श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ रुसले ऋतू… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
उठ मानवा उठ तुझ्यावर रुसून बसला ऋतू
पहा आठवून अशी कोणती केलीस आगळीक तू
कळ्या फुलांची मधुर फळांची केली तुजवर वर्षा
दंडित मंडित केलीस सृष्टी काय तुझी ही तृषा
इर्षा होती तुझ्या मनासी
सृष्टीला या करू गुलाम
गगनाला ही लगाम घालू
करतील तारे तुला सलाम
का नियतीला दावितोस तू विज्ञानाचा ताठा
तव गर्वाने विराण झाल्या हिरव्या पाऊल वाटा
गर्जतील ना मेघ नभातून
नृत्य ना करतील मोर वनातून
शेतमळे ना पिकतील आता
उतरलास तू सृष्टीच्या मनातून
झटपट श्रीमंती सुखसोयी म्हणजे नोहे खरा विकास
हव्यासाच्या पाईच तुझिया वसुंधरा जाहली भकास
जे देवाने दिले भरभरून त्याचा नीट करी सांभाळ
विनम्र हो तू नियती पुढती सौख्याचा होईल सुकाळ
सगळे काही मानवनिर्मित
दे सोडून ही दर्पोक्ती
या गगनातून आनंदाचे मेघ बरसतील तुज वरती
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈