सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ किमया – भाग-3 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(आपल्या फ्रॅक्चर झालेल्या पायाचं वर्णन, मुलांचं, नातवंडांचं तोंड भरून कौतुक करताना विभाताई हसत.. बोलत होत्या पण त्यांचं मन आतून खदखदत होतं) आता पुढे…

रुटीनप्रमाणं नेहमीची काम चालली होती. फ्रॅक्चर झालेल्या पायात पण शक्ती आली होती. पण हे जगणं त्यांना यंत्रवत वाटत होतं. त्यात ‘जान’ नव्हती. आपलं काहीतरी हरवलंय असं त्यांना वाटत होतं…. पण काय ते कळत नव्हतं. एक दिवस संध्याकाळी टीव्ही लावून बसल्या होत्या. कातर वेळी हळवं झालेलं मन उदासपणे घराकडे पाहत होतं.. टीव्हीवर कौटुंबिक मालिका चालू होती. पण मन ती बघताना भिरभिरत थोडं मागं गेलं… जणू आत्ता नुकतीच घडलेली गोष्ट… हो ,अचानकच त्यांचं मुंबईला जायचं ठरलं आणि त्यांच्या आनंदाला उत्साहाला उधाण आलं. अनाथ महिला आश्रम, वाचनालय इतर सामाजिक संस्था यांची जबाबदारी आणि बरीच कामं, छंद सगळं बाजूला सारून त्या तयार झाल्या. काम काही मोठं नव्हतं .केतकीला त्यांच्या मदतीची गरज होती. उर्मी -त्यांची नात,.. पुढच्या महिन्यात तिची डान्सची परीक्षा होईपर्यंत तिला डान्स क्लासला घेऊन जाणे आणि परत घेऊन येणे, काम एवढेच, पण ते महत्त्वाचे होते. शिवाय केतकीचं प्रमोशन ड्यू होतं. ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबावं लागणार होतं. त्यामुळे घराची जबाबदारी पण त्यांच्यावर पडणार होती. आणि हे सगळं काम त्यांनी आनंदानं स्वीकारलंही.

दोन वर्षापूर्वीपर्यंत तर त्यांना कुठेही बाहेरगावी जाताच आलं नव्हतं. घरात तीन पिकली पानं होती. आधी सासूबाई गेल्या. मग मावस सासूबाई आणि दोन वर्षांपूर्वी आत्ते सासूबाई!  गावातल्या गावात राहून आपली बाहेरची कामं त्या करायच्या. पण त्या परगावी जाणार म्हटलं की मावशी ,आत्या कावऱ्या बावऱ्या  व्हायच्या. त्यांना निराधार वाटायचं .विभाताईंना आपली जबाबदारी झटकावीअसं कधीच वाटलं नाही .पण आता त्या निर्धास्तपणे जाऊ शकत होत्या. आधी केतकीकडं जावं.. नंतर केदार व कैवल्याकडं. छान आरामात नातवंडांशी खेळत मन रमवावं.. खूप मजा येईल…. त्यांच्या मनात मुंबईला जायच्या विचारानं जोर पकडला.

मुंबईला पोहोचल्या- पोहोचल्याच मुलं, सुना, नातवंडं भेटूनगेली. खूप तृप्त झाल्यासारखं वाटलं त्यांना. ‘माझ्यासारखी भाग्यवान मीच!’.. त्यांचं मन त्यांना सांगत होतं. उर्मीची डान्स परीक्षा, केतकीचं प्रमोशन झालं. मोठी पार्टी दिली तिनं. ‘चला आता केदार कडे जायला हरकत नाही’ त्या मनातल्या मनात ठरवत होत्या. पण कसलं काय! फरशीवर पाय घसरून पडल्याचं निमित्त झालं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं. ऑपरेशन झालं.पायात रॉड पडला अन्

महिनोंन् महिने नर्स कडून सेवा सुश्रुषा करून घेत त्यांना अंथरुणावर पडून रहावं लागलं. त्यामुळे केतकीकडील त्यांचा मुक्काम पण वाढत गेला.

अचानक आलेल्या फोनच्या आवाजाने त्या तंद्रीतून बाहेर आल्या…’ अरे ,टीव्ही सिरीयल मधला फोनचा आवाज वाटतं!’ त्या पुन्हा लक्ष देऊन सिरीयल पाहू लागल्या. तेवढ्यात बाहेरून कुठून तरी फटाक्यांचा जोरात ,कानठळ्या बसवणारा आवाज आला आणि त्या दचकल्या. फटाक्यांमुळं  भाऊबीजेचा ‘ तो ‘दिवस त्यांना आठवला. इथे आल्यापासून इतरांसमोर मनातला राग, दुःख अपमानाचे शल्य.. सगळे दाबून ठेवून त्या हसत बोलत होत्या. पण या क्षणी त्या सगळ्या भावना उफाळून वर आल्या. नुसत्या आठवणीने त्यांच्या अंगाचा थरकाप झाला.माझं सानिध्य कुणालाच नकोय. सगळी मला आपल्या घरातून पिटाळायला बघताहेत.. या विचारानेच त्या कासावीस झाल्याअन् त्यांना विचित्र भास होऊ लागले.

मुलं “नो आई, नो आई!” असं ओरडताहेत. वृद्धाश्रमाकडे बोट दाखवताहेत..” तू आमच्या स्टायलिश घरात आॉड दिसतेस.” असं कैवल्य ओरडतोय.कामिनी आणि तिचा फ्रेंड आपल्याकडे बघून फिदी फिदी हसताहेत व्हिलन सारखी!… ‘अनवॉन्टेड, निगलेक्टेड चाइल्ड ‘या शब्दांच्या शस्त्रानं कामिनी आपल्यावर सपासप् वार करतेय… सगळं घरच गरकन् फिरतंय असं त्यांना वाटू लागलं. आणि त्या डोकं घट्ट धरून खाली बसल्या. पुन्हा पुन्हा तिच दृश्यं दिसू लागल्यानं त्यांचं अंग घामानं थबथबलं.. … जोरात किंकाळी फोडावीशी वाटली त्यांना ,पण त्यांच्या घशातून आवाजच फुटेना.. त्यांना रडू कोसळलं…त्या अक्षरशः ओक्साबोक्शी रडू लागल्या…. मधून मधून हुंदके फुटत होते. त्यांनी आपल्या अश्रूंना, हुंदक्यांना रोखून ठेवायचा प्रयत्नही केला नाही. बऱ्याच वेळानं त्यांना हलकं हलकं वाटू लागलं.

क्रमशः…

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments