श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ नासाची आर्टिमिस योजना – भाग-1 ☆ श्री राजीव ग पुजारी 

२९ ऑगस्ट२०२२ला आपण एका नव्या युगात प्रवेश करणार आहोत. या युगाचे नाव आहे ‘आर्टिमिस युग. 

या योजनेद्वारा १९७२ नंतर प्रथमच नासा चंद्रावर मानव उतरविणार आहे, पण यावेळी चंद्रावर मानवाचे वास्तव्य दीर्घकाळ असेल आणि चंद्रावरील वास्तव्याचा अनुभव घेऊन या योजनेतील पुढील मोहिमांमध्ये मानव मंगळावर पाऊल ठेवणार आहे. 

या योजनेची कांही उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत:

१) दीर्घकालीन अन्वेषणांसाठी लागणाऱ्या पाणी व इतरही कांही महत्वाच्या संसाधनांचा चंद्रावर शोध घेणे व त्यांचा   वापर करणे.

२) चंद्राविषयीच्या कांही न उलगडलेल्या रहस्यांचा छडा लावणे आणि आपल्या नैसर्गिक उपग्रहाविषयीच्या आणि विश्वाविषयीच्या आपल्या ज्ञानात  भर घालणे. 

३) फक्त तीन दिवसांच्या अंतरावर असलेल्या चंद्र नामक खगोलीय पिंडावर राहणे आणि वावरणे यांचा अभ्यास करणे; या अभ्यासाचा उपयोग जेव्हा मानव मंगळावर वसाहत करण्यासाठी जाईल त्यावेळी होईल. 

४) ज्या मंगळमोहिमेवर जाऊन येण्यासाठी तीन वर्षे लागतात, अशा सुदूर मोहिमांसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची चाचणी घेणे. 

वरील उद्देश साध्य करण्यासाठी नासाने “आर्टिमिस  ही दीर्घकालीन योजना आखली आहे. १९६०-७० च्या दशकांत  नासाने यशस्वीपणे राबविलेल्या चांद्रयोजनेचे नाव अपोलो होते. यावेळच्या योजनेचे नाव आर्टिमिस आहे. ग्रीक पुराणांनुसार आर्टिमिस ही अपोलोची जुळी बहीण असून तिला चंद्राची देवी म्हणून ओळखले जाते. या योजनेद्वारा नासा प्रथमच एक महिला व एक पुरुष सन २०२५ मध्ये चंद्रावर उतरविणार आहे. 

ही योजना तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. आर्टिमिस-१ ही  मानवरहित अंतराळमोहीम असून यामध्ये ओरियन हे अंतराळयान चंद्राभोवती फेरी मारून परत येईल. याद्वारे ‘स्पेस लॉन्च सिस्टिम (SLS)’ या अवाढव्य प्रक्षेपकाची प्रथमच प्रत्यक्ष अंतराळ मोहिमेसाठी चाचणी घेण्यात येईल. तसेच केवळ एकदाच अंतराळप्रवास केलेल्या ओरियन या यानाचीही चाचणी घेतली जाईल. ही मोहीम ऑगस्ट २०२२  मध्ये आखण्यात आली आहे. आर्टिमिस-२ ही स्पेस लॉन्च सिस्टिम व ओरियन अंतराळयान  यांची पहिलीच समानव अंतराळ मोहीम आहे. या मोहिमेद्वारा चार अंतराळवीरांना  ५० वर्षांनंतर प्रथमच चंद्राच्या वातावरणात पाठविण्यात येणार आहे. या मोहिमेत ओरियन यान चंद्राभोवती फेरी मारून परत येईल. ही मोहीम २०२४ मध्ये राबविण्यात येईल. पृथ्वीच्या निम्न  कक्षेपलीकडील  (Low earth orbit) अपोलो-१७ नंतरची ही पहिलीच समानव मोहीम आहे. आर्टिमिस- ३ ही समानव मोहीम असून त्याचे नियोजन २०२५ साली करण्यात आले  आहे.  या मोहिमेपूर्वी चंद्राभोवती ‘गेटवे’ नावाचे अंतरिक्ष स्थानक प्रस्थापित केले जाईल. ओरियन अंतरिक्ष यान या स्थानकाला जोडले जाईल . नंतर ‘मानव अवतरण प्रणाली (Human Landing System)’ द्वारा अंतराळवीर चंद्रावर उतरतील व चंद्राच्या पृष्ठभागावर त्यांना नेमून दिलेली कामे करतील. कामे संपल्यावर पुन्हा अंतरिक्ष स्थानकावर येऊन पृथ्वीकडे प्रयाण करतील. आता आपण या आर्टिमिस योजनेविषयी विस्ताराने माहिती घेऊ.

 प्रथम आपण आर्टिमिस योजनेच्या विविध घटकांविषयी जाणून घेऊ. या योजनेत खालील घटकांचा समावेश होतो:

१) स्पेस लॉंच सिस्टिम (Space Launch System):- स्पेस लॉंच सिस्टिम हा नासाने आजपर्यंत तयार केलेला सर्वात शक्तिशाली प्रक्षेपक आहे. हा खास करुन अमेरिकेच्या सुदूरच्या अंतराळ मोहिमांमध्ये(Deep Space Missions) वापरण्यात येणार आहे. ओरियन यान,अंतराळवीर आणि मोहिमेसाठी लागणारे सामान हे सर्व एकाच खेपेत चंद्रावर नेऊ शकेल असा हा एकमेव प्रक्षेपक आहे. याची रचना वैविध्यपूर्ण आहे. अमेरिकेच्या भविष्यातील सुदूर अंतराळ मोहिमांसाठी SLS अधिकाधिक शक्तिशाली व वेगवेगळ्या सुधारित आवृत्यांमध्ये तयार करण्यात येत आहे.पहिल्या तीन चांद्रमोहिमांसाठी ब्लॉक-१ ही आवृत्ती वापरण्यात येणार आहे. ही आवृत्ती २७ मेट्रिक टनांपेक्षा जास्त वजनाचे सामान चंद्राच्या सुदूर कक्षेमध्ये प्रक्षेपित करू शकते. या आवृत्तीत  द्रवरूप इंधन असणारी चार S-25 एंजिन्स, घन इंधन असणारे दोन अनुवर्धि प्रक्षेपक (Rocket Boosters) व अंतरिम क्रायोजिनिक प्रणोदन टप्पा ( Interim cryogenic propulsion stage-ICPS) असे भाग आहेत. SLS प्रक्षेपक व ओरियन यान यांची संयुक्त ऊंची ३२२ फूट आणि वजन ५.७५ दशलक्ष पौंड आहे. उड्डाण आणि आरोहण यांवेळी SLS ८.८ दशलक्ष पौंड एव्हढा जोर निर्माण करेल, हा जोर सॅटर्न -५ प्रक्षेपकाने निर्माण केलेल्या जोरापेक्षा १५% जास्त आहे.

२) ओरियन अंतराळयान:-ओरियन अंतराळयान नासाच्या सुदूर अंतराळ मोहिमांसाठी विकसित केले आहे. या यानामध्ये अंतराळ प्रवासादरम्यान अंतराळवीरांना अनुकूल वातावरण आहे, आणीबाणीच्या प्रसंगास तोंड देण्यासाठी ते सज्ज आहे आणि सुदूर अंतराळप्रवासाहून पृथ्वीच्या वातावरणात येताना निर्माण होणाऱ्या प्रचंड वेग आणि  उष्णतेला सक्षमपणे हाताळून सुखरूपपणे अवतरण करण्यासाठी ते सक्षम आहे.

3) एक्सप्लोरेशन ग्राऊंड सिस्टिम (EGS):- ही नासाच्या फ्लोरिडास्थित केनेडी स्पेस सेंटर मधील प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे प्रक्षेपक व अंतराळयान यांची जोडणी, वाहतूक आणि प्रक्षेपण यांना मदत केली जाते. तसेच अंतरिक्षयान परत आल्यावर अंतराळवीरांना सुखरूपपणे यानातून बाहेर काढले जाते.

क्रमशः …

© श्री राजीव  गजानन पुजारी 

फोन -9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments