सौ. अमृता देशपांडे
विविधा
☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 6 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या 26 वर्षाच्या तरुण मुलाचे पार्थिव घेऊन जेव्हा त्याचेच सहकारी तिरंग्यात लपेटून त्याला घरी आणतात, तेव्हा आईवडील, बहीण भाऊ, आप्तमित्र या सर्वांच्या डोळ्यातलं पाणी… इथेतर शब्दच मुके होतात. संवेदना स्तब्ध होतात.आईच्या कुशीतून जन्म घेऊन मातृभूमी ची सेवा करताना भूमातेच्या मांडीवर विसावलेला तो वीर! प्रत्येकाच्या डोळ्यातलं पाणी त्या मातापित्याच्या त्यागाला, धारातीर्थी पडलेल्या शूराला अश्रू वंदना देत असतं. भारतमातेने आपला तिरंगी पदर आपल्या सुपुत्राला पांघरलेला असतो. मानवंदना देणारे ते अश्रू ही स्वतःला कृतार्थ मानत असतात.
शहीद जवानांची बातमी कानावर पडताच थेट काळजाला भिडते. दुःखाला अभिमानाची किनार असलेली ही भावना इतर सर्व भावनांपेक्षा श्रेष्ठ आहे. देशभक्ती चा कठोर वसा घेतलेल्या आणि ‘ तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण’ या ध्यासाने सीमेवर रक्षण करणारा जवान जेव्हां धारातिर्थी पडतो तेव्हा अश्रू रूपानी ‘ भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्या साठी’ हा संदेश सर्व सैनिकांना पोचवत असतो. तेच त्यांच्या लढण्याचं बळ असतं..
(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)
© सौ. अमृता देशपांडे
पर्वरी – गोवा
9822176170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈