सौ. उज्ज्वला केळकर
मनमंजुषेतून
📓 शब्द व्हावे सारथी… भाग-3 लेखिका – डॉ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆
(अन् इतके दिवस लेखिका, मुख्याध्यापिका, मानव संसाधन विभागाची अध्यक्षा म्हणून मिळालेल्या लौकिकावर टीकास्त्राने काळा बोळा फिरला.) इथून पुढे —-
माझे मन घायाळ झाले. ‘मी सुखी आहे शिक्षण क्षेत्रात. नको मला हे पद. ‘आपणाला लोक दूषणे देत आहेत.’ मी फॅक्स पाठवला; पण मला उत्तर आले, तात्काळ. ‘धीराने घ्या. तुमची निवड ‘मी’ केली आहे. चटकन् उठा नि झटकन् कामाला लागा. सिद्ध करा आपली योग्यता.’
विश्वकोशाचे सचिव मला न्यायला ‘पोदार’मध्ये आले. मी निघाले तर महानगरपालिकेच्या समोर कॅमेरे रोखलेले. ‘‘बाई आली? टीकेला न घाबरता?’’ हे अध्यक्षपद इतके ग्लॅमरस असेल याची मला सुतराम कल्पना नव्हती; पण सुरू केले नेटाने काम. भारतीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. गोविंद फडके आणि डॉ. सु.र. देशपांडे यांची विज्ञान आणि मानव्य विभागासाठी मी मागणी केली नि त्याच दिवशी मुख्यमंत्री विलासरावांनी ती पूर्ण केली.
पण वेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागले. वाईला मी केक कापला.. झाली बातमी! विजूताईंनी केक कापला! कार्यालयात गणपतीची तसबीर लावली! विजूताई दैववादास शरण! अहो, देवाला नाही तर कोणाला माणसे शरण जातात? गणपती ही बुद्धीची देवता ना! पण मी चार मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली विश्वकोशाची परिपूर्ती केली. खंड १७ विलासराव देशमुखांच्या काळात, खंड १८ अशोकराव चव्हाणांच्या काळात, खंड १९ पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात तर २० पूर्वार्ध, उत्तरार्ध देवेंद्र फडणवीसांच्या काळात प्रकाशित झाले.
महाजालकावर तो सीडॅकच्या मदतीने टाकला. त्याला जगातून १५ लाख वाचक १०५ देशांतून मिळवून दिले. विसाव्या खंडाचा पूर्वार्ध झाल्यावर हे आमचे मंडळ बरखास्त करण्यात आले. आता फक्त ४०० नोंदी शिल्लक राहिल्या होत्या. मला अतीव दु:ख झाले; पण तर्कतीर्थाचे पुत्र वासुदेवशास्त्री जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजींना पत्र लिहिले. ‘माझ्या वडिलांचा रखडलेला प्रकल्प विजयाबाईंनी अतीव मेहनतीने पूर्ण करीत आणलाय. त्यांनी घेतलेल्या मेहनतीस न्याय द्यावा. परिपूर्ती बाईंनी करावी, अशी तर्कतीर्थाचा पुत्र म्हणून इच्छा व्यक्त करतो.’ नि ती संधी देवेंद्रजींनी मला दिली. मंडळ पुनरुज्जीवित झाले. सारे विश्वकोश कार्यालय, माझे तरुण सहकारी, जाणते संपादक कामाला लागले. मी वाईतच तळ ठोकला. गोविंदरावांचे निधन झाले होते नि आठ विज्ञान नोंदी तपासणे गरजेचे होते. हात जोडून
डॉ. विजय भटकरांसमोर उभी राहिले. ते ‘हो’ म्हणाले अन् मोहीम फत्ते! २० व्या खंडाचा उतरार्ध पूर्ण झाला. याच कालखंडात कुमारांसाठी दोन कुमारकोश जीवसृष्टी आणि पर्यावरणावर काढले आणि सात नामवंत शास्त्रज्ञांनी ते बोलके केले अंधांसाठी. कन्याकोशाची २७५ स्त्रियांचा चरित्रगौरव सांगणारी २२ तासांची ध्वनिफीत महाराष्ट्र शासनाने दुर्गम भागातही पोहोचविली.
२४ जून २०१५ ला विश्वकोशाची परिपूर्ती देवेंद्रजींनी केली नि मला कृतकृत्य वाटले. ‘विश्वकोशा’ची गाडी सचिवांकडे देऊन माझ्या वाहनाने मी परतले..
‘‘मास्तरीण मी!’ नावाने महाराष्ट्रात १८० ठिकाणी ग्रंथवाचन स्पर्धा घेतल्या. ५००० वस्तींचे शेणगाव ते मुंबई, १८० गावं. विश्वकोशाच्या वेबसाईटला महाराष्ट्र शासनाचा प्लॅटिनम, कॉम्प्युटर सोसायटीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि ‘मंथन’चे आशीर्वाद मानांकन मिळाले. विश्वकोश घराघरांत पोहोचला. इतकी माणसे जोडली गेली ना! मी फार ‘श्रीमंत’ झाले..
माझ्या घराकडे मात्र पती बघत होते. प्राजक्ता-निशिगंधाची अतूट साथ होती. ‘आमचे राजकुमार आम्ही शोधू’ म्हणणाऱ्या या दोन्ही सोनपाकळ्या स्वयंसिद्ध कधी झाल्या? निशिगंधाने दोन पीएच.डी. नि प्राजक्ताने मेडिकल क्षेत्रातल्या तीन पदव्युत्तर पदव्या कधी संपादन केल्या? दोघींनी मला तीन गोडुली नातवंडे पन्नाशीत दिलीसुद्धा. त्यासाठीसुद्धा ही ‘नानी’ राबलीय हो; पण मायेचे अतूट धागे ना, श्रमांच्या मोलापेक्षा फार मोठे, फार चिवट नि पुष्ट असतात. आम्हाला पेन्शन देणाऱ्या दोघी मुली आमचे वज्रकवच नि सुखाचा मूलाचार आहेत.
सध्या २०१५ ते २०१८ मध्ये मी बारा बालकोशांचे संपादन करीत आहे. अहो, केवढे अपार सुख आहे त्यात. ‘नवचैतन्य’, ‘पाणिनी’, ‘डिंपल’ माझी पुस्तके काढतायत. आनंद आनंद आहे. दु:ख दात काढते ना. तो लहानपणी बुटात जखडलेला पाय दुखतो, ठणकतो; पण मी चालत राहाते. पवन पोदार म्हणत असत, ‘‘हाऊ डु यू वॉक विथ धिस लेग? आय गेट वरिड.’’
मी म्हणे, ‘‘सर, विथ धिस ब्रोकन लेग आय हॅव ट्रॅव्हल्ड इन फोर्टीन डिफ्रंट कंट्रीज.’’
माझी तीन भावंडे, जी कधीच हे जग सोडणार नाहीत असे मला वाटत होते.. आक्का, नाना, निरू.. निघून गेली. माय तर रोज उठता-बसता आठवते. मग मी ओजू, अर्जू, इशूत मन रमवते आणि मग नेटाने उभी राहाते. मी किती विद्यार्थ्यांची आई आहे. वाचकांची माय आहे. छोटय़ांची नानी आहे. माझा परिवार घनदाट आहे. माझ्या मुली हेच माझं कनक. सूर्यनारायणास मी रोज सांगते..
‘दे तेज तू मजला तुझे,
दे तुझी समता मला
श्रेयसाची, प्रेयसाची,
नाही इच्छा रे मला—-
ना क्षणहि जावो व्यर्थ माझा,
शब्द व्हावे सारथी
त्यांच्याच रे साथीत व्हावी,
शेवटाची आरती’ —-
— समाप्त —
लेखिका – डॉ. विजया वाड
संग्राहिका – सौ. उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈