श्री राजीव गजानन पुजारी

परिचय 

नांव – राजीव गजानन पुजारी

शिक्षण – बी. ई. (मेकॅनिकल), DBM

नोकरी – मे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, किर्लोस्करवाडी येथून मॅनेजर मेंटेनन्स म्हणून निवृत्त त्यानंतर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे कांही वर्षे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केले.

आवड – प्रवास, वाचन, लेखन

प्रसिद्ध झालेले साहित्य –

  • कॅलिफोर्निया डायरी हे प्रवास वर्णनात्मक पुस्तक
  • नासाची मंगळ मोहीम ही दहा लेखांची लेखमाला दै. केसरी मध्ये प्रसिद्ध
  • मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिका या मासिकांतून
    • जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण,  
    • नासाची आर्टिमिस योजना,
    • लेसर कम्युनिकेशन रिले डेमॉन्स्ट्रेशन

हे लेख प्रसिद्ध

  • अक्षर विश्व् या दिवाळी अंकांत
    • माझी मिनी गुजरात सहल हे प्रवास वर्णन आणि
    • भेदीले शून्य मंडळा ही विज्ञानकथा प्रसिद्ध
  • रेडिओ मराठी तरंग वर
    • विक्रम साराभाई स्पेस सेन्टरला भेट आणि
    • भेदीले शून्य मंडळा या विज्ञान कथेचे वाचन
  • सावरकर शाळेच्या रविवारच्या व्याख्यान मालेत जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण या विषयावर व्याख्यान
  • नृसिंहवाडी येथील पुजारी घराण्याची ई. स. 1435 पासून ते 2022 पर्यंतची वंशावळ संकलित करून श्री दत्त देवस्थानकडे सुपूर्द.

? इंद्रधनुष्य ?

☆ भवानी संग्रहालय -एक सत्यातील स्वप्न  ☆ श्री राजीव ग पुजारी 

औंधच्या यमाई देवीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही कोल्हापूरहून औंधला गेलो. औंधच्या डोंगरावर यमाई देवीचे सुंदर मंदिर आहे. गाडीने थेट देवळापर्यंत जाता येते. गाडी पार्क केल्यावर एक लहान किल्लावजा बांधकाम आहे. त्याच्या आत देवीचे मंदिर आहे. देवीची मूर्ती काळ्या पाषाणात व जवळजवळ दोन मिटर उंच आहे. मूर्ती खूप देखणी आहे. मंदिर व परिसर अनेक पिढ्यांपासून पंत कुटुंबियांच्या अधिपत्याखाली आहे. त्या कुटुंबातील सध्या हयात असलेल्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी सात किलो वजनाचे कळस मंदिरावर चढवले आहेत. 

या देवीविषयी अशी हकीकत सांगण्यात येते की, श्रीराम वनवासात असतांना रावणाने सीताहरण केले, त्यामुळे श्रीराम अत्यंत दुःखी होऊन शोक करू लागले. त्यावेळी देवी सीतामाईचे रूप घेऊन श्री रामासमोर आली. त्या शोकाकुल अवस्थेतही रामाने देवीस ओळखले व तो तिला ‘ये माई’ म्हणाला, म्हणून देवीचे नाव यमाई पडले. 

देवीचे दर्शन घेऊन खाली उतरताना प्रसिद्ध भवानी संग्रहालय लागते. हे संग्रहालय औंधचे राजे, पंतप्रतिनिधी यांनी १९३८ मध्ये उभारले. सध्या ते महाराष्ट्र सरकारद्वारा संचलित केले जाते. संग्रहालयामध्ये दुर्मिळ चित्रकृती व शिल्पकृती यांचा उत्कृष्ट संग्रह आहे. 

येथील कलाकृती एवढ्या अप्रतिम आहेत की आपण जणू स्वप्नांच्या दुनियेत आहोत असे वाटत राहते. चित्रकलेच्या दालनांमध्ये बहुतेक सर्व सर्व शैलींची चित्रे ठेवली आहेत. उदा. जयपूर शैली, मुघल शैली, कांग्रा, पंजाब, विजापूर, पहाडी, मराठा वगैरे. प्रसिद्ध भारतीय तसेच विदेशी चित्रकारांची चित्रे येथे बघायला मिळतात. राजा रविवर्मा, एम्.व्ही.धुरंधर,माधव सातवळेकर, कोट्याळकर, रेब्रांट,लिओनार्डो द् विंची,बार्टोना मोरिला,जी.जी.मोरिस वगैरे नामवंत चित्रकारांची चित्रे येथे बघायला मिळतात. स्वराज्याची शपथ, शिवराज्याभिषेक, दमयंती वनवास, पद्मपाणी बुद्ध, लास्ट सपर,मोनालीसा वगैरे प्रसिद्ध चित्रे येथे आपणास पाहायला मिळतात. किरीतार्जुन युध्दाचा  नव्वद चित्रांचा संच बघण्यासारखा आहे. 

येथील धातू व संगमरवरी पाषाणातील शिल्पांचा संग्रहही अप्रतिमआहे.वर्षा,ग्रीष्म,वसंत, हेमंत, शिशिर आणि शरद हे वर्षातील सहा प्रमुख ऋतू. या ऋतूंना स्त्री रूपात कल्पून त्यांची नितांत सुंदर शिल्पे येथे पाहायला मिळतात. प्रत्येक ऋतू शिल्पाला साजेशी काव्यपंक्ती त्या शिल्पाला जणू बोलती करते. उदाहरणार्थ,

        ‘वसंत वाटे अतिगोड साचा, 

        शृंगार केला विविध फुलांचा, 

        वेणीत कानात करी  कटीला, 

        गळ्यात दुर्डित उणे न त्याला’ 

या काव्यपंक्ती आणि ऋतू वसंत ललनेचे मूर्तरूप एकमेकांना साजेसे असेच आहे. नऊवारी साडी, उजव्या खांद्यावर पदर घेऊन, एका हातात फुलांची परडी,तर दुसऱ्या हातात कमलपुष्पे. शिवाय मनगटांवर फुलांच्या माळा, दंडांवर फुलांचाच बाजूबंद आणि फुलांचा कमरबंध असे नानाविध पुष्पालंकार परिधान करीत, गळ्यात मोत्यांचा लफ्फा-साज घालून सुहास्य वदनी ऋतू ‘वसंता’ पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते.  या उलट, ग्रीष्म ऋतू  वा ‘ग्रीष्मकन्या’. उन्हाच्या झळांनी व्याकुळ, थोडीशी थकलेली, अगदी अलंकारही नकोसे वाटणारी. एका हातात पंखा आणि दुसऱ्या हाताने केसांच्या वेणीला मुक्त करणारी ‘ग्रीष्मबाला’ आणि त्याला साजेशी काव्य रचना, 

         ‘घे विंझणा वातची उन्ह आला, 

          ये घाम वेणीभार मुक्त केला, 

          त्यागी तसे आभरणासी बाला,

           हा ग्रीष्म तापे सुकवी तियेला’.   

हातांत आरतीचे  तबक घेऊन, बंधू व पतीस भाळी कुंकूमतिलक लावून दसरा व दिवाळी निमित्ताने ओवाळण्यास  सिद्ध झालेली गुर्जर वेषातील युवती म्हणजे आपली ‘शरद कन्या’. काव्य पंक्ती अगदी तिला साजेशा आहेत.

          ‘मोदे करी सुंदर वेगळा

         बंधूसी तैसी युवती पतीला

        कुर्वंडीते,कुंकुम लावी भाळी

        शरद ऋतूचा दसरा दिवाळी

हेमंत सुंदरीचे वर्णन केले आहे ते असे,

        ‘हेमंत आला तशी थंडी आली 

        घेऊन उणीशी निवारलेली

         शेकावया शेगडी पेटवीली

        बाला सुखावे बहु शोभावीली’

‘शिशिर बाले’चे वर्णन केले आहे ते असे,

      ‘लोन्हा गव्हाच्या बहु मोददायी

      हुर्डा तसा शाळूही शक्तिदायी

      काढावया घेऊनिया विळ्यासी

      बाळा तशी ये शिशिरी वनासी’

 — मराठी शिल्पशैलीत साकार झालेल्या या सहा ऋतूकन्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या ‘ऋतूराज्ञी’ शोभाव्यात अशाच आहेत. 

औंधच्या राजांच्या प्रोत्साहानामुळे अनेक शिल्पकार येथे तयार झाले. त्यातील प्रमुख म्हणजे पांडोबा पाथरवट. ते व त्यांची मुले राजाराम व महादेव यांनी साकारलेली हस्तीदंतातील शिल्पे निव्वळ अप्रतिम. एखादा माणूस दगडातून इतके नाजूक कोरीवकाम कसे करू शकतो याचे पदोपदी आश्चर्य वाटत राहते. ही शिल्पे दगडातून नव्हे तर लोण्यातून कोरल्यासारखी वाटतात. 

हेन्री मूर या जगप्रसिध्द शिल्पकाराने बनवलेले ‘मदर अँड चाईल्ड’ हे शिल्प आपणास येथे बघायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन पुतळे येथे पहायला मिळतात. एक घोड्यावर बसलेला व दुसरा उभा. उभ्या पुतळ्यात महाराज म्यानातून तलवार बाहेर काढतांना दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरील त्वेषपूर्ण भाव निव्वळ अप्रतिम.

संग्रहालयाच्या मध्यभागी एक अवाढव्य बुद्धीबळाचा पट आपले लक्ष वेधून घेतो. पटावर दिसतात ते शस्त्रसज्ज सैनिक-प्यादी,परस्पर विरोधी राजे,वजिर,अंबारीयुक्त हत्ती, घोडे आणि ऊंट. असे म्हणतात की, यावर प्रत्यक्ष बुद्धीबळाचा खेळ खेळला जात असे व प्यादी उचलून ठेवायला माणसे असत.

या संग्रहालयातील प्रत्येक दालन बघायला कमीत कमी एक दिवस लागेल. म्हणजे पूर्ण संग्रहालय बघायला १५ दिवस सुद्धा  अपूरे पडतील. मी तर ठरवलंय 15 दिवस वेळ काढून निवांत आणखी एकदा हे अप्रतिम संग्रहालय बघायचेच.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

फोन -9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Sunita Rajiv Pujari

फारच सुंदर लेख. प्रत्यक्ष संग्रहालय बघत आहोत असे वाटले