सौ. सुचित्रा पवार
विविधा
☆ गणेशोत्सव काल आणि आज… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
सर्वांच्या जिव्हाळ्याचा, आनंदाचा, उत्साहाचा सण म्हणजे गणेशोत्सव ! तो कधीपासून सुरु झाला याची नोंद इतिहासात असणार, पण गणपती मळाचा की चिखलाचा ? आख्यायिकाही वेगवेगळ्या आहेत. कुणी पुराणात जाऊन पाहिलंय ? नाही, तेही कल्पनेनेच लिहिले. त्यामागे तत्कालीन परीस्थिती, भौगोलिक, आर्थिक सामाजिक वैज्ञानिक ही असेल कदाचीत पण ते प्रमाण मानत आपण पाळत आलो, कदाचित त्या काळी काळाशी सुसंगत असेल ही !
ब्रिटिशांविरुद्ध समाजात एकी निर्माण करण्यासाठी टिळकांनी घरातला गणपती चौकात ठेवला की जेणेकरून लोक एकत्र येतील मग त्यांना समजावणे, सांगणे सोपे जाईल आणि नंतरच्या काळात त्याला सार्वजनिक रूप आले. टिळकांचा मूळ उद्देश जनजागृती व लोकांना एकत्र येणे हे सफल झाले असतीलच, पण पुढे ही प्रथा तशीच राहिली अन मंडळे वेगवेगळ्या कल्पना लढवून कल्पकता अन सामाजिक प्रबोधन करू लागली. मनोरंजनाच्या विविधरंगी कार्यक्रमानी उत्सव बहरू आणि भारु लागले. एक चैतन्य संचारले या उत्सवात नियमितच्या रुटीनमधून लोकांचे मनोरंजन होऊ लागले, विरंगुळा मिळू लागला. लोक शिकले, शिक्षित झाले, उत्सवात बदल झाले, लोकसंख्या वाढली, आता खरे तर काळानुसार बदल व्हायला हवे होते पण उलटेच घडले. भरमसाठ मंडळे एकमेकांवर ईर्षा, भांडणे अन जबरदस्तीच्या देणग्या, उंचच उंच मुर्त्या, डॉल्बी, बीभत्स गाणी यांनी उत्सवाचे सात्विक रूप जाऊन हिडीस रूप आले. प्रसादाच्या नावाखाली जेवणावेळी अन अन्नाचा अपव्यय होऊ लागला. रस्त्यावरची गर्दी, डॉल्बीचे शरीरावरील घातक परिणाम, पाणी प्रदूषण, ट्रॅफिक जॅम अन सामाजिक वातावरण गढूळ केलंय या सार्वजनिक उत्सवाने !आचार विचारात काळानुसार बदल होऊन सुसंस्कृतपणा यायच्या ऐवजी त्याची दिशा भरकटली अन दशा दशा झाली की हे आवरायला गणेशालाच बोलवावे वाटतेय.
सामाजिक वातावरण पर्यावरण यांचा विचार आम्ही करत नसू तर मग कायदाच का करत नाहीत एक छोटे गाव एक गणपती, मोठे शहर एक गल्ली एक गणपती ? मोठ्या मूर्ती बनवणे कायद्याने बंद का केले जात नाही ? पर्यावरण पुरकच मूर्ती तयार करा म्हणून कायदा का होत नाही ? घरगुती, सार्वजनिक मूर्तींना ठराविक उंचीचे प्रमाण का दिले जात नाही ?कारण या सर्वांना खतपाणी घालायला राजकारणी मंडळी कारणीभूत आहेत. उत्सव जवळ येताच मंडळांना शर्ट, भरमसाठ देणगी दिली जाते अन ऐतखाऊ, चंगळवादी पिढ्याना सवय झालीय की उत्सव आला की राजकारण्यांकडे भीक मागून जगायचे, टोकाच्या अस्मिता अन श्रद्धाही ! सामाजिक जागृती अशा विचित्र, ओंगळ वळणावर आलीय, करोडो रु चा चुरा पाच ते सात दिवसात होतोय. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच मंडळे सामाजिक बांधिलकी, सलोखा अन विधायक उपक्रम राबवतात, बाकी सर्व तेच ते जेवणावेळी, रोषणाई अन डॉल्बी !
खरे तर भारत हा कृषिप्रधान देश आहे म्हणून सर्व सण उत्सव हे शेतकरी जीवनाशी निगडित होते.
देवाचा प्रसाद अन फुले फळे ही त्या त्या ऋतूनुसार ! चिखलाचे देव पाण्यात विसर्जित करायचे म्हणजे पुन्हा ते निसर्गात मिसळावेत. जसे मनुष्य जन्मास येतो अन शेवटी मातीत मिसळून एकरूप होतो ! तसेच या देवांच्या मूर्तीचे देखील ! बघा, नागोबा, बैल, मातीचेच अन गणपती ही मातीचाच ! बारा बलुतेदारांना वेगवेगळ्या सणाला महत्त्व होते अन त्यांचा चरितार्थ यातून होत असे म्हणून हे सण अन औपचारिक गोष्टींचे चक्र त्या गावगाड्याच्या गरजेनुसार फिरत असे ! आता ते सर्व सम्पले, शेती सम्पली, कृषिप्रधान देश व्यापार प्रधान अन नोकरीप्रधान झाला अन सगळे सण व्यापारी गणिते करू लागले ! शेतातून, परसातून फुले, पत्री, दुर्वा न मिळता थेट बाजारातून मिळू लागली, पाना फुलांचा, फांद्यांचा बाजार बसू लागला अन कसल्याही परस्थितीत ते केलेच पाहिजे ही मानसिकता वाढली.
अमुक सण अमुक स्पेसॅलिटी याचे स्तोम वाढले शेतात पिकापेक्षा तनकट फोपावल्यासारखे !
मला आठवतो माझ्या बालपणीचा गणेशोत्सव ! श्रावणातल्या झडीने अन भादव्याच्या उन्हाने पिकं तरारून यायची सोबत गवत तणही फोपवायचे पिकांशी स्पर्धा करत, रस्त्याच्या दुतर्फा तरवड, गवतफुल फुललेली असायची, परसदारी विविधरंगी गौरी फुलायच्या रंगीबेरंगी फुलपाखरे सगळीकडे आनंदाने भिरभरायची, ज्वारी, मका कम्बरेला लागलेली असायची, मूग, काळा श्रावण, चवळीच्या शेंगा अंगणात ऊन खात पडायच्या, मुगातल्या लाल अळ्या अन चवळीच्या पांढऱ्या अळ्या शेंगेतून बाहेर पडून वाट दिसेल तिकडं धवायच्या, उन्हात टरफल फुटून शेंगा चट चट आवाज करत फुटायच्या अन कडधान्य बाजूला पडायची, चिमण्या दिवसभर या आळ्या गट्टम करण्यात व्यस्त अन शेतकरीन धान्याची उगा निगा करण्यात ! इकडे शेतीच्या पिकांची लगबग अन सण चौकटीत ! पटपट ही काम आवरून सणाच्या तयारीला लागायची ! घराघरात देवळीला सोनेरी बेगड लावून मखर करून गणपती विराजमान व्हायचा क्वचितच तो टेबल किंवा तत्सम वस्तूवर स्थानापन्न व्हायचा. शेतात दुर्वा दव बिंदूंचे मुकुट परिधान करून पावसाची नव्हाळी लेऊन हिरव्या कंच लुसलुशीत पेहरावात मुबलकपणे हवेवर डुलायच्या, आघाडा रस्त्याच्या कडेला कुंपणात आपली डोकी उंचावत अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडायचा ! उदबत्ती, निरांजन, कागदाच्या झुरमुळ्या, दरवर्षी याच सणाला राखून ठेवलेले नवीन रंगीबेरंगी कापड टेबल वर बस्स इतकीच घरगुती गणपतीची आरास ! फार फार तर कागदाची एखादी प्रभावळ ! पेढे, पेरू, केळ, चुरमुरे बत्तासे, शिरा, मोदक प्रसाद इतकाच माफक !
सार्वजनिक मंडळ गल्लीत एकच साधी मूर्ती, छोटासा मंडप, विद्युत रोषणाई स्टेरीओवर तेव्हढाच गल्लीपुरता गाण्यांचा आवाज घुमायचा अन मनात आनंदी आनंद भरायचा. आमची गल्ली गावाच्या एका टोकाला, खूप मोठी ! जणू छोटेसे एक गावच ! गल्लीतल्याच नाटक कंपनीचं एखादं नाटक किंवा विविध गुण दर्शन बस इतकेच मनोरंजन ! गावात वेगवेगळ्या पेठांचे वैशिष्ट्य पूर्ण आरास, देखावे कधी जिवंत देखावे अन तीच स्टेरिओवरील गाणी त्या त्या काळातील मराठी हिंदी चित्रपटातील ! वातावरण आनंदान भरून जायचं ! वेगळं काही वाटत नव्हतं किंवा देव आणि गाणी यांचा काही संबंध असावा हे ध्यानी येत नव्हतं ! कुठेही धावपळ, ताण किंवा बोजा नसायचा. पाच दिवस घरोघरी विराजमान होऊन पुरणपोळी खाऊन, सार्वजनिक गणपती शिरा खाऊन त्यांच्या गावी जायचे मन हुरहूरते ठेऊन अन शेतकरी पुढील शेताच्या कामाच्या लगबगीत !
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈