श्री अरविंद लिमये
विविधा
☆ शुभास्ते पंथान: सन्तु ! ☆ श्री अरविंद लिमये ☆
माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे, विचारशील आहे, हे कितीही खरं असलं तरी प्रत्येक माणूस आपल्या बुद्धीचा आणि विचार शक्तीचा प्रत्येक वेळी योग्य पद्धतीने वापर करत असतोच असे नाही. तो तसा वापर करणे पूर्णतः अपेक्षित असलेली तर्क ही संकल्पना! आपल्या बुद्धीचा आणि विचारशक्तीचा योग्य पद्धतीने कसा उपयोग करायचा याचे विकसित झालेले शास्त्र म्हणजेच ‘तर्कशास्त्र’! इंग्रजीतील ‘लॉजिक’ या शब्दाचे भाषांतर म्हणून तर्कशास्त्र हा शब्द सर्रास वापरला जातो. लॉजिक हा शब्द तसा सुसंगत विचारांच्या सहाय्याने ज्ञाननिर्मिती करु पहाणाऱ्या विविध क्षेत्रांसाठी अतिशय अर्थपूर्ण ठरतो. म्हणूनच फक्त तर्कशास्त्रच नव्हे तर इतर विविध ज्ञाननिर्मिती शाखांच्या नामकरणासाठी सुद्धा लॉजिक हा शब्द प्रत्यय बनून आलेला दिसून येतो. बायॅलॉजी, सोशॉलॉजी, अॅस्ट्रोलॉजी, सायकॉलॉजी अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.
अर्थात तर्कशास्त्र हा विचारवंत आणि अभ्यासक यांच्यासाठी एक सखोल अभ्यासाचा विषय असेलही कदाचित पण सर्वसामान्य माणसांसाठी ‘तर्क’ हा फक्त स्वतःकडून नकळत होणाऱ्या एका मानसिक पातळीवरील प्रक्रियेच्या प्रवासापुरताच परिचयाचा असतो.
तर्क म्हणजे अनुमान, कयास, अंदाज असेच बरेच कांही हा सर्वसाधारण समज. तर्क करण्याच्या रूढ पद्धतीचा विचार केला तर ते पूर्णांशाने खरेही आहे. कारण सहसा सर्वसामान्य व्यक्तींकडून अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने तर्क केला जात नाहीच. ‘असे घडले असेल किंवा असे घडेल’ हा ज्याचा त्याचा अंदाजच असतो आणि त्यालाच सर्रास तर्क असे म्हटले आणि म्हणूनच समजले जाते. म्हणूनच तर्क म्हणजे अंदाज असला तरी प्रत्येक अंदाज ‘तर्क’ असतोच असे नाही. तर्काला वास्तवाचा, सत्यघटनांचा, आपल्या अनुभवांचा आणि सुसंगत विचारांचा आधार आवश्यक असतो. सर्वसाधारणपणे अंदाज मात्र व्यक्तिगत भावना, इच्छा, वासना यांनी प्रभावित झालेले असू शकतात. त्यामुळे बुद्धिनिष्ठ, सुसंगत विचारांच्या आधारे केला केलेला अंदाज आणि त्यातून काढलेले अनुमान हाच तर्क. आणि भावनिक प्रभावाखाली केलेले अंदाज मात्र अशास्त्रीय म्हणूनच कुतर्क, वितर्क, तर्कट ठरण्याची शक्यता अधिक.
सुसंगत विचारांच्या सहाय्याने केलेल्या तर्काचे सर्वांच्या परिचयाचे असे बुद्धिबळाच्या खेळाचे उदाहरण देता येईल. या खेळात प्रतिस्पर्ध्या विरुद्ध डावपेच करतानाच त्याच्या चालीवरून त्याच्या अपेक्षित चालींबद्दलचा तर्कशुद्ध विचार करून स्वतःची पुढची खेळी ठरवली जाते. युद्धात किंवा गनिमी काव्यात तर्कशुद्ध विचाराने घेतलेले निर्णयच अतिशय महत्त्वाचे असतात. गुन्हेगारांचा तपास करतानाही त्यातल्या चाली आणि निर्णयही असेच तर्कसंगत असणे आवश्यक ठरते. एरवी चोर सोडून संन्यासी फासावर लटकतो. राजकारण हासुद्धा तर्काधिष्ठित निर्णयातून आकाराला येणारा बुद्धिबळाचा खेळ असला तरी त्या खेळाला बुद्धिबळासारखे काटेकोर नियम मात्र नसतात. तरीही राजकारणाच्या खेळातही शह आणि काटशहांसाठी तर्कशुद्ध अनुमान, अंदाज महत्त्वाचेच ठरतात. या उलट दैनंदिन व्यवहारातले बरेचसे तर्क हे भावनांनी प्रेरित असल्याने व त्यामध्ये सारासार विचार व बुद्धी चातुर्याचा बऱ्याचदा अभाव असल्याने वितर्कच ठरत असतात.
संतुलित मन आणि तर्कशुद्ध विचार हे अचूक तर्कासाठी अतिशय अत्यावश्यक म्हणूनच महत्त्वाचे ठरतात. अचानक समोर येऊ पहाणाऱ्या संकटाच्यावेळी या दोन्ही गोष्टींचा अभाव असण्याची शक्यता असल्याने तर्कशुद्ध निर्णयांअभावी त्या संकटामुळे झालेल्या नुकसानीची तीव्रता खूप वाढल्याचे बऱ्याचदा अनुभवाला येते. त्यामुळेच अशा कसोटीच्या क्षणी तर्कशुद्ध निर्णयच संकटाची तिव्रता कमी करु शकतात.
यासाठी तर्क हा विचारांचा एक प्रवास आहे हे समजून घ्यायला हवे. योग्य निर्णय हा या प्रवासाचा अखेरचा थांबा. तिथवर सुखरूप पोहोचायचे तर बुद्धी आणि संतुलित मन यांच्या सोबतीनेच हा प्रवास व्हायला हवा. तरच तो न भरकटता अचूक दिशेने होईल. आणि त्यातून आकाराला आलेला तर्कच योग्य निर्णयाच्या थांब्यावर आपल्या स्वागताला हजर असेल!
आपणा सर्वांसाठी यापुढील अथक तर्कप्रवासासाठी ही संवादांची शिदोरी आणि ‘शुभास्ते पंथान: सन्तु’ या शुभेच्छा !!
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈