सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ शिल्लक… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

ओंजळीत मी पाणी धरले. हाताला त्याचा गार स्पर्श छान वाटला. पण थोड्या वेळात पाणी आपणहून हळूहळू गळून गेले. मी खूप प्रयत्न केला त्याला सांभाळून धरण्याचा. नाही राहीले ते ओंजळीत ! पण हात मात्र ओले राहीले. 

ओंजळीत फुले घेतली. त्यांचा तो मऊ मुलायम अलवार स्पर्श मनाला खूप आल्हाददायक वाटला .त्यांच्या सुगंधाने मन वेडावले. पण फुले कोमेजायला लागली. म्हणून ओंजळीतून त्यांना सोडून दिले. हाताला मात्र ती सुगंधित करुन गेली . क्षणभराच्या सहवासाने सुवासाची लयलूट झाली . 

ओंजळीत मी मोती धरले. त्यांचा मऊ मुलायम पण थोडा टणक स्पर्श मनाला जाणवला. त्यांच्याकडे नुसत्या पाहाण्यानेही मनाला आनंदाचे , समाधानाचे सुख मिळाले, ते माझ्या ओंजळीत मी धरले. ते  तसेच राहिले. त्यांच्या पांढर्‍या सौंदर्याने मन मात्र शांतशांत झाले . माझी मलाच ” मी धनवान असल्याची ” भावना मनात आली .

कुठे तरी मी मनात ह्या ‘ तीन सुखांची ‘ तुलना करु लागले. आनंदाचे, समाधानाचे माप लावून मापू लागले. तेव्हा ते ठरविणे खूप कठीण वाटले. कारण, ओंजळीतून प्रत्येकवेळी मनात बरेच काही शिल्लक राहिले .

माझ्या मनाने आता ह्यात माणसे शोधायला सुरुवात केली . तेव्हा खरंच खूप व्यक्ती तिथे मला तशाच दिसल्या .

काही आपल्याजवळ येऊनही पाण्यासारख्या पटकन गळून गेलेल्या, पण मनात आपुलकीचा ओलावा काठोकाठ भरून ठेवलेल्या—-

काही फुलासारख्या, आपण हातात धरले, म्हणून कोमेजून जाणाऱ्या , पण तरीही माघारी सुगंध ठेवणार्‍या—

काही अगदी जवळच्या– मोत्या सारख्या. आपण ठेऊ तशाच राहणार्‍या, आपले जीवन मौल्यवान करणार्‍या— 

खूप चेहेरे आठवले मला , आणि नकळत माझ्या चेहर्‍यावर हास्य उमटले.

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments