांनी उत्तम यश संपादन केले आहे. आपापल्या आवडीच्या क्षेत्रात ते आपले करियरही करतील. पण आत्ताच्या ट्रेंडनुसार केवळ मेडिकल , इंजिनिअरिंग, सी. ए. किंवा एम्.पी.एस.सी/ यु.पी. एस. सी पास होऊन त्यात यश संपादन करणे म्हणजेच करियर का? ज्यांची ते करण्याएवढी बौद्धिक क्षमता नाही त्या मुलांचे काय? बऱ्याचदा परीक्षेतील गुणांना महत्व देऊन या मुलांच्या क्षमता तपासल्या जातात. पण एखाद्याकडे बौद्धिक क्षमता कमी असेल तर कदाचित दुसऱ्या प्रकारची क्षमता अधिक चांगली असेल. उदा. चित्रकला, सुतारकाम, नृत्य, गायन, शिलाईकाम, पाककला अशा इतर गोष्टीत ते अधिक पारंगत असतील आणि त्यांच्या या क्षमतेचा वापर करून त्यांना करियरमध्ये नवीन संधी निर्माण करता येऊ शकतात.

आपण लहानपणी खेळताना पत्त्यांचा बंगला करायचो. त्यातला सर्वात खालचा पत्ता काढला तर काय व्हायचे? सर्व बंगला कोसळून जायचा. वैद्यकीय, इंजिनिअरिंग, सी.ए. या सर्व क्षेत्रातही असेच आहे. या क्षेत्रातील फक्त वरची पदे आपण पाहतो. पण त्यांना मदत म्हणून लागणाऱ्या इतर गोष्टींचा आणि त्यात कौशल्य प्राप्त करून करियरच्या नवीन वाटा चोखाळण्याचा आपण कधी प्रयत्न करतो का? उदा. मेडिकलचेच उदाहरण घ्यायचे झाले तर रक्त- लघवी तपासणी, एक्स- रे, एम. आर. आय., डोळ्याचा नंबर तपासणे व चष्मा तयार करणे, दातांची कवळी तयार करणे इ. कामे प्रत्यक्षात डॉक्टर करत नाहीत. तर ती कामे करण्यासाठी वेगळे प्रशिक्षण घेऊन अनेक सहाय्यक त्यांना मदत करत असतात. इंजिनिअरिंग क्षेत्रातही  प्रत्यक्ष इंजिनियर होता आले नाही तरी इंजिनियरना सहाय्यक म्हणून कामे करण्यासाठी पण छोटे- मोठे कोर्स आहेत. अकौंटिंग क्षेत्रातही अनेक असेच कोर्स सध्या उपलब्ध आहेत. कॉम्पुटर क्षेत्रात तर लाखो संधी आहेत.

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments