श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ सौर शिडाचे अंतराळजहाज – भाग- 2 ☆ श्री राजीव ग पुजारी 

(या प्रकारच्या मोहिमांद्वारा अशनी व लघुग्रह यांचेवरील खनिजद्रव्ये पृथ्वीवर आणणे आणि पृथ्वीच्या निकटतम अशनी व लघुग्रहांपासून पृथ्वीचे रक्षण करणे या विषयी ज्ञान मिळेल.) इथून पुढे —-

NEA स्काऊट सारख्या मोहिमांतून मिळालेल्या विदेच्या ( डाटाच्या ) सहाय्याने नासाने ‘ Eyes on asteroid ‘ हे ऍप तयार केले आहे. या ऍपद्वारे आपणास नासाला ज्ञात असलेल्या कोणत्याही निकटतम अशनी, लघुग्रह आणि 

धूमकेतूची सूर्याभोवती फिरत असतानाची सद्य:स्थिती बघता येते. हे ऍप पूर्णपणे वापरकर्तामित्र (user friendly)आणि परस्परसंवादी (interactive) आहे. तुम्हाला तुमच्या आवडत्या अंतराळयानासह पृथ्वीचा समीपतम लघुग्रह अथवा अशनीचा आभासी ( virtual ) प्रवास करता येईल आणि हे यान या अंतरिक्ष गोलकाचे परीक्षण करतांना virtually च अनुभवताही येईल.

कॅस्टिलो – रॉगेज म्हणतात, ” ग्रहीय संरक्षणाच्या दृष्टीकोनातून मोठे लघुग्रह जरी चिंतेचा विषय असले तरी 2020GE सारखे अंतरिक्ष गोलक अंतराळात प्रामुख्याने आढळतात आणि ते जरी लहान असले तरी आपल्या ग्रहासाठी धोकादायक ठरू शकतात. १५ फेब्रुवारी २०१३ ला रशियाच्या दक्षिण पश्चिम भागातील चेलियाबिन्क्स शहरावर झालेला उल्कावर्षाव एका ६५ फूट व्यासाच्या अशनीच्या स्फोटामुळे झाला होता. त्यावेळी निर्माण झालेल्या धक्का लहरींमुळे (shock waves) पूर्ण शहरातील खिडक्यांची तावदाने फुटली होती व १६००० लोक जखमी झाले होते. हा अशनी 2020GE वर्गातीलच होता.

2020GE विषयी उच्च दर्जाचे अध्ययन करणे हा NEA स्काऊटच्या कामाचा केवळ एक भाग आहे. सुदूर अंतराळ प्रवासासाठी सौर शीड तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकही याद्वारे अनायासे होणार आहे. आर्टिमिस -१ च्या प्रक्षेपणानंतर जेव्हा हे सौर जहाज त्याच्या डिस्पेन्सरपासून विलग होईल तेव्हा पोलादी स्तंभांच्या (boom) सहाय्याने सौर शीड उलगडले जाईल व त्याचा आकार एका लहान पुडीपासून रॅकेट बॉलच्या मैदानाएव्हढा किंवा ९२५ चौरस फूट होईल.

माणसाच्या केसापेक्षाही पातळ, हलके व आरशासारखे असे हे शीड प्लास्टिकचा थर दिलेल्या ऍल्यूमिनियमपासून बनविलेले आहे. सूर्यकिरणांमध्ये असणाऱ्या फोटॉन्स कणांच्या आदळण्यामुळे निर्माण होणाऱ्या बळाच्या जोरावर हे यान मार्गक्रमण करेल. NEA स्काऊटच्या मार्गक्रमणासाठी लागणारी जास्तीत जास्त ऊर्जा सौर शीडच देईल, पण यानाची अभिमुखता (orientation) आणि योजनाबद्ध हालचाली (manuever) यासाठी शीत वायूधारित अग्निबाणांचा वापर केला जाईल.

या मोहिमेचे मार्शल स्पेस सेंटर मधील मुख्य तंत्रज्ञान-अन्वेषक लेस जॉन्सन म्हणतात, ” या मोहिमेच्या प्रारंभी एक प्रश्न होता तो म्हणजे, ‘ एक लहानसे अंतराळयान सुदूर अंतरिक्ष मोहिमांसाठी खरोखर वापरता येईल का आणि ते अल्प किंमतीत उपयुक्त संशोधन करेल का ?’ हे खरोखर फार मोठे आव्हान होते. कारण अशनी व लघुग्रहांची सर्वार्थाने माहिती गोळा करण्यासाठी या क्यूबसेटसारख्या लहानशा यानावर मोठी प्रणोदन प्रणाली बसविण्यासाठी जागा नसते.”—- पण वैज्ञानिक जाणत होते की, मोठे शीड बसविलेले एक लहानसे अंतराळयान सूर्यप्रकाशाच्या सातत्यपूर्ण जोराच्या बळावर एका सेकंदाला अनेक मैल या वेगाने प्रवास करू शकते. जॉन्सन यांच्या मतानुसार आकाराने व वजनाने लहान अंतराळयानासाठी सौर शिडे ही उत्कृष्ठ कामगिरी करणारी प्रणोदन प्रणाली ठरू शकते. NEA स्काऊट त्याची शिडे कलती करून व झुकवून सूर्यप्रकाश ग्रहण करण्याचा कोन बदलेल व त्याला मिळणाऱ्या दाबात बदल घडवून आणेल, आणि प्रवासाची दिशा बदलेल. हे सर्व एक जहाज वाऱ्याचा वापर करून कसे मार्गक्रमण करते तसेच असेल. सप्टेंबर २०२३ ला 2020GE हा अशनी पृथ्वीच्या अगदी जवळ येईल. त्याचवेळेस NEA स्काऊट चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने आवश्यक वेग धारण करून त्याची गाठ घेईल. अंतराळयान अशनीपासून एक मैल अंतरावर येण्याच्या काही वेळ आधी मोहिमेचे मार्गनिर्देशक (navigators) त्याच्या विक्षेपमार्गाचे सूक्ष्म समक्रमण (fine tuning) करतील.

कास्टीलो – रॉगेज म्हणाल्या, ” सेकंदाला १००फूट या सापेक्ष वेगाने एखाद्या अशनीजवळून जाणारे NEA स्काऊट हे सर्वात धिमे अंतराळयान असेल. यामुळे आम्हाला अमूल्य माहिती गोळा करण्यासाठी आणि या वर्गातले अशनी जवळून कसे दिसतात हे पाहण्यासाठी काही तास मिळतील. “

NEA स्काऊटमुळे भविष्यात सौर शिडे वापरून अंतराळ प्रवास करण्यासाठी नक्कीच एक व्यासपीठ मिळणार आहे. यानंतर सन २०२५ मध्ये १८००० चौरस फूट सौर शीड असणारे वेगवान सौर जहाज सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे.

— समाप्त —

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments