सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ गंगेत घोडं न्हालं– भाग 2 … (भावानुवाद) – सुश्री सुषमा मुनींद्र ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भगत आपण पहिलं- मुलगी आयुष्यभर मुलाच्या आणि त्याच्या परिवाराच्या तैनातीत राहत असते.’ आता इथून पुढे )
`श्रेष्ठी, तू भोळी आहेस. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुला वाईट वाटेल म्हणून आम्ही सांगितल्या नाहीत. एका मुलाच्या वडलांनी तुझ्या बाबांना असं सांगितलं की एकदाचा विवाह करून तुम्ही तुमच्या मुलीपासून सुटका मिळवाल. तिचं जगणं-मरणं, आजारपण, औषधं वगैरेंचा खर्च आयुष्यभर आम्हाला करावा लागेल.
श्रेष्ठी जवळ जवळ किंचाळलीच. `ओ गॉड.. असले हिशेब…. आई, मी लग्नंच करत नाही.’
`जिथे योगायोग असेल, तिथे सहजपणे संबंध जुळतील. कशाला त्रास करून घेतेस?’
`माझं लग्नं जुळत नाही, म्हणून मी त्रास करून घेतेय, असा विचार तू का करतेयस आई? मी माझ्या नोकरीत खूश आहे. खरंच मी लग्नं करणार नाही.’
`एकट्या मुलीनं राहणं काही सोपं नाही. नातेवाईक तर, श्रेष्ठीचं लग्नं कधी करणार… कधी करणार, म्हणून विचारून विचारून जीव घेताहेत.’
`आपण थोडं शहरी, थोडं ग्रामीण असल्याची शिक्षा भोगतोय. सरंजामशाहीचे संस्कार आपल्याकडून सुटत नाहीयेत. आपण स्वत:ला खूप आधुनिक मानतो, तरीही हे संस्कार अपभ्रंशाच्या रुपात आपल्यात आहेतच. तू आणि बाबा मुलाच्या घरच्यांपुढे हात जोडत फिरता आणि इकडे माझ्या ऑफीसमधल्या काही मुली लीव्ह इन रिलेशनशीपमधे आहेत आणि खूश आहेत. त्यांना काहीच अडचण वाटत नाही.’
`श्रेष्ठी, कुठलीही पद्धत किंवा प्रथा अशी असत नाही, की ज्यात अडचणी असत नाहीत.’
`पण या मुली माझ्याप्रमाणे आपलं प्रदर्शन मांडत नाहीत. मुलाकडचे लोक मोठे चलाख असतात. त्यांना सुंदर, सुशिक्षित, आरोग्यसंपन्न, चांगले रीती-रिवाज असलेली मुलगी पाहिजे. लाखांनी हुंडादेखील पाहिजे. तरीही त्यांचा रुबाब असा की जणू ते मुलीचा उद्धार करताहेत. आत्मविश्वास असणारी मुलगी आपला आत्मविश्वास हरवून बसेल, याचा ते विचार करत नाहीत. मला मुलाकडच्यांची कृपा नको. मी लग्न करणार नाही.’
घरात पूर्वी आनंदाचं मौजमस्तीचं वातावरण असायचं. आता घरावर मृत्यूची शोकळा पसरलीय. श्रेष्ठीचा जो आत्मविश्वास पूर्वी माता-पित्यांना प्रभावित करायचा, तो आता द्रवित करू लागला आहे. सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा मुलगा आकाशपुष्पासारखा असतो. आकाशपुष्प मिळवण्याचा हट्ट सोडला नाही, तर श्रेष्ठी आत्मविश्वास हरवून बसेल. तडजोड कुणाला करावी लागत नाही? आपली कल्पना आणि कामना थोडी खाली आणायला हवी. आता जो श्रेयस आपले आई-वडील, भाऊ-वहिनीबरोबर श्रेष्ठीला बघायला येणार आहे, तो एकुलता एक नाही, पण अनुराधाला संतोष वाटतोय, कारण श्रेयसचे वडील, कृषी महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य आहेत. फायनान्समधे एम.बी.ए. केलेल्या श्रेयसचं पॅकेज पंध्रा लाखाचं आहे. इकडे श्रेष्ठीचं मात्र डोकं थंड झालेलं नाही. अनेकदा आर्जवं, विनंत्या केल्यानंतर ती यायला तयार झाली.
`येतेय आई, पण मुलाकडच्यांनी दांभिकपणा दाखवला, तर चांगली अद्दल घडवीन!’
`मुलीकडच्यांनी नम्र असायला हवं.’
`नम्रतापूर्वक अद्दल घडवीन.’
श्रेष्ठी आल्यानंतर अनुराधा मनाने त्या वातावरणात गेली. श्रेष्ठी आणि श्रेयस, नावं मॅच होताहेत.
हरेकृष्णांना आनंद झाला की नाही सांगता येत नाही. `मी पत्रिका चांगल्या जुळल्यात, यावर खूश आहे. अनुराधा तू नावं मॅच होताहेत, यावर खूश हो.’
अनुराधाला उमेद वाटतीय. `चांगले लोक आहेत. पत्रिका जुळल्या आहेत. आधीच अपेक्षा सांगितली, ते बरं झालं, नाही तर लोक मुलगी बघतात, मग देण्या-गेण्याच्या गोष्टी करतात. जमलं नाही, तर पत्रिका जुळत नाही, ही सबब आहेच सांगायला. आम्ही म्हंटलं की आमचा पत्रिकेवर विश्वास नाही, तर म्हणतात, `पण आमचा आहे ना!’
`चांगली तयारी कर. चांगला प्रभाव पडला पाहिजे.’
`माहीत आहे मला. श्रेयस, त्याचे वडील आणि भाऊ यांना सूटाचे कापड आणि ११००रुपये, त्याची आई आणि वहिनी यांना प्युअर सिल्कची साडी आणि ११००रुपये, लोक भले वाटले, तर मुलाच्या आईला आंगठीदेखील देईन.’
मुलाकडच्या लोकांसाठी हॉटेलमध्ये दोन रूम बुक केल्या आहेत. मैहर जवळच आहे, तेव्हा शारदा मंदिरात जातील. मैहरला जाण्यासाठी हॉटेलच्या माध्यमातून मोठी गाडी बुक केलीय. श्रेष्ठीचा मोठा भाऊ आणि वहिनी मिर्जापूरला रहातात, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत, पण तिचा धाकटा भाऊ हर्ष तत्परतेने सगळ्या तयारीला लागलाय. हर्षने आपल्या बाईकवरून श्रेयसला आणि हरेकृष्णनी आपल्या कारमधून बाकीच्या सगळ्यांना स्टेशनवरून हॉटेलमध्ये आणलं. बाप-लेकांचा चेहरा असा होत होता की जसे काही ते या लोकांना कृतार्थ करत आहेत.
संध्याकाळी बाईक आणि कारमधून सगळ्यांना घरी आणण्यात आलं. हरेकृष्ण बाहेरूनच `अनुराधा… अनुराधा’ म्हणून हाका मारू लागले. अनुराधा अशा त्वरेने बाहेर आली की जशी काही ती हाक ऐकण्यासाठी लालचावलेली आहे. तिने लवून लवून सगळ्यांना चरणस्पर्श केला. श्रेयस आणि त्याचे भाऊ-भावजय वयाने लहान होते, तरीही त्यांनी मोकळेपणाने चरणस्पर्श करून घेतला. नमस्कार वगैरे व्यवस्थित पार पडल्यानंतर पाहुण्यांनी बैठकीत पदार्पण केलं. त्यांच्या एकंदर वागण्यात चौकसपणा आहे. बैठकीची लांबी-रुंदी, एकंदर सजावट बघून देण्या-घेण्यासंबंधी काही अनुमान काढलं जाईल. अशा प्रसंगी साधारणपणे ठरलेल्या गोष्टीच बोलल्या जातात. त्याबद्दल बायो-डाटामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं खरं तर.
`हरेकृष्ण जी आपला मुलगा काय करतो? सून कुठली आहे? आपलं मूळ गाव? आपल्या कुटुंबात आणखी कोण कोण आहेत?’
हरेकृष्ण आणि अनुराधा कधी स्मितहास्य करत, तर कधी मोठ्याने हसत सांगतात. खरं तर या सगळ्या गोष्टी श्रेष्ठीच्या बायोडाटात लिहिलेल्या आहेतच. पण अशा प्रसंगी मुलीकडच्यांना सकारण, अकारण हसावं लागतंच. मंडळी मोकळी-ढाकळी, मिळून मिसळून वागणारी आहेत, हे पाहुण्यांना कळायला हवं. प्रश्नांची उत्तरे देताना ते पाहुण्यांच्या चेहर्यावरचे भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करताहेत. अर्थात त्यांना हेही माहीत आहे की मुलाकडच्यांच्या चेहर्यावरील भाव सहजपणे जाणता येत नाहीत. हे लोक जितकं अधीक इथे विचारतात, त्यापेक्षा मोबाईलवर जास्त विचारतात. समोरासमोर बोलताना वागण्या-बोलण्यात शालीनता आणावी लागते. सेल फोनवर बेफिकीरी चालू शकते. विचारणार्याच्या चेहर्यावरची प्रतिक्रिया दिसत नाही, ना उत्तरे देणार्याच्या. कुठलीही बाधा येऊ न देता नि:संकोचपणे प्रखर होऊन विचारणा करता येते.
दाखवण्याच्या कार्यक्रमाचा दिवस निश्चित झाल्यावर हर्ष श्रेष्ठीला घेऊन आला. जींस-टॉप श्रेष्ठीचा फेवरेट ड्रेस आहे, पण मुलाकडच्यांसमोर भारतीय संस्कृतीला महत्व द्यायला हवं. ती सलवार कुडता घालते. अतिशय सभ्य दिसेल अशी ओढणी घेऊन ती समोर येते. अर्थात आज-काल ओढणी आपला अर्थ हरवून बसलीय. मुली एक तर आज-काल ओढणी वापरतच नाहीत आणि वापरलीच तर एखाद्या दोरीसारखी गळ्यात झुलवत राहतात, त्यामुळे ओढणी बिचारी कसनुशी दिसते. पाहुण्यांची शोधक नजर श्रेष्ठीवर. बायो-डाट्यामुळे खूप काही माहीत आहे.
क्रमशः…
मूळ कथा लेखिका – सुश्री सुषमा मुनींद्र
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈