सुश्री सुनिता गद्रे
जीवनरंग
☆ किमया – भाग-5 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
किमया आणि मी – सुश्री सुनिता गद्रे
साधारणपणे 2015 मधली घटना…. आम्ही दोघे बेंगलोरला मुलाकडे राहायला गेलो होतो. परत येणार एवढ्यात माझ्या ब्रेनच्या… मसल नर्व्हशी कनेक्टेड अशा.. खूप रेअर, क्रॉनिक आजाराने उचल खाल्ली. माझा मुलगा न्यूरॉलॉजिस्टआहे.. तोच माझा डॉक्टरही आहे. त्याच्या सल्ल्या नुसार बरे वाटेपर्यंत आम्हाला तेथेच राहणे भाग होते. अर्थात् तेथे राहण्यात कुठलाच प्रॉब्लेम नव्हता. मला पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला मिळाला होता आणि वरती घर चालवायला लागणाऱ्या कुठल्याही जबाबदारीचे ओझे माझ्यावर नव्हते. तिथे कुठल्या गोष्टीची कमीही नव्हती आणि कसलाही त्रास नव्हता. पण हा आजार वर्षभर लांबला. जो काही त्रास होता तो या आजारामुळेच होता. खूप हळूहळू सुधारणा होत होती. या आजारात डोळ्याच्या पापण्या अतिशय दुखायच्या त्यामुळे मी काही लिहू-वाचू शकत नव्हते. डोळे बंद करून टीव्ही ऐकणे, तोही थोडा वेळ… एवढाच मला दिलासा होता. ट्रांजिस्टर, टीव्हीवर संगीत ऐकत पडून रहावे म्हटले तर हायपर सेन्सिटिव्हिटीमुळे माझ्या कानाला त्रास व्हायचा. अशक्तपणामुळे खूप जास्त हिंडू फिरुही शकत नव्हते. मुलगा सून कामावर गेलेली…. छोट्या नातवाला खेळवावे म्हटलं तर तो रांगत रांगत आणि नंतर चालत इतक्या दूर जायचा की त्याला उचलून घेण्याची शक्ती माझ्या अंगात नव्हती. त्याच्या एनर्जी पुढे माझी एनर्जी फारच कमी पडायची. त्याच्यासाठी ठेवलेली मेड्च त्याला सांभाळू शकायची. इतर काहीच व्याधी नाही पण दिवसभर पडून राहणे हेच फार कठीण वाटू लागले होते. मन कमकुवत झाले होते… अन् नैराश्य आणि डिप्रेशन मला पछाडू लागले होते… पण हळूहळू योग्य औषधांचा परिणाम होऊ लागला आणि मी बऱ्यापैकी हिंडू फिरू लागले होते. मनाचा हिय्या करूनच आम्ही पुन्हा माधवनगरला परत आलो.
इकडे वेगळेच प्रॉब्लेम समोर येऊन ठाकले. काम करणाऱ्या मावशी आणि स्वयंपाकीण काकू दुसरी कामे पकडून मोकळ्या झाल्या होत्या. कोणीच कामाला मिळेना. घरकाम करण्यात मी थकून जाऊ लागले. पुन्हा आजार वाढणार की काय ही भीती… कामाचा थकवा… यामुळे टेन्शन उदासी, नैराश्य वाढू लागले. छोट्या छोट्या कारणावरूनही खूप रडू येऊ लागले. आपल्या जगण्याला काहीच अर्थ नाही अशी माझी मनोभूमी तयार झाली. अंगात काही करायचा उत्साहच राहिला नाही. याच मनस्थितीत एके दिवशी फूलझाडांच्या कुंड्यातील वाळकी रोपटी उपटता-उपटता तुळशी वृंदावनात वाळलेल्या तुळशीच्या मोठ्या रोपाखाली मला तुळशीची एकदम छोट्या रोपाची दोन हिरवीगार पान दिसली. आणि खरंच मला किमया कथेत मी जो लिहिलेला तो सगळा अनुभव आला. आणि त्यानंतर अशी जादू झाली की माझी तब्येत हळूहळू सुधारू लागली. कुठल्याही कामाचा ताण वाटेनासा झाला … आणि बघता बघता आमचा पूर्वीसारखा छान दिनक्रम सुरू झाला.
नंतर सहजच मला सातत्यानं वाटू लागलं की हा आपला अनुभव कोणालातरी सांगावा. आणि ‘किमया’ कथेचा आराखडा मी तयार केला. अन् त्या विभाताई या स्त्रीची, साधारण कथा आणि व्यथा लिहायचा प्रयत्न केला. यापूर्वी कधीही अशा तऱ्हेच्या साहित्यिक लेखनाचा मला थोडासाही अनुभव नव्हता. पण कुठल्यातरी अंत: प्रेरणेने मी ‘किमया’ चे लेखन केले. आणि एका कच्च्या वहीत ते तसेच पडून राहिले. कारण मला जे सांगायचे आहे ते व्यक्त करण्या इतकी प्रतिभा माझ्या खचितच् नव्हती …. (आणि अजूनही नाहीय.)… आणि असं वाटायचं… समजा मी हे जरी कुठं लिहून पाठवलं तरी… असं होऊ शकतं हे लोकांना पटेल कशावरून?…. आपली कथा काहीतर वेगळी, छान वाटावी म्हणून मी हा त्या कथेतल्या विभा ताईंना आलेलाअनुभव वगैरे सगळं खोटं कशावरून लिहिलं नसेल? ह्याआणि अशा तऱ्हेच्या इतर विचारांमुळे मी ती कथा बाजूला ठेवून दिली. आणि त्या बाबतीत नंतर सगळं विसरूनही गेले.
साधारण सहा महिन्यापूर्वीची गोष्ट. एका मासिकात मी एका फौजी जवानाचा अनुभव वाचत होते. त्याने आपल्या सियाचीन मधला एक अनुभव शेअर केला होता. एखाद्या ट्रूपला कायमचेच सियाचीनमध्ये ठेवत नाहीत. ठराविक कालांतराने त्यांची जागा घ्यायला दुसरे सैनिक येतात. आणि सियाचीनचा अनुभव घेतलेल्या सैनिकांची दुसरीकडे पोस्टिंग होते…तर या सैनिकांना तिथे राहून पाच महिने होऊन गेले होते. त्यांना रिलीव्ह करायला दुसरे जवान आले होते आणि या लोकांचा परतीच्या प्रवास सुरू झाला होता. हेलीपॅड अगदी समोर, जवळ दिसले तरी तिथपर्यंत पोहोचण्यासाठ खूप वळणदार रस्त्यावरून चालत जाणे भाग होते.
बऱ्याच वेळा तिथले बर्फावरून वाहणारेअति थंड वारे.. सैनिकांच्या भारी भरकम थंडीच्या पोशाखातून सुद्धा हाडापर्यंत जाऊन पोहोचणारी आणि शूलासारखी टोचणारी थंडी…. बर्फाची वादळे…. रात्रंदिवस, महिनोंन् महिने डोळ्याला दिसणारे पांढरे शुभ्र बर्फ… त्यामुळे उद्भवणारा दृष्टी दोष…. यामुळे बरेचदा काही सैनिकांना शारीरिक त्रास सुरू होतो आणि बरेच जण मनाने ही खचतात.
चालता चालता या सैनिकाच्या मनात विचार चालू होता, ‘खूपच मस्त’ आमच्या सगळ्या ट्रूपमध्ये कोणीही शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या आजारी पडले नाही. सगळेच धष्टपुष्ट, खंबीर आणि उच्च मानसिक ताकत असलेले निघाले. आपण सगळे येथून सही सलामत दुसऱ्या पोस्टिंगच्या ठिकाणी जाणार आहोत. तो सैनिक या विचारातून बाहेरही पडला नव्हता, बरोबर त्याच क्षणी त्यांच्या एका सहका-याचं खूप जोरजोरात हसणं त्याच्या आणि इतर सर्वांच्या पण कानावर पडलं. तिथं कोणतीही अशी स्थिती आणि कारण, त्याला इतक्या जोरजोरात हसायला भाग पाडणार नव्हतं. मग तो इतक्या विचित्रपणे अचानक असा का हसू लागला? ‘त्याला बहुतेक मानसिक त्रास सुरू झाला असणार.’
या सैनिकाच्या मनात विचार चमकून गेला. सगळ्यांनीच त्याच्याभोवती कोंडाळं केलं. त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत केलं आणि त्याला त्याच्या सातमजली विचित्र हसण्याचा कारण विचारू लागले .तेव्हा त्याने बोटाने खूण करून एका बाजूला दिशानिर्देश केला. अन् आश्चर्याची बाब म्हणजे तेथे दोन गवताची हिरवीगार पाती वाऱ्या बरोबर हलत डूलत होती. पांढऱ्या फक्क बर्फावर डोलणारी ती हिरवी पाने सर्वांना सुखावून गेली. मंत्रमुग्ध करून गेली. आणि सर्वांच्याच लक्षात आले की आपल्या सहकाऱ्याचे मनः स्वास्थ्य बिघडलेले नाहीय तर अचानक निसर्गाची ही किमया बघून त्याला हसू अनावर झालेय.
ही सगळी घटना वाचून आनंदित झालेल्या मला, मी मागं पाहिलेला तो निसर्गाचा अजूबा … ती हिरवी पोपटी तुळशीची पानं आठवली… हे असं खरंच होऊ शकतं . त्या सैनिकाच्या सांगितलेल्या अनुभवावरून ह्या गोष्टीच्या सत्याची पुष्टी झाली होती.
त्यामुळे मला आलेल्या त्या दिव्य अनुभूतीचे दर्शन इतरांनाही करावेसे मला वाटले. त्यासाठी किमया या कथेत कल्पना आणि अनुभव यांची सांगड घालून उभ्या केलेल्या त्या कथेत विभाताईंची मनस्थिती आणि त्यांच्यात त्या हिरव्या पोपटी पानांमुळे झालेला सकारात्मक बदल मी चित्रित केला. आणि आपल्या ई-अभिव्यक्तीच्या पटलावर तो सादर केला आहे.
– समाप्त –
© सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈