डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ तुज पंख दिले देवाने…भाग -2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

याशिवाय अनेकदा घरातील  प्लबिंग, इलेक्ट्रिक कामे किंवा गॅस शेगडी दुरुस्त करणे यासारख्या छोट्या- मोठ्या कामांसाठी कोणी व्यक्ती उपलब्ध होत नाहीत. कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल दुरुस्ती हीही आजच्या काळातील आवश्यक असणारी गोष्ट आहेत. त्यातही कौशल्य असणारे लोक कमी आहेत. करियर म्हणून अशाही काही क्षेत्रांमध्ये कौशल्य प्राप्त करून एखादा विद्यार्थी आपली एक नवी वाट निर्माण करू शकतो. याशिवाय संगीत- नृत्य क्षेत्रात वापरली जाणारी वाद्ये तयार करणे- त्याची दुरुस्ती करणे, स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची दुरुस्ती, वॉशिंग मशीन दुरुस्ती अशाही कामांमध्ये कौशल्य असणाऱ्या व्यक्ती हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच आहेत. त्यामुळे या क्षेत्रातही करियरच्या अगणित संधी उपलब्ध होऊ शकतात. अशी कामे करणाऱ्या व्यक्तींना एकत्र करून एखादी एजन्सी तयार करणे व लोकांना घरपोच सेवा उपलब्ध करून देणे हाही एक व्यवसाय होऊ शकतो. दर महिन्याला मेंटेनन्स या स्वरूपात या सेवा उपलब्ध करून दिल्या तर लोक आनंदाने या सेवेचा लाभ घेतील.

“योजक: तत्र दुर्लभ:|” असे संस्कृतमध्ये एक वचन आहे. म्हणजे जगातील कोणतीही गोष्ट निरुपयोगी नसते. फक्त त्याचा योग्य वापर करणारा दुर्लभ असतो. आपले आयुष्यही इतके कवडीमोल नाही की ते सहज संपवून टाकावे. म्हणूनच ते सुंदर कसे करता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणूनच दहावी/ बारावी हे केवळ आपल्या आयुष्यातील केवळ मैलाचा दगड आहेत एवढाच विचार विद्यार्थ्यांनी केला तर गुणांच्या चढाओढीत त्यांना नैराश्य येणार नाही.

आता लवकरच नवीन शैक्षणिक धोरण अमलात येणार आहे. कदाचित यावर्षीच्या बोर्डाची परीक्षा ही शेवटची बोर्डाची परीक्षा असेल. हे नवीन शैक्षणिक धोरण हे पूर्णपणे विद्यार्थीकेंद्रित आणि कौशल्याधारीत आहे. नवीन क्षितिजांचा, नवीन काळाला अनुसरून अनेक कौशल्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. शिवाय विविध विद्याशाखेमधील वेगवेगळे अडसर दूर करून एक पारदर्शक प्रणाली निर्माण करण्याचा यात प्रयत्न केला गेला आहे आणि मुळात पुस्तकी अभ्यासावर गुण न देता विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्यांचा अभ्यास करून गुण दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिक, भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक , शारीरिक वाढीच्या दृष्टीने आवश्यक असणारे घटक या धोरणात समाविष्ट करण्यात आले आहेत. मुलांनी अधिकाधिक संशोधन, प्रयोगशीलता यावर भर देऊन परिस्थितीनुसार नवीन काहीतरी निर्मिती करावी. त्यासाठी  सर्व शाळांमधून अशाप्रकारची वातावरणनिर्मिती व्हावी अशी कल्पना या धोरणामध्ये आहे. त्यामुळे मुलांना येणारे नैराश्य आणि त्यातून नकळत केल्या जाणाऱ्या आत्महत्या यावर आपोआप नियंत्रण येईल अशी आपण आशा करु या.

परमेश्वराने सर्वच पक्ष्यांना उडण्यासाठी पंख दिले आहेत. पण कोणी किती भरारी मारावी हे त्या पंखांच्या क्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे घार जेवढ्या उंचावरून उडू शकेल तितक्या उंचावरून चिमणी उडू शकणार नाही. पण आपल्या मर्यादेत  आपल्याला आवश्यक तेवढी भरारी ती निश्चितच मारू शकेल. म्हणूनच आज निकाल जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना असे म्हणावेसे वाटते की-

 “ तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने”

तुमच्यातील क्षमता ओळखून, त्याचा पुरेपूर वापर करून भरारी मारायची ठरवली तर जीवन का नाही सुंदर बनणार?

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments