श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ दृष्टी आणि दिशा ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

दृष्टी ! समोर दिसणारी दृष्ये नजरेद्वारे आपल्या डोळ्यांनी अवलोकन करण्याची निसर्गदत्त क्षमता म्हणजे दृष्टी ही दृष्टी या शब्दाची सरळ,सोपी व्याख्या.पण ती दृष्टी या शब्दाच्या  असंख्य कंगोऱ्यांना दृश्यमान करण्यास तशी अपुरीच पडणारी. कारण त्या विविध कंगोऱ्यांचा वेध अशा मोजक्या शब्दांद्वारे घेता येणं शक्य नाहीच.

दृश्य, दृग्गोचर, दृष्टीभ्रम, दृष्टीमर्यादा, दृष्टीक्षेप,दर्शक, दृष्टांत,दर्शनी,दर्शनीय,-हस्वदृष्टी दीर्घदृष्टी,तीक्ष्णदृष्टी,जीवनदृष्टी, दूरदृष्टी,काकदृष्टी,पापदृष्टी असे ‘दृष्टी’ या शब्दांच्या अर्थसावल्यांनी आकाराला आलेले अनेक अर्थपूर्ण शब्द. या प्रत्येक शब्दांची व्याप्तीही तितकीच व्यापक.

हे सगळे शब्द दृष्टी या शब्दाच्या अर्थाशी थेट नातं सांगणारे आहेत. या खेरीज एरवी ऐकताना त्यांचा दृष्टी या शब्दाशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाहीय असं वाटावं असे दृष्टी या शब्दाचे इतरही अनेक अर्थ व्यक्त करणारे शब्दही आहेतच.लक्ष,अवधान, चित्त,दिशा,रोख,कल, मनोवृत्ती, कुवत,विचारबुद्धी,पारख असे दृष्टी या शब्दाचेच विविध अर्थरंग ल्यालेले अर्थपूर्ण शब्द दृष्टी या शब्दाची व्याप्ती समजून घेण्यास प्रवृत्त करणारे आहेत.

सुरुवातीस सांगितलेल्या दृष्टी या शब्दाच्या सरळसोप्या व्याख्येनुसार दृष्टी ही समोरची दृश्ये अवलोकन करण्याची निसर्गदत्त देणगी आहे हे खरे पण ही दृष्टी स्वायत्त नाहीय.ती जे अवलोकन करते म्हणजेच पहाते ते पहाण्याचे फक्त एक माध्यम या भूमिकेतून.सुंदर दृश्यांच्या अवलोकनातून मिळणाऱ्या सुखाला ‘नेत्रसुख’ असं म्हंटलं जात असलं तरी ते खऱ्या अर्थाने दृष्टीला होणारे सुख नाहीच.तो  दृष्टीद्वारे मनाला होणारा सुखाचा स्पर्श असतो.त्याला दृष्टीसुख म्हणतात ते या अर्थाने.दृष्टीला होणारे नाही तर दृष्टीमुळे मनाला होणारे सुख ! मनात उमटणारी ही सुखद भावना नंतर नजरेच्या रूपात आपल्या डोळ्यांत तरळत असते एवढेच.याउलट एखादं दृश्य जर अतिशय दुःखद, भयानक किंवा थरारक असलं तर दुःख,भिती थरार या भावना अशाच आधी मनातच उमटत असतात आणि  नंतर त्याच भावना नजरेतून व्यक्त होतात. म्हणूनच काय,किती,आणि कसं बघायचं हे दूरदृष्टीने ठरवायची सवय आपल्या मनाला आपणच लावायची असते.ती सवय चांगली असेल तर आपल्यासाठी सुखकारक, हितावह आणि ती वाईट किंवा अतिरेकी असेल तर मात्र दु:ख देणारी म्हणून हानिकारकच ठरते.

किती पहायचं याचं अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर मोबाईल,टीव्ही पहाण्याचं घेता येईल.ते पहाणं कामासाठी किंवा ठराविक वेळेकरता असेल तर हितकारकही ठरु शकेल आणि ते पहाण्याची सवय अतिरेकी असेल तर हानिकारक!

काय पहायचं हे आपल्याच स्वाधीन असतं.दैनंदिन वावरातही समोर येणारी प्रत्येक गोष्ट आपण पाहू शकतोच पण पहातोच असे नाही. घराबाहेर पडताना कुठे जायचं याचे नेमके भान आपल्या मनात पक्के असते आणि त्याचेच विचार मनात घोळत असल्याने नजरेसमोरून जाणारी सगळीच माणसे,दुतर्फाची दुकाने, आजूबाजूच्या हालचाली आपल्याला दिसू शकत असल्या तरी आपण त्या पहात नसतोच. आपलं लक्ष्य असतं आपल्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचणं हेच आणि त्यामुळे आपलं लक्ष असतं ते रस्त्यातले खाचखळगे, मागून पुढून येणारी वाहने, अशा आपल्यालाअडसर निर्माण करू शकणाऱ्या गोष्टींकडेच फक्त. त्यामुळे काय पहायचं हे आपणच आपल्याही नकळत ठरवलेले असते. आपलं लक्ष विचलित झालं तर मात्र अचानक अपघातही होऊ शकतो. अपघात झालाच तर त्याला तो ज्याच्यामुळे  झाला तोच नाही फक्त तर आपणही जबाबदार ठरतोच. दैनंदिन अनुभवातले हे ‘लक्ष्य’ आणि ‘लक्ष’ आपल्या आयुष्यातल्या वाटचालीतही तितकेच महत्त्वाचे ठरत असतात. नेमके ‘लक्ष्य’ ठरवून लक्षपूर्वक केलेली वाटचाल उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यकच असते.

चित्रपट,नाटक,टीव्ही ही माध्यमे दृष्टीद्वारे केलेल्या अवलोकनातून फक्त करमणूकच करीत नसतात तर विचारांना दिशाही देत असतात.त्यातील अभिरुचीपूर्ण कलाकृती आनंद न् समाधानाबरोबरच विचारांना योग्य दिशाही देतात.विचारांना मिळणारी ही दिशाच आपला दृष्टीकोन व्यापक बनवत असते.

त्या कलाकृती उथळ,बेगडी,सवंग करमणूक करणाऱ्या असतील तर त्यातून मिळणारं समाधान क्षणभंगूर तर असतंच आणि मनातल्या विचारांना वहावत नेणारंही.त्यामुळे निर्माण होणारा संकुचित दृष्टीकोन आयुष्यात आपल्याला भरकटत न्यायला निमित्त मात्र ठरतो.

आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक की नकारात्मक हे आपल्या विचारांची दिशाच ठरवत असते.म्हणूनच दृष्टी आणि दिशा यांचं आयुष्यातील अनन्यसाधारण महत्त्व ओळखता येणं हे महत्त्वाचं !!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments