श्री सुहास रघुनाथ पंडित
विविधा
☆ महिना अखेरचे पान – 7 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
ज्येष्ठाच्या अखेरीस पावसाने हजेरी लावलेली असते. जणू काही ‘मी आलोय’ हे सांगण्यासाठीच सरी येऊन जातात. पण लवकरच हा पाऊस आपल्या लवाजम्यानिशी येतो तो मुक्काम करण्याच्या बेतानेच. सरी निघून गेलेल्या असतात आणि कोसळणारा पाऊस आषाढ घेऊन येतो. जून मध्ये निसर्गाची पाऊले नुसतीच ओली झालेली असतात. ती जुलैमधल्या चिखलात कधी बुडून जातात समजतही नाही.
आषाढ म्हटला की ओथंबलेल्या मेघमाला तर डोळ्यासमोर येतातच पण मनही कसं भरून आल्यासारखं वाटतं. पावसामुळं हवेत येणारा गारवा,कधी कुंद वातावरण,हातात वाफाळलेल्या चहाचा कप,जमिनीवर वाढत जाणारी हिरवाई,शेतात चाललेली लगबग,छत्री नाहीतर रेनकोटची रस्त्यावर वाढलेली वर्दळ, हे सगळं आषाढातच बघायला मिळणार.
पण आषाढ आला म्हटलं की पहिली आठवण होते ती कवी कुलगुरू कालिदासाची. आषाढाचा पहिला दिवस हा कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर ही त्याची जयंती नव्हे किंवा पुण्यतिथीही नव्हे. पण त्याच्या अजरामर अशा ‘मेघदूत’ या महाकाव्याच्या स्मृती जागवून त्याच्या प्रतिभेला सलाम करण्याचा हा दिवस !
याच आषाढाचा म्हणजे सर्वांच्या परिचयाचयाच्या जुलै महिन्याचा पहिला दिवस कृषी दिन म्हणूनही साजरा होतो. तसेच हाच असतो डाॅक्टर्स डे आणि नॅशनल पोस्टल वर्कर्स डे. डाॅक्टरांबद्द्ल कृतज्ञता आणि पोस्ट कर्मचा-यांच्या कामाची दखल घेण्याचा हा दिवस. हा दिवस सी. ए. दिनही आहे.
सात जुलै हा चाॅकलेट डे असतो तर दहा जुलै आपण मातृ सुरक्षा दिन म्हणून साजरा करतो.
अकरा जुलै हा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस म्हणून पाळला जातो.
भारताच्या दृष्टीने एकोणीस जुलै हा दिवस ही महत्त्वाचा आहे. कारण याच दिवशी 1969 साली प्रमुख खाजगी बॅंकांचे राष्ट्रीयिकरण करण्यात आले आणि लोकाभिमुख बॅकिंग ला सुरूवात झाली.
वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन व व्याघ्र दिन म्हणून जाहीर झाला आहे.
याच दिवशी 1969 साली मानवाने प्रथम पृथ्वीच्या बाहेर म्हणजे चंद्रावर पाऊल ठेवले. म्हणून वीस जुलै हा चांद्रदिनही आहे.
वन आणि पाऊस यांचे नाते लक्षात घेऊन तेवीस जुलै हा दिवस वनसंवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. तर चोवीस जुलै आहे कझिन्स डे. आपल्याच भावंडांना शुभेच्छा देण्याचा दिवस.
1999 साली कारगील येथे युद्धात मिळवलेल्या विजयाची आठवण ताजी ठेवण्यासाठी सव्वीस जुलै हा कारगील विजय दिन म्हणून साजरा केला जातो. वाघांची घेती संख्या लक्षात घेऊन ,त्याविषयी जागृती करण्यासाठी एकोणतीस जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो.
तीस जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन असतो.
भारतात जुलै महिन्याचा चौथा रविवार हा पालक दिन म्हणून साजरा केला जातो.
असे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करत असतानाच आपण पारंपारिक सणवारही तेवढ्याच उत्साहाने साजरे करतो. ज्येष्ठात काही ठिकाणी कर्नाटकी बेंदूर झालेला असतो. आता या महिन्यात महाराष्ट्रीय बेंदूर येतो. तर मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सणही याच महिन्यात असतो.
आषाढ महिन्यातील पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही दिवसांना विशेष महत्त्व आहे. कारण पौर्णिमा ही गुरुजनांना वंदन करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘गुरूपौर्णिमा’ म्हणून साजरी होते. तर,अमावस्या ही ‘दिव्याची अमावस्या’ असल्यामुळे घरातील सर्व दिप,समया,यांचे पूजन करून त्या प्रज्वलीत केल्या जातात. प्रकाशाची पूजा करून अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा हा दिवस.
शुद्ध पक्षात येणारी एकादशी ही आषाढी एकादशी. ज्येष्ठात मार्गस्थ झालेल्या पालख्या पंढरपूरात येऊन पोहोचलेल्या असतात आणि अवघी पंढरी विठूरायाच्या नामाने दुमदुमून गेलेली असते.
याच महिन्यात थोर समाजसुधारक गो. ग. आगरकर आणि लोकमान्य टिळक यांचा जन्मदिन आहे. तर बाजी प्रभू देशपांडे,अण्णाभाऊ साठे,सरखेल कान्होजी आंग्रे,वीर शिवा काशीद, संत सावतामाळी आणि डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथि असते.
एकीकडे निसर्गाच्या चक्राबरोबर पुढे पुढे जात आपण संस्कृती आणि परंपरा जपताना इतिहासातही डोकावून पाहत असतो. वर्तमानातील एक महिना संपतो आणि सर्वांचा मनभावन असा श्रावण खुणावू लागलेला असतो. मेघांनी भरपूर देऊन झालेल असतं. म्हणूनच की काय रिमझिमणा-या पावसासाठी मन आसुसलेलं असतं. ऊन पावसाचा खेळ बघायला डोळे आतूर झालेले असतात आणि हिरवाळीच्या वाटा श्रावणाकडे घेऊन जात असतात.
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈