सौ. अर्चना सुरेश देशपांडे
विविधा
☆ श्रावण मनभावन… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆
आषाढ अमावस्येला दिवे, समयाउजळून त्यांचे पूजन केले जाते .या दिवशी जरा जिवांतिकाचा कागद लावून श्रावण महिनाभर त्याचे पूजन केले जाते .दिवा हे ज्ञानाचे, वृद्धिंगतेचे प्रतिक मानले जाते. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे दीप. दिव्याची आवस म्हणजेच येणाऱ्या श्रावणाची चाहूल..दुसऱ्या दिवशी पासून श्रावण महिना सुरू होतो तसे पाहिले तर आषाढात पावसामुळे वातावरण कुंद असते ,बाहेर चिखलामुळे चिक-चिक असते.त्यामुळे घराबाहेर पडायला मन नाराज असते पण श्रावण येताच सगळीकडे अल्हाददायक वातावरण असते. या काळात निसर्ग बहरलेला असतो ,निसर्गाने मरगळ टाकून उत्साहाची हिरवळ पांघरलेली असते. अगदी दगडावरही शेवाळ उगवलेले असते पण या हिरव्या रंगांमध्ये विविधता आढळते .काही झाडांची पाने हिरवीगार तर काही झाडांची फिकट हिरवी तर काही पोपटी रंगाची आढळतात. तसे पाहिले तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. या दिवसात ऊन- पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरू असतो .काही वेळा आकाशातील सप्तरंगी मोहक इंद्रधनुष्य पाहून डोळ्याचे पारणे फिटते.
बालकवी म्हणतात ,
“श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे”
तर कुसुमाग्रज म्हणतात “हसरा लाजरा आला श्रावण”
स्त्रीचे मन सांगते”सणासुदींची घेऊन उधळण
आला हसरा श्रावण..,
कर्तव्य संस्कृतीची देतो आठवण
अनमोल संस्कृती ठेवा करू या जतन”
स्त्रीच्या नजरेतून पाहायचे झाल्यास तिने सगळे बदल स्वीकारले आहेत अगदी हसत खेळत. तिने आपली संस्कृती जपली आहे. पूर्वी तिची जागा उंबऱ्याच्या आत होती पण येणारा प्रत्येक क्षण ती आनंदाने जगायची. यामध्ये सण , व्रत वैकले तिच्यासाठी पर्वणी असायची .श्रावण म्हणजे स्त्रियांचा आनंद वाढवणारा, त्यांचा मान सन्मान वाढवणारा महिना.या महिन्यात येणारे सण आनंदीत करतात.
श्रावणातल्या सोमवारी शंभू महादेवाचे पूजन केले जाते .पुण्याला तर मृत्युंजय महादेव मंदिरात पहाटेपासून महादेवाला दुधाचे अभिषेक सुरू असतात .बरेच भाविक पहाटे पहाटे स्नान करून दुधाची पिशवी घेऊन पायी मंदिरात पोहोचतात, दर्शन घेऊन प्रसादाचे दूध घेऊन घरी परततात आणि आपल्या कामावर जायला निघतात. संध्याकाळी तर अगदी जत्रेचे स्वरूप आलेले असते,दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात पण शिस्तीने दर्शन घेऊन भाविक समाधानाने घरी परततात.
आमच्या कॉलेज जीवनात श्रावणी सोमवारी हरिपूरला जत्रेला जाण्यात एक वेगळाच आनंदा असायचा. स्टॅन्ड पासून गप्पा मारत, तिखट मीठ लावलेलया पेरूची चव चाखत हरिपूर केव्हा यायचे ते समजायचेच नाही. नेहमीच्या अभ्यासातून वेळ काढून एक छोटीशी पिकनिकच असायची.
मंगळवारी मंगळागौर पूजन म्हणजे नवविवाहित तरुणींना पर्वणी असायची ,तिचा निम्मा जीव सासरी तर निम्मा जीवमाहेरी अशी तिची अवस्था असायची. थोडक्यात एक पाय सासरच्या दारात तर दुसरा पाय माहेरच्या अंगणात. पूर्वी श्रावणात मुलीला माहेरी घेऊन जाण्यासाठी कोणीतरी येत असे.तिचे आसुसलेले मन म्हणायचं,
“सण श्रावणाचा आला आठवे माहेरचा झुला कधी येशील बंधुराया नको लावू वाट बघाया”
साधारणपणे 40 वर्षांपूर्वी नवविवाहित मैत्रिणीसह सकाळी मंगळागौरी पूजन केले जायचे , पांढऱ्या शुभ्र फुलांनी महादेवाची पिंड सजायची , आजूबाजूला गोकर्ण जास्वंद गुलाब, बेल, पत्री, दुर्वा केवडयाचे पान लावून सुशोभित केली जायची.अशारीतीने मैत्रीणीच्या बरोबर मंगळागौर सजायची,,दुपारी मस्त पुरण वरणाचे जेवण व संध्याकाळी सवाष्णी ना हळदी कुंकू, मटकीच्या उसळी सह फलाहार आणि रात्रभर फुगडी ,झिम्मा ,पिंगा…. सारखे पारंपरिक खेळ खेळले जायचे.,या कार्यक्रमाला सखे,सोबती, नातेवाईक एकत्र येत त्यामुळे नात्याची वीण घट्ट होत असे.
श्रावण शुक्रवारी तर माहेरवाशीण सवाष्णीचे कौतुक न्यारेच असे. दुपारी पुरणाच्या दिव्यांनी औक्षण केले जायचे, जेवण्यासाठी काहीतरी गोड पक्वान्न आणि संध्याकाळी दूध व फुटाणे यांची मेजवानी असे. आम्ही लहान असताना आईबरोबर शुक्रवारी हळदी कुंकवाला जात होतो तिथे अटीव दूध पिऊन येताना फुटाणे खाण्यात खूप मजा यायची. शिवाय घरी वेलदोडा, केशर घातलेले दूध असायचे. आजही या दुधाची चव जिभेवर रेंगाळते पण हल्ली नोकरी निमित्त स्त्री घराबाहेर पडू लागली पण त्यातूनही एखादी दिवस अर्धी रजा काढून मंगळागौर पुजते ,रविवारी शुक्रवारचीसवाष्ण , शनिवारचा मुंजावाढते, सत्यनारायण पूजा करून घेते.लोकलच्या महिला डब्यामध्ये मंगळागौरीचे खेळ खेळते किंवा मंगळागौरीचा खेळ खेळणाऱ्या ग्रुपला बोलावून याचा आनंद लुटते .शुक्रवारी मैत्रिणींना फुटाणे देऊन हळदी कुंकवाची हौस भागवते.आजची स्त्री कितीही पुढारलेली असली तरी , तिची जीवनशैली आधुनिक असली तरी आपल्या सवडीनुसार आपले रीती रिवाज, परंपरा ती सांभाळत असते.
पूर्वी नागपंचमी राखी पोर्णिमा, गोकुळाष्टमी याशिवाय दररोज येणारा सण ती साजरे करायची त्यामुळे तिच्या शरीरावरचा ताण निघून जायचा,या सर्वातून ऊर्जा घेऊन पुढे येणाऱ्या गणपती गौरीच्या तयारीला ती लागत असे.
© सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈