सौ राधिका भांडारकर
कवितेचा उत्सव
☆ तू आणि मी … ☆ सौ राधिका भांडारकर ☆
आठवतात मजला
ते सागर किनारे
बुडत्या सूर्याच्या साक्षीने
दिलेले प्रीत नजारे…
चिंब पावसातले ते
स्पर्श ओले थरथरते
तुझ्या देहगंधातले
तरंग ते आठवते….
तू प्रतिक्षा केलीस माझी
त्या हिरव्या झाडाखाली
दोघांच्या भेटीची ओढ
राघू मैनेने पाहिली..
हाती हात गुंफुनी
त्या माळरानातूनी
मुक्त चालताना
कितीदा घेतले लपेटुनी…
सळसळ पर्णांची
छुमछुम पाण्याची
मिसळली तालात
धून आपल्या प्रेमाची…
वेचते आहे क्षण सारे
तुझ्या माझ्या शिंपल्यातले
खिडकीवर टपटपणारा पाऊस
सांडतो मोती आठवणीतले,,,.
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈