डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ बघा… जमतंय का ?… अज्ञात ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

“भाजीत चिमूटभर साखर घाल गं, म्हणजे उग्रपणाही कमी होतो आणि पदार्थाची गोडीही वाढते” — स्वयंपाक करताना आजी म्हणायची.  भाजीमध्ये चिमटीभर साखर किंवा गूळ हवा म्हणजे पदार्थाची चव वाढते. 

 मला नवल वाटतं आजीवर्गाचं. त्यांना बरोबर माहित असायचं – कशात काय घातलं म्हणजे गोडी वाढते. 

पूर्वी घरोघरी कर्ता पुरुष म्हणजे करारी, थोडा तापट, घराला धाकात ठेवणारा असायचा. कुणाचं कशावरून बिनसलं आणि आजोबांचा आवाज चढला की आजी ,” हो हो बरोबर आहे तुमचं ”  म्हणून होणारा वाद टाळायची. नंतर सावकाशीने आजोबांना मुद्दा पटवून द्यायची. 

‘चिमूटभर समजूतदारपणा दाखवला की कलह टळतो ‘ असं ती म्हणायची .

घरातील मूल चुकलं तरी त्यावेळेस आवाज चढवायचा नाही ,कारण मूलही मग आक्रमक होतं आणि ऐकत नाही. सावकाशीने समजावून सांगायचे ज्यावेळेस ते समजून घेईल. चिमूटभर माया दाखवली तर सांगण्याचा परिणाम होतो असं आई पण म्हणायची. म्हणूनच  त्यांचे संसार विना कलह झाले कामवाल्या बाई बाबतही असंच – तिने कधी दांडी मारली, कधी उशीरा आली, तरी ती पण एक संसारी बाई आहे, आपल्यापेक्षा  तिला आव्हानं असतात जास्त. मग अशावेळेस “का गं आज उशीर झाला ? बरी आहेस ना ? काळजी घे गं बाई– चल दोन घास खाऊन घे“ असं म्हटलं की ती बाई कायम आपल्याला बांधून राहील. 

थोडी माणूसकी खूप मोठं काम करते. थोडा विश्वास ,थोडं प्रेम ,थोडी आपुलकी या गोष्टी माणसं जोडायला हव्यातच संसारात —- आजी नेहमी म्हणायची “ आपण ४ पावलं मागे आलो तरी लहान होत नाही आपण. एखादे वेळेस माघार घेणं हे माणूस म्हणून २ पावलं आपल्याला पुढे घेऊन जातं. “

आताची सतत अरे ला कारे करायची सवय पाहिली की आपण खूप काहीतरी गमावतो आहोत असं वाटतं.

ही एक चिमूट आयुष्यात बदल करू शकते. 

थोडा चिमूटभर अहंकार कमी केला तर आपण आयुष्यात चिमुटभर आनंदाची नक्कीच भर घालू  शकतो.

ले.: अज्ञात 

संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments