श्रीमती अनुराधा फाटक
कवितेचा उत्सव
☆ नाती… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
झाडावरची फुलं तोडावीत
तितक्याच सहजपणानं
तू नाती जोडत गेलीस
कारणांनी,कारणाशिवाय
नात्यांचा हारच बनविलास
स्वतःला गुंतवून टाकलंस
इतकं की…तुझ्यासाठी
असलेलं नातंच विसरलीस
आपल्या नात्याच्या धाग्यात
सर्वांना बांधणारं तुझं
अस्तित्व दिसेनासं झालं
हारातल्या दोऱ्याप्रमाणं !
आणि त्यांनी..
स्वतःच्या अस्तित्वाचं फूल
फुलविण्यासाठी…
तुझंच नातं वापरलं
तुझं अस्तित्व नाकारत
तुला खरं सांगू..
झाडावरची फुलं
झाडावरच ठेवावीत
नाती नात्यासारखीच जपावीत !
© श्रीमती अनुराधा फाटक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈