मनमंजुषेतून
☆ डाळ वांगं – लेखिका – सुश्री कस्तुरी ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆
“उद्या डाळ वांगं खाणार का? “–हा प्रश्न किमान ५ व्यांदा आईने विचारला. मी नेहमीप्रमाणे चिडून बोलण्यापेक्षा फक्त हो म्हणणं पसंत केलं.
परवा भेंडी खाणार का हा प्रश्न सकाळी ३ एक वेळा तरी तिने विचारला त्यावर मी वसकन बोलल्यावर अर्थात वातावरण तापलं.
‘नाही रहात आमच्या लक्षात, त्यात काय एवढं ? म्हणायचं तू– खायची आहे म्हणून ‘ इतकं साधं तिचं argument होतं.
त्याच्यावरून धडा घेऊन आज प्रत्येक वेळी मी ‘ हो हो हो ‘असंच उत्तर दिलं. मग माझ्या लक्षात आलं तिला माझ्याकडून फक्त response हवा आहे. तिची बोलण्याची भूक आहे. तिला संवाद कायम सुरू रहावा असं वाटतं पण दुर्दैवाने ते होत नाही. असं नाही की संवाद नसतो. पण बऱ्याचदा एक तर मी बाहेर असते आणि घरात आल्यावर मोबाईलमध्ये अथवा माझ्या विचारात किंवा लिखाण, डान्स, or साधना. ती तुटके दुवे सांधण्याचा प्रयत्न चालू ठेवते.
भेंडी खाणार का, डाळ करू का? भात खाणार का?भाकरी टाकू का? आज काय करणार आहे? आज कोर्टात काय आहे? डान्स क्लासला जाणार का? हे आणि असे तेच तेच प्रश्न १०० वेळा जरी आले तरी त्याला न चुकता हो म्हणायला शिकलं पाहिजे हे मला कळून चुकलंय.
संपूर्ण आयुष्य बोलण्यात गेलेल्या मागच्या पिढीला मोबाईलमध्ये रुतून बसलेली नव्या पिढीची शांतता नाही सोसवत. ते त्रागा करत राहतात. त्यांना चीड येते. त्यांना संवाद हवा असतो. तो unfortunately तुमच्या माझ्याकडून जास्त घडत नाही. मुद्दामून आपण करत नाही तरीही दरी पडतेच. यावर विचार झाला पाहिजे.
तुमच्या आईने, वडिलांनी एकच प्रश्न १० वेळा विचारला तरी प्लीज त्यांच्यावर वसकन बोलू नका. नाहीतर नंतर या आठवणींची आठवण कायम आपल्याला रक्तबंबाळ करत राहील. आणि तिथे अश्रू पुसायला कोणीही येणार नाही !
ले. कस्तुरी
संग्राहिका : हेमा फाटक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈