श्री राजीव गजानन पुजारी
इंद्रधनुष्य
☆ सौर शिडाचे अंतराळजहाज – भाग-1 ☆ श्री राजीव ग पुजारी ☆
आपण सर्वांनी शिडाच्या जहाजाविषयी ऐकलेले असते. चित्रात आपण असे जहाज पहिलेले असते. पूर्वीच्या काळी दर्यावर्दी लोक अशा जहाजांच्या सहाय्याने समुद्र प्रवास करीत असत. या जहाजास जाड कापडाची शिडे लावलेली असतात. या शिडांवर वारा आपटल्यावर वाऱ्याच्या दाबाने जहाजास गती मिळते. पण एखाद्या अंतराळयानास शीड आहे व त्यावर सूर्यप्रकाश आदळल्यावर यानास गती मिळते हे आपण स्वप्नातच बघू शकतो. पण लवकरच अमेरिकेची अंतराळ संस्था अर्थात नासा हे स्वप्न सत्यात उतरविणार आहे.
चंद्रभूमीला भेट देऊन तेथे तळ स्थापण्याच्या नासाच्या महत्वाकांक्षी आर्टिमिस योजनेतील पहिली मोहीम अर्थात आर्टिमिस -१ ही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणार आहे. आर्टिमिस-१ यान प्रक्षेपणानंतर कांही वेळातच NEA स्काऊट (Near Earth Asteroid Scout) हे अंतरिक्ष जहाज अंतराळात प्रक्षेपित करणार आहे. हे जहाज पृथ्वीजवळील 2020GE या अशनीला भेट देणार आहे. या जहाजाला सौर शिड असणार आहे आणि सूर्यप्रकाश या शिडावर पडल्यावर सूर्यप्रकाशातील फोटोन्सच्या दाबाने हे जहाज 2020GE या अशनीकडे मार्गक्रमण करणार आहे.
आता आपण नासाच्या सौर शिड अंतराळ जहाजा संबंधी विस्ताराने जाणून घेऊ :—-
NEA स्काऊट हा बुटाच्या खोक्याएव्हढ्या आकाराचा क्यूबसॅट प्रकारातील उपग्रह असून त्याला साधारण रॅकेटबॉलच्या मैदानाएव्हढे ऍल्यूमिनियमचा थर दिलेले सौर शीड बसविलेले आहे. आर्टिमिस-१ ने प्रक्षेपीत केल्यावर हे शीड उलगडेल व सूर्यप्रकाशाचा वापर करून या क्यूबसॅटला 2020GE या अशनीकडे नेईल.
2020GE हा अशनी एखाद्या शाळेच्या बसपेक्षाही लहान असून, एखाद्या अंतराळयानाने अभ्यासासाठी निवडलेला सर्वात लहान अशनी आहे. नासाची सुदूर अंतराळातली अशा प्रकारची ही पहिलीच मोहीम आहे. ज्याला भेट द्यायची तो 2020GE हा पृथ्वीचा एक निकटतम अशनी (Near earth asteroid) असून तो आकाराने ६० फुटांपेक्षा कमी आहे. आजपर्यंत ३३० फुटांपेक्षा कमी लांबीच्या अशनीचे एव्हढ्या जवळून अन्वेषण करण्यात आलेले नाही. हे जहाज त्याच्यावर बसविलेल्या वैज्ञानिक कॅमेऱ्याच्या मदतीने या अशनीचे जवळून निरीक्षण करेल. त्याचे आकारमान, आकार, गती आणि भूपृष्ठीय गुणधर्म आदींचा अभ्यास करेल, आणि त्याचवेळी या अशनीच्या आसपास काही धूळ किंवा दगडधोंडे आहेत का याकडे लक्ष देईल. कॅमेराचे रिझॉल्युशन एका चित्रपेशीला (pixel) ४ इंच असल्याने या मोहिमेच्या वैज्ञानिकांचा गट हे नक्की करू शकेल की, 2020GE हा एखाद्या खडकासारखा घन आहे, का ‘बेन्यू ‘ सारख्या मोठया लघुग्रह भावंडासारखा लहान लहान धोंडे आणि माती यांचा गठ्ठा आहे.
या मोहिमेच्या, दक्षिण कॅलिफोर्नियास्थित नासाच्या जेट प्रॉपलशन लॅबोरोटरीतील मुख्य शास्त्रीय अन्वेषक ज्यूली कॅस्टिलो – रॉगेज म्हणाल्या, ” पृथ्वीवरील अनेक वेधशाळांनी NEA स्काऊटसाठी १६ ते १०० फूट मापादरम्यानचे अनेक अशनी हेरून ठेवले होते. 2020GE अशा अशनींचे प्रतिनिधित्व करतो की ज्यांच्याविषयी सध्याच्या घडीला आपणाकडे अत्यंत कमी माहिती आहे.”
नासाच्या ग्रहीय संरक्षण समन्वयीन कचेरीसाठी पृथ्वीच्या निकटतम अशनींच्या शोधाचा एक भाग म्हणून काम करत असतांना, ऍरिझॉनाच्या ‘ कॅटलीना नभ सर्वेक्षणा ‘ला १२ मार्च २०२० ला हा अशनी सर्वप्रथम नजरेस पडला.
हंट्सविले, अलाबामा येथील मार्शल अंतराळ उड्डाण केंद्र हा नासाचा प्रगत अन्वेषण प्रणाली विभाग आणि जेट प्रॉपलशन लॅबोरेटरी यांनी विज्ञान व तंत्रज्ञान यांचे प्रात्यक्षिक स्वरूप ‘ NEA स्काऊट ‘ ही मोहीम विकसित केली आहे. ही मोहीम पृथ्वीच्या निकटतम लहान अशनींसंबंधीच्या नासाच्या माहितीत भर घालेल. या मोहिमेसाठी वापरण्यात येणारे सौर जहाज सहा एकक क्यूबसॅट फॉर्म फॅक्टरने बनवले आहे. सप्टेंबर २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात नासाच्या फ्लोरिडास्थित केनेडी स्पेस सेंटर येथून उड्डाण भरणाऱ्या ‘ स्पेस लॉन्च सिस्टीम ‘ या शक्तिशाली प्रक्षेपकावर असणाऱ्या दहा दुय्यम अभिभारांपैकी NEA स्काऊट हा एक अभिभार आहे. प्रक्षेपक आणि ओरियन यान यांना जोडणाऱ्या अडॅप्टर रिंगला जोडलेल्या डिस्पेन्सरद्वारा NEA स्काऊट अंतराळात सोडला जाईल.
ही मोहीम भविष्यातील मानवीय व यंत्रमानवीय मोहिमांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करेल. या प्रकारच्या मोहिमांद्वारा अशनी व लघुग्रह यांचेवरील खनिजद्रव्ये पृथ्वीवर आणणे आणि पृथ्वीच्या निकटतम अशनी व लघुग्रहांपासून पृथ्वीचे रक्षण करणे या विषयी ज्ञान मिळेल.
– क्रमशः भाग पहिला
© श्री राजीव गजानन पुजारी
विश्रामबाग, सांगली
मो. 9527547629
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈