वाचताना वेचलेले
☆ पवित्र -आनंददायी वास्तू ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
एका व्यक्तीने व्यवसायात प्रगती करून लंडनमध्ये जमीन विकत घेतली आणि त्यावर आलिशान घर बांधले.
त्या जमिनीवर आधीच एक सुंदर जलतरण तलाव होता आणि मागे 100 वर्ष जुने लिचीचे झाड होते.
त्या लिचीच्या झाडामुळेच त्यांनी ती जमीन विकत घेतली होती, कारण त्यांच्या पत्नीला लिची खूप आवडत होती.
काही काळानंतर घराचे नूतनीकरण करावे असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या काही मित्रांनी त्यांना नूतनीकरणाच्या वेळी सल्ला दिला की त्यांनी वास्तुशास्त्र तज्ञाचा सल्ला घ्यावा.
त्यांचा अशा गोष्टींवर फारसा विश्वास नसला तरी, मित्रांचे मन राखण्याचे त्याने मान्य केले आणि हाँगकाँग येथील, वास्तुशास्त्राचे तज्ञ मानले जाणारे प्रसिद्ध मास्टर काओ यांना बोलावले.
काओंना विमानतळावरून नेले, दोघांनी शहरात जेवण केले आणि त्यानंतर ते त्यांना त्यांच्या कारमध्ये घेऊन त्यांच्या घराकडे निघाले. वाटेत जेव्हा एखादी गाडी त्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा तो त्याला रस्ता देत असे. मास्टर काओ हसले आणि म्हणाले की तुम्ही खूप सुरक्षित ड्रायव्हिंग करता. ते देखील हसले आणि प्रतिसादात म्हणाले की लोक सहसा काही आवश्यक काम असतानाच ओव्हरटेक करतात, म्हणून आपण त्यांना मार्ग दिला पाहिजे.
घराजवळ पोहोचल्यावर रस्ता थोडा अरुंद झाला आणि त्याने गाडीचा वेग बराच कमी केला. तेवढ्यात अचानक एक मूल रस्त्यापलिकडून हसत हसत आणि वेगाने धावत त्यांच्या गाडीच्या समोरून रस्ता ओलांडून गेले. त्याच वेगाने चालत असताना तो मात्र त्या रस्त्याकडे पाहतच राहिला, जणू कोणाची तरी वाट पाहत होता. तेवढ्यात त्याच रस्त्यावरून अचानक आणखी एक मूल पुढे आलं. त्यांच्या कारच्या पुढून पळत गेले, बहुधा पहिल्याचा पाठलाग करत असावे. मास्टर काओने आश्चर्याने विचारले -” दुसरे मूलही धावत बाहेर येईल हे तुला कसे कळते?”
ते मोठ्या सहजतेने म्हणाले, “ मुले अनेकदा एकमेकांच्या आगे मागे धावत असतात आणि कोणतेही मूल जोडीदाराशिवाय असे धावत असते यावर विश्वास बसत नाही..”
मास्टर काओ हे ऐकून मोठ्याने हसले आणि म्हणाले की “ तुम्ही निःसंशयपणे खूप स्थिर चित्त व्यक्ती आहात.”
घराजवळ आल्यानंतर दोघेही गाडीतून खाली उतरले. तेवढ्यात अचानक घराच्या मागच्या बाजूने ७-८ पक्षी वेगाने उडताना दिसले. हे पाहून तो मालक मास्टर काओला म्हणाला की, ” जर तुमची हरकत नसेल तर आपण इथे थोडा वेळ थांबू शकतो का? “
मास्टर काओ यांना कारण जाणून घ्यायचे होते. त्यावर ते गृहस्थ म्हणाले की, ” कदाचित काही मुले झाडावरून लिची चोरत असतील आणि आमच्या अचानक येण्याने मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, तर झाडावरून पडून मुलाला दुखापतही होऊ शकते.”
मास्टर काओ काही वेळ गप्प बसले, मग ते संयत आवाजात म्हणाले, ” या घराला वास्तुशास्त्राच्या तपासाची आणि उपायांची गरज नाही.”
त्या गृहस्थाने मोठ्या आश्चर्याने विचारले – का?
मास्टर काओ – ” जिथे तुमच्यासारखे विवेकी आणि आजूबाजूच्या लोकांचा चांगला विचार करणारे लोक उपस्थित/रहात असतील – ते ठिकाण , ती मालमत्ता वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार अतिशय पवित्र-आनंददायी-फलदायी असेल “.
— मित्रांनो, आपले तन आणि मन जेव्हा इतरांच्या सुख-शांतीला प्राधान्य देऊ लागते तेव्हा, इतरांनाच नव्हे तर आपल्यालाही मानसिक शांती व आनंद मिळतो.
जेव्हा माणूस नेहमी स्वतःच्या आधी इतरांच्या भल्याचा विचार करू लागतो, तेव्हा नकळत त्याला संतत्व प्राप्त होते, ज्यामुळे इतरांचे भले होते आणि त्याला ज्ञान प्राप्त होते.
आपणही असे गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपल्या घराला फेंगशुई किंवा “वास्तू”सारख्या तंत्राची किंवा नवस बोलण्याची गरज भासणार नाही.
संग्राहक : सुनीत मुळे