श्री सुहास रघुनाथ पंडित
इंद्रधनुष्य
☆ “पद्मश्री”… पोस्टाने पाठवा साहेब !… श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
(एक अफलातून सत्यकथा)
पद्मश्री हलधर नाग
“पद्मश्री”…. पोस्टाने पाठवा साहेब ! दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत “पद्मश्री”…. पोस्टाने पाठवा साहेब ! – पद्मश्री हलधर नाग
ज्यांच्या नावापुढं कधीच कुणी “श्री” लावलं नव्हतं, ज्याच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त तीन जोड, तुटलेली एक रबरी चप्पल, एक जुनाट चष्मा आणि रोख 732 रुपये फक्त !
त्याला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की,
दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत …. “पद्मश्री”…. पोस्टाने पाठवा साहेब !
अजब आणि अफाट आहे न हे ? मी सत्यकथा सांगतोय ओडिशातील हलधर नाग या अवलियाची.
कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी, कहर म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहे.
आणि आता तर संभलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या “हलधर ग्रंथावली – भाग -2” याचा पाठ्यक्रमात समावेश करण्यात आलाय.
साधाच वेष, शक्यतो पांढरं धोतर, गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अनवाणी फिरणारे हलधर एक अफलातून अवलिया आहेत .
हे खरे तर इंडियन आयडॉल आहेत. पण कचकड्याच्या दुनियेतील रियालिटी शो मधल्याना आपले चॅनेलवाले हिरो करतात. आयडॉल ठरवतात. खरे आयडॉल तर हलधरजीसारखे आहेत. चॅनेलवाल्याचे यांच्याकडे लक्ष कधी गेले– तर याना पद्मश्री जाहीर झाल्यावर !
*श्री हलधरजी यांची जीवनकहाणी तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल. म्हणून तर ही पोस्ट करतोय.
ते एका अत्यंत गरीब हरिजन कुटुंबातून आलेले. आईवडिलांचे निधन झाल्याने वयाच्या दहाव्याच वर्षी हलधरजी अनाथ झाले. त्यामुळे त्यांना इयत्ता तिसरीतच शाळा सोडावी लागली. पोटासाठी इतक्या लहान वयात ते ढाब्यावर खरकटी भांडी विसळण्याचे काम करू लागले. त्यानंतर एका गृहस्थाला त्यांची दया आली व त्यांना एका शाळेच्या स्वयंपाक घरात काम मिळाले. तिथं थोडं स्थिरस्थावर आयुष्य त्यांना मिळालं.
*
नंतर बँकेकडून त्यांनी शंभर रुपये कर्ज घेऊन पेन – पेन्सिल – आणि शालेय वस्तूंच्या विक्रीचे छोटेसे दुकान टाकले. आणि उदरनिर्वाह त्यातूनच भागवू लागले.
*
आता त्यांच्यातील साहित्यिक कौशल्याबद्दल सांगतो. श्री हलधरजी यांनी १९९५ च्या सुमारास स्थानिक उडिया भाषेत “राम शबरी” सारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फुट लिहून ते लोकांना ऐकवू लागले. भावनेने ओथंबलेले त्यांचे ते शब्द ऐकताना लोक गुंग होऊन जायचे. पाहता पाहता त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय झाल्या. हळूहळू ती कीर्ती सर्वदूर पसरू लागली. अनेक नामांकित लेखक कवींनी त्यांची दखल घेऊन विविध वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले. आणि अखेर दिल्लीपर्यंत त्यांची ही कीर्ती पोचली आणि त्यांना चक्क साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल “पद्मश्री” पुरस्कार जाहीर झाला.
अजून एक कहर म्हणजे स्वतः हलधरजी फक्त तिसरीपर्यत शिकलेले , पण आजमितीस पाच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर पीएचडी करत आहेत.
त्यांच्याबद्दल इतकंच म्हणावसं वाटत की,
आप किताबो में प्रकृति को चुनते है
पद्मश्री ने, प्रकृति से किताबे चुनी है।।
डीडी क्लास : भोवती अनुकूल काहीच नसतानाही यश खेचून आणणारे, दगडालाही फोडून त्यातून बाहेर उगवून येणारे हलधरजी– त्यांच्यासारख्या लोकांची चरित्रे का वाचायची ? तर आपल्यात, आपल्या पुढच्या पिढीत त्यातूनच ऊर्जा यावी. ” सगळी परिस्थिती वाईट आहे. नाहीतर मी नक्कीच काहीतरी करून दाखवलं असतं ” अशी कारणे देऊन निराश झालेल्यासाठीच ही आजची हलधरजी यांची कहाणी तुम्हापुढे ठेवली. शेवटी मी नेहमी सांगतो तेच आज पुन्हा सांगतो,
काहीही होवो….. रडायचं नाही
तर लढायचं आणि लढून जिंकायचं !
लेखक — धनंजय देशपांडे
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈