श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 116 – दिलदार मित्र ☆
दिलदार मित्र माझा
लाख काढतो रे खोडी।
तुझ्या छेडण्याने गड्या
वाढे जीवनाची गोडी।
चिमणीच्या दाताची ती
अशी अवीट माधुरी ।
तिच्यापुढे फिकी होती
पंच पक्वान्नेही सारी।
तुझा प्रेमळ कटाक्ष
देई लढण्यास धीर।
कौतुकाच्या थापेला रे
मन आजही अधीर।
शब्दाविना कळे तुला
व्यथा माझिया मनाची।
हृदयीच्या बंधानाला
भाषा लागेना जनाची।
जीवनाच्या वाळवंटी
तुझ्या मैत्रीचा ओलावा।
लाख मोल सोडूनिया
शब्द सख्याचा तोलावा।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈