विविधा
☆ मैत्र जीवांचे… ☆ सौ. सीमा राजोपाध्ये ☆
पावसाने पुन्हा आपली बॅटिंग सुरू केली आहे. डोळे मिटून आपला संततधार पडतोय बिचारा..
त्यामुळे सकाळी उठून बघते तो काय…..
पाऊस तर सुरूच आणि समोरच्या रस्त्यावर साचलेले पाण्याचे तळे …
घराच्या जवळ कन्नड शाळा आहे. सकाळी दोघे जण..६/७ वी मधील असतील…
खांद्यावर हात टाकून आपल्ं दप्तर भिजू नये याची काळजी घेत… पाऊस पडत असताना सुद्धा… निवांत एका छत्रीतून
, कधी कधी चालताना पाणी उडवत असं निघाले होते..
बाहेरच्या कुठल्याही वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम होतच नव्हता …..
छान काही गप्पा रंगल्या होत्या…
मनात आलं…
लहानपण दे गा देवा…मुंगी साखरेचा रवा …..
आणि आठवलं…
खांद्यावर हात टाकून एकमेकांला टाळी देत मारलेल्या दिलखुलास गप्पा …
कोणी थोडासं कोणी नर्वस वाटलं तर पाठीवर हात मारत.. काय झाले आज??? अशी आपुलकीने केलेली विचारणा..
एखादं कुणी शांत शांत वाटलं तर सूर्य कुठे उगवला नक्की .. इकडे शांतता कशी?? असं म्हणत..त्याला/तिला बोलतं करणं..
कुणाच्या ही नवीन गोष्टी च… दिलखुलास कौतुक करणं… एकत्र डबा खाणं…
अभ्यास एकत्र करणं..
कुणी चार-पाच दिवस शाळेला नाही आलं तर का आला नसेल अशी काळजी करणं..
नाही तर सरळ त्याच्या घरी जाऊन बिनधास्त धडकणं…
कंटाळा येईपर्यंत खेळणं…
असं हे छोट्या छोट्या गोष्टीतून मोठं मोठं प्रेम दाखवणारं आपलं बालपण आणि त्याच बालपणातील हे
मैत्री जीवांचे
मैत्र जीवांचे…
किती गोड…
किती सुंदरता..सहजता..
लहानपणी कुठल्याही गोष्टीचा फारसा विचार.. काळजी नसताना… झालेली
दिलखुलास..निरागस अशी ही शाळेतील मैत्री…
नंतर पुढे कॉलेजमधल्या मित्र-मैत्रिणींशी आपलं सहज सहज नातं जोडून जाते..
मैत्रीमध्ये सहजता खूप असते आणि त्या मुळे खरंतर सुरक्षित कवच त्याला तयार होते..
आणि मैत्री घट्ट होत जाते
कॉलेजमध्ये
मग……
शाळेत असताना पावसात भिजू नये म्हणून ..एकाच छत्रीत २/३जाणारे आपण.. कॉलेजमध्ये मात्र मुद्दाम छत्री घरी विसरून जातो आणि मित्र मैत्रिणीबरोबर त्या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटतो…
ठरवून एखादा तास ऑफ करणं एकमेकाचे नोट्स एकमेकाला देणं..
एखाद्याच्या घरात काही अडचण आली तर सगळ्यांनी मदत करणं..
कारण कॉलेजला येईपर्यंत तेवढी मॅच्युरिटी आलेली असते..
बऱ्याच गोष्टींचे अर्थ कळत असतात …
त्यामुळे हसत खेळत तितकाच अभ्यास करत कॉलेजचे मोरपंखी दिवस या मैत्रीच्या धाग्यात पटापट निघून जातात…
आणि खरं तर या्चमुळे आयुष्य भरासाठी अविस्मरणीय होतात..
आणि मग ..
एखाद्या दुःखात ही डोळ्यात येणारं पाणी लपवलं जातं .. चेहऱ्यावर हसू ठेवत धीर दिला जातो…
कशासाठी.. आणि कशामुळे..
तर
आपण मोठे झाल्यावर देखील छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद .. सहजता.. सुरक्षितता .. प्रेम आपुलकी.. काळजी एका मोठ्या अव्यक्त नात्यांत मिळतं असते तेच..
मैत्र जीवांचे.
मैत्री दिन झाला…
खूप सारे मेसेज वाचले..
बघितले..
मर्यादा नसलेलं तरीही मर्यादेतच राहणार असं हे सुरेख नातं… सर्वात जवळचं..
सर्वात जास्त हक्काचं..
अधिकार हट्ट याबरोबर कर्तव्य ही जाणणारं.. असं हे अनमोल नातं ….
मैत्र जीवांचे…
कधी.. कसं.. कुणाबरोबर जुळून जातं समजत नाही..
आणि मग असे हे मैत्र जीवाचे…
माणूस आपोआपच आपल्याही नकळत जपू लागतो…
विचार आचार परिस्थिती रूप रंग वय असा कुठलाही अडसर यामध्ये नसतोच…
कधी कधी दोन समांतर रेषा सारख्या जाणाऱ्या व्यक्तीतही मैत्रीचा बंध फार घट्ट असतो… त्याचं कारण एकच की.. छोट्या छोट्या गोष्टीतून मोठा मोठा आनंद देणार असं हे नातं..
मैत्र जीवांचे…
आजच्या या सोशल मीडियाच्या जगात .. या आभासी दुनियेतही असे प्रामाणिक मनस्वी मैत्रीचे धागे गुंतलेले आपल्याला दिसतात…
ते जपले जातात…
आनंदाची बरसात होतं असताना दुःख अडचणी अलगद बाजूला केल्या जातात….
कशासाठी आणि कशामुळे..
तर तिथे असतात ऋणानुबंध…
आपुलकीने जपलेले…
मैत्र जीवांचे..
© सौ.सीमा राजोपाध्ये..
8308684324
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈